'वृक्षसेवे'चा हरित वसा

वृक्षतोड, पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांविषयी आपण वारंवार चर्चा करत असतो. कधी तरी खूप संतापही व्यक्त करतो. सरकार, प्रशासन याकडे लक्ष देत नाही, अशी तक्रारही करतो. सामान्यांपासून तज्ज्ञांपर्यंत अनेक लोक आपआपल्या पद्धतीने यावर मत व्यक्त करत असतात. मात्र, ही परिस्थिती बदलावी यासाठी खूप थोडे हात पुढे येतात. प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली की, त्यासाठी पुढे येणारे लोक तुरळक असतात. मात्र, वृक्षसेवा संस्थेच्या सदस्यांनी हा विचार आपल्या कृतीतून खोडून दाखवला आहे. त्यांनी धानोरीत वृक्षारोपणाचं मोठं कार्य हाती घेऊन एक हरित चळवळच सुरू केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 11 Jan 2023
  • 09:20 am
वृक्ष सेवा संस्थेतील सदस्य

वृक्ष सेवा संस्थेतील सदस्य

धानोरीत वृक्षारोपणाचं मोठं कार्य हाती घेऊन एक हरित चळवळच सुरू

 
अमोल वाकचौरे/मयूर भावे
amol.wakchaure@civicmirror.in
 
बंधारा तयार करताना वृक्ष सेवा संस्थेतील सदस्य
Caption
 
वृक्षतोड, पर्यावरणाचा ऱ्हास आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांविषयी आपण वारंवार चर्चा करत असतो. कधी तरी खूप संतापही व्यक्त करतो. सरकार, प्रशासन याकडे लक्ष देत नाही, अशी तक्रारही करतो. सामान्यांपासून तज्ज्ञांपर्यंत अनेक लोक आपआपल्या पद्धतीने यावर मत व्यक्त करत असतात. मात्र, ही परिस्थिती बदलावी यासाठी खूप थोडे हात पुढे येतात. प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली की, त्यासाठी पुढे येणारे लोक तुरळक असतात. मात्र, वृक्षसेवा संस्थेच्या सदस्यांनी हा विचार आपल्या कृतीतून खोडून दाखवला आहे. त्यांनी धानोरीत वृक्षारोपणाचं मोठं कार्य हाती घेऊन एक हरित चळवळच सुरू केली आहे.    
 
प्रदूषण आणि सिमेंटची वाढत जाणारी जंगले यामुळे शुद्ध हवा मिळवण्यासाठीदेखील माणसाला खूप मोठा संघर्ष करावा लागत आहे. जागतिक तापमानवाढ, त्याचे होणारे परिणाम, ऋतूंमधील अनियमितता अशा अनेक कारणांमुळे वृक्षसंवर्धनाची गरज मोठ्या प्रमाणात अधोरेखित होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याच्या उद्देशाने धानोरी परिसरातील विविध सोसायट्यांमधील रहिवाशांनी एकत्र येऊन 'वृक्षसेवा संस्थे'ची स्थापना केली. संस्थेने धानोरी गावठाण येथील एक डोंगर व वनविभागाच्या हद्दीत येणारा त्या डोंगराचा पायथा या परिसरात वृक्षारोपणाचे काम हाती घेतले आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या परिसरात कडुलिंब, वड, पिंपळ आणि आंब्याची सुमारे २५०० झाडे लावली आहेत, तसेच तेथे शेकडो वर्षांपूर्वीपासून असलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारीदेखील घेतली आहे. 
वृक्ष लागवड करताना वृक्ष सेवा संस्थेतील सदस्य
Caption
 
