सेक्सपर्ट आणि मानसोपचारतज्ज्ञ
1) मी २३ वर्षांची विवाहित महिला आहे. कोणत्याही चांगल्या शरीरयष्टीच्या पुरुषाकडे पाहिल्यावर माझ्या भावना जागृत होतात आणि माझ्या मनात तेच विचार येऊ लागतात. असं का होत असेल?
- एखाद्या छान दिसणाऱ्या पुरुषाविषयी असं वाटणं, यात गैर काहीच नाही. ते स्वाभाविक आहे. मात्र, दर वेळी असं होत असेल, तर तुम्ही समुपदेशकाशी चर्चा करा आणि त्यांना तुमची समस्या सांगा. स्वतःवर संयम ठेवा.
2) मी ३५ वर्षांची महिला आहे. नियमित सेक्स केल्याने वजन कमी होते का?
- मला खात्री आहे की, हा प्रश्न विचारण्याआधी तुम्ही व्यायाम करून पाहिला असेल आणि आहारावरही नियंत्रण ठेवत असाल. शरीरसंबंधांमुळे कॅलरी कमी होतात, हे खरे आहे. मात्र, वजन कमी होण्याइतपत काहीही घडत नाही. तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर व्यायामाला पर्याय नाही. आहारावर नियंत्रण ठेवावेच लागेल. गरज पडल्यास तुम्ही डॉक्टरांचाही सल्ला घ्या.
3) मी ४२ वर्षांची महिला आहे. मला संततीनियमनाच्या गोळ्या घ्यायची अजिबात इच्छा नाही. गर्भधारणा रोखण्यासाठी आणखी कोणते पर्याय उपलब्ध आहेत?
- संततीनियमनासाठी खूप महिला गोळ्या घेतात. अनेकांना तो सुरक्षित पर्याय वाटतो. मात्र, त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे वयाच्या कोणत्या टप्प्यापर्यंत त्या गोळ्या घ्याव्यात, याला मर्यादा आहे. शस्त्रक्रिया करून घेणं, हाही एक पर्याय आहे. त्याच बरोबर शरीरसंबंधांवेळी निरोध वापरणं हादेखील अत्यंत सोपा पर्याय आहे. याशिवाय तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करून आणखी काही पर्यायांचा विचार करू शकता.
4) मी ३५ वर्षांचा आहे. मी असे ऐकले आहे की, स्त्रियांना सेक्सनंतर नवऱ्याच्या मिठीत झोपायला आवडतं. नवऱ्याने आपल्याला जवळ घ्यावं, कुरवाळावं असं त्यांना वाटत असतं. माझी पत्नी मात्र शरीरसंबंधानंतर लगेच झोपते. ती असं का करत असेल?
- ती असं का करत असेल, याचं उत्तर तीच देऊ शकेल, दोन शक्यता आहेत आणि त्या दोन्ही तुम्हीच पडताळून पाहायला हव्यात. एक तर तुमचे शरीरसंबंध खूप उत्तम असतील, त्यामुळे थकवा येऊन तुमची पत्नी लगेच झोपत असेल किंवा काही तरी नीट होत नसल्याने तिला कंटाळा येत असेल. यापैकी नक्की काय घडते, ते तुम्ही शोधून काढा. महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या पत्नीशी बोला. तिला विश्वासात घ्या.
लैंगिक समस्यांबाबत आपल्या प्रश्नांसाठी - sexpert@punemirror.com
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.