भाकरी फिरली पण करपली!
देवेंद्र शिरूरकर
खरं म्हणजे शरद पवारांना भाकरी फिरवायचीच नव्हती. बेत होता तो भाकरी, तिच्याखालचा तवा, चूल आणि तिच्यातला जाळ या चारही गोष्टी आपल्या ताब्यात ठेवायच्या होत्या. पहिल्यांदा बातमी आली की, शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा निश्चय पक्ष कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला. तेव्हाच खरेतर सुप्रिया सुळे पक्षाच्या कारभारी होणार, याचा अंदाज पवारांचं राजकारण ठाऊक असणाऱ्यांना आला होता.
आताही सुप्रिया सुळे आणि पटेल यांच्याकडे पक्ष सोपवून त्यांनी बऱ्याच गोष्टी साध्य केल्या आहेत.
भाकरी फिरवायची, हा शब्दप्रयोग पवारांनीच लोकप्रिय केला आहे. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर सुळे, पटेल यांना बसवून पवार यांनी भाकरी फिरवली नाही तर करपवून घेतली आहे. उलट आता अजित पवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना भाकरी फिरवायची होती पुतण्याची. ती नुसती फिरली नाही, तर करपून गेली. काका, पुतणे आणि चुलतभाऊ यांच्या संघर्षावरच हे संपूर्ण महाभारत उभे आहे.
गेल्या महिनाभरात अजित पवारांची दोन वक्तव्यं प्रसिद्ध झाली. एक म्हणजे, ‘मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल.’ याच्यावर काय डावपेच झाले माहीत नाही. पाठोपाठ दुसरं वक्तव्य असं आलं की, ‘मी शेवटपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार आहे.’ ‘आमच्याबद्दल कंड्या पिकवल्या जातात’ असं काका-पुतणे या दोघांनीही म्हटलं आहे.
म्हणजे एकीकडे काकांनी ‘मी पक्ष सोडणार नाही,’ असं पुतण्याकडून वदवून घेतलं आणि त्याची महत्त्वाकांक्षा अजून पुरेशी पातळ झालेली नाही, याचीही खात्री करून घेतली. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये काय व्हायचं असेल ते होईल, पण राष्ट्रवादीच्या माध्यमातून अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, ही अजूनही केवळ शक्यताच आहे. शरद पवारांचं भाषण म्हणजे ‘एक्सलंट’ कॉपी! ते कुठेही बोलतात तेव्हा मार्मिक बोलतात. ज्यातून तीन-चार अर्थ सहज निघतील आणि तरी त्यांच्या मनातला अर्थ वेगळाच असेल, असे ते बोलतात. त्यांच्यावर कितीही कठोर टीका केली तरीही ते टीकाकाराला कोपरखळ्या मारतात किंवा अनुल्लेखाने मारतात. त्यामुळे पवारांकडे वक्तृत्व नसले तरी त्यांच्या बोलण्याला बातमीमूल्य असते. बातमीमूल्य असणे आणि राजकीय मूल्य असणे यात फरक असतो.
अजित पवार राष्ट्रवादीत राहून मुख्यमंत्री कसे बनणार? त्यांनी केलेल्या पहिल्या विधानात याचे उत्तर दडलेले होते. मात्र काकांनी त्यांना राष्ट्रवादी सोडणार नसल्याचं सांगायला लावून ती शक्यता धूसर केली. मुळात या पक्षाची ताकद ती किती? पक्षात उरलेले बहुतांश नेते भाजपमध्ये जायला उतावीळ झाले आहेत.
राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा गेलेला आहे. राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची कुवत पक्षात वा शरद पवारांकडे नाही. मग जयंत पाटील, अजित पवारांनी किती दिवस पक्षात राहायचे? शेवटी या नेत्यांनाही मोठ्या संधी खुणावत असणारच की!
राहता राहिला पवारांचा राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा प्रश्न, त्यासाठी पटेल कार्यकारी अध्यक्ष झाले आहेत, एरवीही मोदींशी जुळवून घेण्याचे काम ते करतच होते. विश्वसार्ह नेता ही शरद पवारांची ओळख कधीच नव्हती. हा माणूस महाराष्ट्रातला असला तरी आपला आहे, असे अपील देशभरातल्या लोकांना वाटणे राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व उभे राहण्यासाठी आवश्यक असते. जसे मुंबईमध्ये गुजरात्यांचा कट्टर रागराग करणाऱ्या मराठी लोकांनाही वाटते की, बाकी गुजराती कसेही असले, तरी मोदी आपले आहेत! तसा चेहरा, तशी ताकद राष्ट्रवादीकडे नाही. दुसरा मुद्दा असा मांडला जातो की, भाजपविरोधी आघाडीमध्ये एखादे महत्त्वाचे पद शरद पवारांना मिळेल आणि तिथे भाजप विरोधातील काम ते एकजुटीने करू शकतील.