'वृक्षसेवा संस्था'
वृक्षसेवा संस्थेचे सदस्य रोज सकाळी डोंगरावर फिरायला जाताना आवर्जून तेथील झाडांना पाणी घालतात. परिसरात आजूबाजूला जंगल असल्यामुळे तेथे पूर्वी मोर, हरिण, तरस, ससा, साप, मुंगुस, कबूतर, पोपट, गरुड, घार अशा विविध प्राणी-पक्ष्यांचे वास्तव्य होते. काही प्राणी-पक्षी येथे स्थलांतरित होऊनही यायचे. मात्र, वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे व कमी होत असलेल्या झाडांमुळे अन्न व पाण्याची कमतरता भासू लागली. त्यामुळे येथील प्राणी, पक्षी यांची संख्या कमी होत चालली होती. त्यांना परत आणण्यासाठी त्यांचे खाद्य व पाण्याची व्यवस्था, तसेच पक्ष्यांसाठी घरटे व प्राण्यांसाठी निवाऱ्याची व्यवस्थाही संस्थेच्या माध्यमातून केली जात आहे.  डोंगरावरून वाहून जाणारे पाणी आणि वाढता प्लास्टिकचा कचरा ही पर्यावरणाच्या समोरील ज्वलंत समस्या असली, तरी त्यातूनही जलसंधारणाला हातभार लावता येऊ शकतो याचा आदर्श वस्तुपाठ धानोरीतील 'वृक्षसेवा संस्थे'ने घालून दिला आहे. संस्थेच्या सदस्यांनी धानोरीच्या डोंगरावर विखुरलेल्या प्लास्टिकच्या जुन्या बाटल्या संकलित केल्या. त्यामध्ये माती भरून वीस ते पंचवीस छोटे बंधारे तेथे बांधले आणि पाणी साठवण्याची किमया केली. या बंधाऱ्यांच्या मदतीने पावसाळ्यात डोंगर उतारावरून वाहात जाणारे पावसाचे लाखो लिटर पाणी आता अडवले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी जिरण्यास आणि पर्यायाने भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होत आहे. याशिवाय येथील प्राणी आणि पक्ष्यांच्या पाण्याचीही व्यवस्था होत आहे. साठवलेल्या पाण्यामुळे या परिसरात पुन्हा एकदा प्राणी, पक्ष्यांची हालचाल आढळून येत आहे. दररोज सकाळी व संध्याकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना शुद्ध हवा मिळत असून, प्राणी आणि पक्ष्यांचा मनमोहक विहारही बघायला मिळत आहे. 
बंधारा
 
जलसंधारणासाठी श्रमदान
धानोरीतील डोंगर परिसर खडकाळ असल्याने, तेथे वृक्षारोपणासोबत जलसंधारण करणेही आवश्यक आहे, हे ओळखून संस्थेच्या सदस्यांनी श्रमदानातून चर खणण्यास, छोटे बंधारे उभारण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी चक्क प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केला. डोंगरावर फिरायला येणारे नागरिक पाण्याच्या, शीतपेयांच्या बाटल्या घेऊन येतात. गरज संपल्यावर बाटल्या तिथेच टाकतात. बाटल्या प्लास्टिकच्या असल्याने त्यांच्या विल्हेवाटीचा प्रश्न बिकट होता. मात्र, टाकाऊ बाटल्यांमध्ये माती भरून त्यानंतर कुदळ, पहारी, फावडे वापरून मोठमोठे दगड, विटांचे थर एकमेकांवर लावतात. त्यावर माती भरलेल्या टाकाऊ बाटल्या रचल्या जातात. त्यानंतर माती आणि सिमेंटचा लेप देऊन तेथे बंधारा उभारला जातो. त्यासोबतच बाजूला झाडेही लावली जातात. त्यामुळे भविष्यात जमिनीची धूप रोखण्यासदेखील मदत होणार आहे. संस्थेच्या सदस्यांनी सांगितले की, जोरदार पावसात काही बंधारे वाहून गेले. त्यातून धडा घेऊन आम्ही बंधाऱ्यांच्या दगडांची रचना बदलली. एका बंधाऱ्यावर ताण येऊ नये, म्हणून त्याच्या खाली दोन-दोन बंधारे उभारले. असे अनेक बंधारे बांधले गेले असून, त्याद्वारे लाखो लिटर पाणी अडवले आहे. त्यातून निसर्गाचे संवर्धन होत असून, विविध पक्षी, प्राण्यांना नैसर्गिक अधिवास मिळत आहे.' 
वृक्ष सेवा संस्थेतील सदस्य
 
