स्वप्नपूर्तीचा आनंद
ऊबिछान्यावर आरामात पडून मिटल्या डोळ्यांनी बघितलेले स्वप्न कधीही सत्यात उतरू शकत नाही. स्वप्नाला सत्याचा स्पर्श तेव्हाच होतो, जेव्हा ते तुमची झोप उडवते. रात्रंदिवस तुम्ही त्याचा पाठलाग करू लागता. तुमच्या डोक्यात, विचारात जेव्हा फक्त त्या स्वप्नपूर्तीचाच ध्यास असतो, तेव्हा ते स्वप्न सत्यात उतरते. असेच एक स्वप्न मी वयाच्या विशीत असताना पाहिले होते आणि त्यानेच कित्येक वर्षे मला शांत झोपू दिले नाही, ते म्हणजे - द लेक्सिकॉन ग्रूप. हे स्वप्न सत्यात उतरण्यामागचा प्रवास मात्र खचितच सोपा नव्हता.
माझा जन्म एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आमचे आई-वडील समाधानी व साधेपणाने जगणारे. आमचे हट्ट पुरवले जात नसले, तरी गरजा पूर्ण केल्या जात होत्या. आमचे एक छोटे घर होते. कष्ट करून, अभ्यास करून यशस्वी व्हायचे आणि समाजात सन्मानाने जगायचे, हीच शिकवण आम्हाला दिली गेली. सगळे काही सामान्य भारतीय कुटुंबांप्रमाणेच होते. फक्त एक गोष्ट वेगळी होती. ती म्हणजे,
आमचे वडील श्री. एस. डी. शर्मा यांचा ध्यास. प्रकाशन व्यवसायाशी निगडित अनेक छोट्या-मोठ्या नोकऱ्या त्यांनी केल्या. त्या निमित्ताने दुनियेचे रंग पाहिले, पण असे सामान्य लोकांसारखे जगत त्यांच्यासाठी काही तरी असामान्य कृती करण्याचे स्वप्न ते रोज पाहात होते आणि एक दिवस ते नक्कीच सत्यात उतरेल, असे स्वतःलाच बजावत होते.
वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नाचा, त्यांच्या कष्टांचा मी आणि माझा भाऊ नीरज याच्यावरही प्रचंड प्रभाव पडला. आम्हीदेखील त्यांच्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्रकाशकांची पुस्तके विविध शाळा, महाविद्यालये, संस्थांना द्यायचो. पुस्तकांच्या वजनाने जड झालेल्या बॅगा घेऊन आम्ही देशभर फिरलो. मात्र, काही तरी वेगळे करण्याची ऊर्मी शांत बसू देत नव्हती. अखरे २००६ मध्ये आमचे आई-वडील, मी, माझी पत्नी मोनिशा, भाऊ नीरज, त्याची पत्नी दीप्ती अशा सर्वांनी मिळून वाटेल ती जोखीम उचलून स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. घरातले दागिने मोडले, कर्ज काढले आणि आम्ही एक शाळा सुरू केली - द लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूल, वाघोली. अवघ्या १९ मुलांच्या प्रवेशाने शाळा सुरू झाली आणि हीच लेक्सिकॉन ग्रूपची मुहूर्तमेढ ठरली!
आमच्या कुटुंबातील सहा जणांनी लावलेले हे छोटेसे रोपटे आज १७ वर्षांनंतर २५ हजारांहून अधिक विद्यार्थी, शेकडो शिक्षक, कर्मचारी यांना सावली देते आहे. एका शाळेचे रूपांतर आज हॉटेल मॅनेजमेन्ट इन्स्टिट्यूट, मीडिया स्कूल यामध्ये झाले असून, लेक्सिकॉन ग्रूप शिक्षण क्षेत्राबरोबरच कायदा, वित्त, व्यवस्थापन, तंत्रज्ञान, खाद्यपदार्थ अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे.
संघटित प्रयत्नांच्या जोरावर आणि एकमेकांच्या विश्वासानेच आम्ही दोन वर्षांपूर्वी 'पुणे टाइम्स मिरर' चालवण्याचा निर्णय घेतला. पुणेकरांना केवळ बातम्या नको, तर त्या पलीकडे त्यांच्या समस्या मांडणारे व्यासपीठ हवे आहे, हे आम्ही ओळखले आणि त्यातूनच हा निर्णय घेतला. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल आम्ही द टाइम्स ऑफ इंडिया ग्रूपचे समीर जैन, सिवाकुमार आणि रणजीत काटे यांचे आभार मानतो.
पुणेकरांचे प्रश्न त्यांच्याच मातृभाषेतून मांडले जावेत, यासाठी गेल्या वर्षी आम्ही 'सीविक मिरर' हे वृत्तपत्र सुरू केले. त्यालाही तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात. मागील संपूर्ण वर्ष आम्ही समाजातील विविध क्षेत्रांना स्वतःशी जोडून घेतले. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्या मांडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्ही वाहतूक पोलीस, सायबर सुरक्षातज्ज्ञ, पुणे महापालिका, तर प्रसंगी मंत्र्यांनाही भेटलो. यात तुम्ही पुणेकरांनी आम्हाला मोलाची साथ दिली, हेही तितकेच महत्त्वाचे! आपण सर्वजण असेच एकत्र राहिलो, तर पुण्याला आपण अजून विकसित, स्वच्छ व सुंदर शहर करू शकू, अशी मला खात्री आहे.
आज 'सीविक मिरर' व 'पुणे टाइम्स मिरर' च्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मला तुम्हा सर्व वाचकांचे अभिनंदन करावेसे वाटते आणि तुम्हाला धन्यवादही द्यावेसे वाटतात. तुम्ही आमच्यावर दाखवलेला विश्वास यापुढेही कायम ठेवाल, ही आशा आहे. तुमची प्रत्येक समस्या, प्रत्येक प्रश्न मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणून तुम्ही 'सीविक मिरर' व 'पुणे टाइम्स मिरर' कडे पाहता याचे समाधान आहे. हे पाठबळ असेच राहू द्या आणि एकत्र येऊन आपल्या शहराचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी साथ द्या !
- पंकज शर्मा
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,
सीविक मिरर आणि पुणे टाइम्स मिरर