पवार मुळातच भाजपच्या विरोधात का जातील?
मोदींशी जुळवून घेत आपल्या अडचणी दूर करायच्याऐवजी त्या वाढवण्यात त्यांना काय रस असणार आहे? उलट ते मोदींची पडती बाजू सावरून घेत आहेत.
अलीकडेच शरद पवारांचे एक विधान असेच धोरणीपणाचे होते की, तुमचे भांडण मोदींशी आहे की सावरकरांशी?’ त्यांची हीच भूमिका हे वास्तववादी राजकारण होते. तुमचा आताचा शत्रू कोण आहे ते बघा. इतिहासाचे गोडाउन उघडायला जाऊ नका. कारण त्याच्यामध्ये प्रत्येकाच्याच विरोधात काहीतरी सापडेल. या दृष्टीने त्यांचे ते वक्तव्य शहाणपणाचे होते.
यापूर्वी कर्नाटकमध्ये भाजप विरोधकांच्या सभा होत होत्या. तेव्हा एक छायाचित्र आले होते, सगळ्यांनी एकमेकांचे हात हातात धरून उंच केलेले होते. नेमके सोनिया गांधींच्या उजवीकडे शरद पवार होते आणि सोनिया गांधींनी डाव्या बाजूच्या मायावतींचा हात हातात घेतलेला होता, पण उजवा हात शरद पवारांशी न मिळवता हाताची घडी करून कमरेपाशी बांधून ठेवला होता. सोनिया गांधी या शरद पवारांशी जुळवून घेणार नाहीत. त्यांच्या नेतृत्वाला विरोध करूनच राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली आहे. परराष्ट्रामध्ये जन्माला आलेली व्यक्ती आम्हांला पंतप्रधान म्हणून चालणार नाही,’ हा त्या राष्ट्रवादीचा अर्थ स्पष्ट होता. महाराष्ट्रामध्ये कशीतरी सोनिया गांधींनी शिवसेनेच्या बाबतीत तडजोड केली. शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला होता, म्हणून त्यांच्याशी आघाडी केली. हे सगळे आहेच, पण वयाचा विचार करता आता कोण पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये शरद पवारांची गणना करेल? मोदी आणि त्यांच्यामध्येही एका पिढीचे अंतर आहे. पंतप्रधानपदासाठी भाजपमधूनसुद्धा मोदींच्या शिवाय दुसरा कोणी दिसत नाही. विरोधकांच्या आघाडीमध्ये जे कोणी आहेत, ते एक तर मोदींच्या वयाचे आहेत किंवा त्यांच्यापेक्षाही तरुण आहेत.
त्यांच्यामध्येसुद्धा अरविंद केजरीवाल, मायावती, ममतादीदी (या दोघींच्या पक्षांची राष्ट्रीय पक्ष मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केली आहे.) यांच्याकडे कुणी भावी पंतप्रधान म्हणून पाहात असेल असे मला वाटत नाही. तुम्ही पंतप्रधान असणे जितके महत्त्वाचे असते, तितकेच तुम्ही पंतप्रधान दिसणेही महत्त्वाचं असते. दुर्दैवाने शरीर-प्रकृतीमुळे पवारांना ते ‘अपील’ आता राहिलेले नाही. शिवाय राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रापुरता आहे आणि त्याची ताकद मर्यादित आहे. महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांचा पवारांना नेहमीच पाठिंबा असतो. ‘सामना’सारखा अपवाद सोडून द्या, पण महाराष्ट्रातल्या माध्यमांचा महाराष्ट्राबाहेर काही प्रभाव आहे असेही दिसत नाही. मग पवारांना देशाचा नेता म्हणून कोण स्वीकारेल? अशी मान्यता मिळण्यासाठी व्यापार, उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्रांचे सूत्रधार या अर्थव्यवस्थेतल्या मुख्य तीन घटकांचा पाठिंबा आवश्यक आहे, पण तिथे तर मोदी आधीच जाऊन बसलेले आहेत. मोदी आणि त्यांचे सरकार हे गरिबांसाठी ज्या योजना राबवतात, त्याचा मुख्य आधार आर्थिक क्षेत्रामधल्या नेतृत्वाला पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे हा आहे. अदानी प्रकरण हे त्यातूनच आलेले आहे. हे मोदींचेच काय काँग्रेसचेसुद्धा धोरण राहिलेले आहे. येनकेनप्रकारेन महाराष्ट्रातल्या माध्यमांमध्ये, पत्रकारितेमध्ये आपण अग्रस्थानी राहिले पाहिजे, हे पवारांचे धोरण आहे. ‘पवार’ आणि ‘वापर’ हे समानार्थी शब्द आहेत. पवार ‘वापरू’ शकले नाहीत आणि पवारांना ‘वापरून’ काही मिळवले नाही, असे ‘माई के लाल’ महाराष्ट्रामध्ये फार कमी असतील. हे वापराचे त्यांचे कौशल्य आहेच.