मदतीचे हात
उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता पडू नये म्हणून येथील नगरसेवक अनिल टिंगरे यांच्याकडून पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली जाते. टँकरने पाणी डोंगर पायथ्याशी असलेल्या टाकीमध्ये टाकले जाते.  वनविभागाच्या हद्दीत वीज नसल्यामुळे  डोंगरानजीकच्या टाकीत पाणी पोहचविण्यासाठी पायपंपाच्या साहाय्याने पाणी वरपर्यंत नेण्याचे काम संस्थेतील सदस्य करतात. तेथून पाच-पाच लिटरचे ड्रम भरून ते सर्व ड्रम एका ट्रॉलीत ठेवून डोंगराच्या पायथ्याथी असलेल्या व अरण्येश्वर मंदिर ते धानोरी गावठाणच्या दरम्यान असलेल्या 'बॉर्डर रोड' लगतच्या झाडांना दररोज पाणी घालण्याचे काम हे सदस्य करतात, तसेच या भागात पूर्वीपासून जनावरे चरण्यासाठी आणली जात असल्यामुळे त्यांच्यापासून या झाडांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक झाडाला जाळी बसविण्याचे कामही सदस्यांनी केले आहे.
 
संस्थेत सर्वांचा सहभाग
वृक्षारोपण आणि जलसंवर्धनासाठी 'वृक्षसेवा' संस्थेने घेतलेल्या पुढाकाराचे आता चळवळीत रूपांतर झाले आहे. संस्थेचे सदस्य प्रकाश सूर्यवंशी, राहुल झा, श्रीनिवास तिवारी, रुपाली सूर्यवंशी, ममता तिवारी, रमेश चौधरी, केल्व्हिन टेलर, वैभव कोंडेकर, सचिन पोरवाल, मुकुंद तेली, आशुतोषकुमार यांच्यासह अनेक आयटीयन्स, उद्योजक, सरकारी, खासगी कर्मचारी, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी संस्थेच्या कार्यात सहभागी होतात. 'ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिक, कंपन्यांचे सीएसआर विभाग या कामासाठी पाण्याचे टँकर, ट्रॉली, ट्री-गार्ड, जेसीबी, खोदकामाचे साहित्य उपलब्ध करून देतात', असे संस्थेच्या सदस्यांनी सांगितले.
 
सक्रिय सदस्यांची निःस्वार्थ सेवा
वृक्षसेवा संस्थेचे कार्य आज मोठ्या जोमात सुरू आहे. संस्थेचे सर्व सदस्य विविध भागांतून श्रमदानासाठी येतात आणि विविध पद्धतीने योगदानही देतात. संस्थेचे अध्यक्ष तापसरंजन दास यांनी सांगितले की, कार्याला सुरुवात केली, तेव्हा आम्ही केवळ ४-५ लोकच होतो. मात्र, हळूहळू काम वाढत गेलं आणि ४ वर्षांत सदस्यसंख्या सुमारे १०० च्या आसपास गेली आहे. त्यापैकी ६०-७० सदस्य अत्यंत सक्रिय आहेत. आपल्या सोयीने, जमेल तसं, जमेल त्या प्रमाणात लोक काम करत असतात. कोणावरही कसलंही बंधन नाही. कोणी रोज सकाळी येतं, तर कोणी संध्याकाळी. केवळ शनिवार - रविवार या कामासाठी वेळ देणारेही काही लोक आहेत. त्यांचाही सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. आम्ही धानोरी भागात सुमारे २५०० झाडांची लागवड केली असून, विशाल वृक्षांचे संगोपनही आम्ही करत आहोत. या कार्यात काही लोक श्रमदान करतात. काही समयदान करतात, तर काही लोक केवळ आर्थिक मदत करतात. मात्र, अशा अनेक हातांमुळेच संस्थेच्या माध्यमातून लोकहिताची कामे होत आहेत.'
 
'काही वर्षांपूर्वी आम्ही ४-५ लोकांनी एकत्र येऊन काम सुरू केलं. समाजासाठी काही तरी करण्याची उर्मी होती. त्यातून वृक्षलागवडीचं काम सुरू केलं. मी सेवानिवृत्त बँक अधिकारी आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहाराबाबतची माहिती मी दिलं. संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न केले. आज आमच्या संस्थेत विविध वयोगटातील १०० सदस्य आहेत. ते सर्व त्यांच्या-त्यांच्या परीने योगदान देत आहेत.
- तापसरंजन दास, अध्यक्ष, वृक्षसेवा संस्था    

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story