पवारांनी प्रथम देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा अवेळी शपथविधी घडवून आणला, म्हणजेच दोघांचा वापर करून काँग्रेस आणि शिवसेनेला इशारा दिला. मग उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून देवेंद्र आणि अजित यांचा मुखभंग केला. करोनाकाळात मुख्यमंत्री घरी बसून काम करायला लागले आणि त्यांनी बंधनांचा अतिरेक केला, अशी ओरड पवारांनी राष्ट्रवादीच्या लोकांच्या मार्फतच सुरू केली. परंतु देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात प्रथमच पवारांना पत्ता लागू न देता सत्ताबदल घडवला. ही पवारांची मोठी नाचक्की होती. आपल्या भागातला मुख्यमंत्री झाला म्हणून आनंद वाटतो अशी सारवासारव त्यांनी केली, पण स्वर कडवट होता. या नाचक्कीचे खापर आता ते उद्धव ठाकरे यांच्यावर फोडत आहेत. उद्धव ठाकरे राजकीय परिपक्वतेत कमी पडले, असे पवारांनी म्हटले आहे. आता हे कळण्यासाठी ठाकरेंना मुख्यमंत्री करायची गरज होती का? ते आधीही कळायला हवे होते. किंबहुना शिवसेनेमध्ये पहिल्या पिढीपासूनच कोणत्याही प्रकारची परिपक्वता नव्हती, हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. असा हा पवारकृत वापर. मुख्य मुद्दा असा की, हे त्यांच्या घरातले भांडण आहे. ते चव्हाट्यावर आणायची गरज नाही. तुम्हांला नसेल तुमच्या पुतण्याला मुख्यमंत्री होऊ द्यायचे, सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा असेल, तर सरळ सांगून टाकावे. एक पेंडी दाखवून किती गाई हंबरत ठेवायच्या ? पवारांचा मुख्य उद्देश हा आहे की, मी सत्तेत असलो किंवा नसलो तरी चर्चेमध्ये असणार! त्यामुळे ही घरची भाकरी लष्करच्या भाकरीसारखी भाजायला घेतली. त्या भाकरीचे जे व्हायचे तेच झाले.
एक तर महाराष्ट्राच्या निर्मितीशी त्यांचा काही संबंध नव्हता. स्पष्ट सांगायचे तर ज्या पक्षातून पवारांनी राजकारण केले, तो पक्ष संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात होता. त्यांचे राजकीय गॉडफादर यशवंतरावांनी शिताफीने महाराष्ट्राचा मंगल कलश स्वहस्ते मिळवला. त्याच शिताफीचा वारसा पवारांकडे आला. दुसऱ्यांच्या बलिदानावर महाराष्ट्र राज्य निर्माण झाले आणि यशवंतराव त्याचे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रामध्ये मराठा लॉबी दृढमूल झाली. या सगळ्याचा फायदा शरद पवारांनी घेतला.
पवारांचा राजकीय अनुभव पाहून वाजपेयींनी त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष केले होते, पण पवार केवळ नैसर्गिक आपत्तीचेच नाही तर राजकीय आपत्तीचेही दोन्ही बाजूंनी व्यवस्थापन करू शकतात. हे त्यांचे कौशल्य मोदी त्यांना कुठलेही पद न देता वापरून घेत आहेत, एवढेच. स्वतःची आपत्ती दुसऱ्याच्या आपत्तीमध्ये कशी बदलायची, याचे ज्ञान असलेले पवार विरोधकांच्या वळचणीला जाऊन स्वतःच्या अडचणी वाढवतील की मोदींच्या वळचणीला जाऊन पक्षाचे अस्तित्व राखतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.