रंगपंचमीचा उडाला 'रंग'!
सीविक मिरर ब्यूरो
रंगपंचमी हा आपला एक अस्सल आणि महाराष्ट्राचे वेगळेपण जपणारा सण आता मरणाच्या दारात उभा आहे, असं म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती ठरणार नाही. नव्वदच्या दशकात किंवा त्या पूर्वी जे लोक मराठी शाळेत असतील, त्यांना आठवत असेल की, त्या वेळी रंगपंचमीला शाळेला सुट्टी असायची. मात्र, आता गेल्या १५-२० वर्षांपासून ही सुट्टी मराठी शाळांना दिली जात नाही. त्यामुळे आजकालची मुले तो सणही जवळपास विसरत चालली आहेत.
महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये आता हिंदीभाषक लोकांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल येथून मोठ्या प्रमाणावर नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने हे लोक येतात आणि त्याच्या पद्धतीप्रमाणे होळी किंवा धूळवडीच्या दिवशी रंग खेळतात. हिंदी चित्रपटांमधूनही हेच दाखवलं जातं. अगदी 'शोले'पासून 'होली कब है'चा मारा होत असल्याने आता होळीतच रंग खेळण्याची नवी पद्धत निर्माण झाली आहे. त्यामुळे बहुतांश लोक धूलिवंदनालाच होळी खेळतात. परप्रांतीयांच्या परंपरेत सहभागी होऊ नये किंवा प्रांतिकवाद निर्माण करावा, असा कोणताही हेतू इथे नसला, तरी आपल्या सणाचं महत्त्व कमी होऊ नये, यासाठी नक्कीच प्रयत्न करणे अपेक्षित आहे. धूलिवंदनालाच आपण 'होली है' म्हणत रंग खेळलो. त्यामुळे मग आता परत पाच दिवसांनी कशाला रंग खेळायचे? असं म्हणून आपला मराठी सण अडगळीत टाकला जातो आहे. यामागे मराठी माणसाचा न्यूनगंडदेखील कारणीभूत असू शकेल किंवा हिंदी-इंग्रजीचे सांस्कृतिक अतिक्रमणही कारणीभूत असू शकेल, पण दुसरा सण साजरा करताना आपला एक मराठमोळा सण आपण अडगळीत का टाकावा? याचा विचार प्रत्येकाने करणे अपेक्षित आहे. धूलिवंदनालाही रंग खेळा, होळी खेळा, पण आपल्या हक्काच्या रंगपंचमीला फाटा का द्यावा? हा विचार प्रत्येकाने करणे अपेक्षित आहे.
रंगपंचमी हा सण फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला साजरा केला जातो. धूलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांंना वेगवेगळे रंंग लावून आनंंदोत्सव साजरा केला जातो. द्वापरयुगामध्ये गोकुळात बालकृष्ण आपल्या गोपाळ-सवंगड्यांवर रंगीत पाणी उडवीत असे व त्यामुळे उन्हाची काहिली कमी होत असे, असा पौराणिक आधार यामागे आहे. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे. राधा आणि कृष्ण यांनी या दिवशी एकत्र रंग खेळण्याचा आनंद घेतला अशी धारणा आहे. या दिवशी कृष्णासह राधेची पूजाही केली जाते. मध्ययुगात संस्थानिक, राजे रंगपंचमीचा सण रंग खेळून साजरा करीत असत. रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याची रीत आहे. उत्तर प्रदेशात वसंत पंचमीच्या दिवशी बलराम मंदिरात या उत्सवाची सुरुवात होते. या दिवशी होळीशी संबंधित लोकगीते गायली जातात. ब्रज प्रांतात कृष्ण आणि बलराम होळीच्या सणाचा आनंद घेत असत, असे मानले जात असल्याने, उत्तर प्रदेशात होळीचा आनंद घेण्याला धार्मिक महत्त्वही आहे. हरयाणात दुलहंडी असे या उत्सवाला संबोधिले जाते. दीर आणि नणंद यांच्यासह रंगाच्या खेळाचा आनंद घेण्याची पद्धत येथे प्रचलित आहे. मध्य प्रदेशात होळीच्या निमित्त गायल्या जाणाऱ्या गीतांना फाग असे म्हणतात. राधा- कृष्ण, राम-सीता, शंकर-पार्वती या देवतांना उद्देशून रचलेली फाग गीते प्रसिद्ध आहेत. या गीतांची उत्पत्ती बुंदेलखंड येथे झाली असे मानले जाते. शिव मंदिरात जाऊन भाविक विशेष पूजा देवाला अर्पण करतात.
होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन हा सण साजरा केला जातो. या दिवशी सकाळी घरातील बायका पातेले, घागरी, हंडे पाण्याने भरून होळी पेटवलेल्या जागी ठेवतात. उन्हाने आणि होळीच्या उष्णतेने हे पाणी तापते. या पाण्याने लहान मुलांना अंघोळ घालतात. असे मानले जाते की, या पाण्याने अंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही. या दिवसात कैऱ्याही मिळू लागतात. कैऱ्या उकडून त्याचा गर लहान मुलांच्या अंगाला लावून त्यांना अंघोळ घालतात. मोठी माणसे होळीची राख अंगाला फासतात व नंतर स्नान करतात. याला धूळवड किंवा धूलिवंदन असे म्हटले जाते. आजकाल लोकांनी आपापल्या सोयीनुसार होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरू केली आहे. त्यात लहान-मोठे, स्त्रिया-पुरुष सरसकट सगळे उत्साहाने रंग खेळतात. मात्र, रंगपंचमी हा वेगळा सण आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
रासायनिक रंंगांंचे दुष्परिणाम पाहता नैसर्गिक रंंग वापरून रंग खेळण्यावर भर देण्याचे प्रमाणही अलीकडच्या काळात वाढलेले दिसून येते. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ, बीट अशा नैसर्गिक पदार्थांपासून रंग तयार केले जातात. त्यांचा त्वचेवर कोणताही परिणाम होत नाही. मात्र, रासायनिक रंगांमुळे त्वचारोग होतात. डोक्यात कोंडा वाढतो, केस पांढरे होतात किंवा डोळ्यांनादेखील हानी होऊ शकते. त्यामुळे रासायनिक रंग खेळू नये, याबाबत जनजागृतीदेखील दरवर्षी केली जाते.
शहरामध्ये रंगपंचमी असते तर कोकणातल्या लोकांची 'धुळवड' असते. धूळ उडवून ही धुळवड साजरी करण्याची परंपरा आहे. पोर्णिमेच्या दिवसापासून चालू झालेल्या या सणाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी वाड्या-वाड्यातील गावकरी डोल-ताश्या, सनई घेऊन वाजत-गाजत गावातील एका ठराविक ठिकाणी गोळा होतात. या ठिकाणाला 'मांड' म्हणतात. पुरेशे गावकरी गोळा झाल्यावर होळी उभारण्यासाठी लागणाऱ्या आंब्याच सरळ किंवा माडाच उंच झाड तोडतात. त्याची उंची साधारणता ४० ते ५० फूट असते. तत्पूर्वी त्या झाडाची गावातील प्रमुखांद्वारे पूजा केली जाते. तोडलेलं ते झाड ज्याठिकाणी होळी उभारायची असते त्या मंदिराच्या ठिकाणी घेऊन जातात. तिथे घेऊन गेल्यावर त्या तोडलेल्या झाडाची बाहेरची साल काढली जाते आणि त्यावर आंब्याच्या पानं बांधून वरच्या टोकाला भगव्या रंगाचा झेंडा बांधतात. अशा प्रकारे ही होळी सजवून झाल्यावर जमिनीमध्ये खड्डा करून ती उभी केली जाते. होळी उभी करण्यासाठी जी कसरत आणि मेहनत घेतली जाते ती वाखाणण्याजोगी असते. कुठल्याही मशीनचा वापर न करता एकीच्या बळावर गावकरी ती होळी लीलया उभी करतात. त्यानंतर तिची पूजा होते. त्यानंतर ४-५ फुटाचा गवताचा घेरा करून त्या गवताला डोल-ताशांच्या गजरात अग्नी दिला जातो. त्या होळीला कोकणी पध्दतीने गाऱ्हाण घालतात. त्यामध्ये एक वाक्य असते 'जो कोण आजपासून शिमगो संपापर्यंत बोंबटात नाय तो… (कोकणी शिवी)' हेही त्यामध्ये असते. शिमगा संपेपर्यंत दर संध्याकाळी वाड्या-वाड्यातील गावकरी डोल-तश्याच्या गजरात 'हव्वा हव्वा' असे जोरजोरात ओरडत, नाचत होळीला भेटायला जातात. या ओरडण्याला आणि नाचण्याला 'रोंबाट' म्हणतात. 'रोंबाट' हा प्रकार या होळी सणाचा एक आकर्षक भाग असतो, लहान-थोर, हवशे-नवशे या 'रोंबाटा'मध्ये बेधुंद नाचत-ओरडत असतात. शिमग्यातील दिवसाच्या वेळी गावा-गावातील काही लोक आपल्या वेशभूषा मध्ये बदल करून, वेगवेगळी सोंग घेवून घरोघरी 'शबय' मागायला येत असतात. शबय मागण्याची पद्धतही हटके असते. 'शबय-शबय-शबय…… आयनाचा बायना घेतल्याशिवाय जायना' हे ठरलेलं वाक्य. तसेच, पुरुषाला साडी नेसवून राधा बनवली जाते आणि घरोघरी गाण्यांच्या तालावर नाचवलं जात. असे वेगवेगळे काही गंमतीशीर, काही पारंपारिक उपक्रम या होळी सणामध्ये होत असतात. सणाच्या शेवटच्या दिवशी माणसांनाच घोड्यांसारख सजवून घोडेमोडणी आणि देवाच्या प्रसादाने होळीच्या सणाची सांगता करण्यात येते. अशा या बोंबाबोंब करणाऱ्या सणाची रंगत अलीकडच्या काळामध्ये कमी झालेली दिसते. असे म्हटले जाते की, होळी सणामध्ये गावातील वाड्या-वाड्यातील भांडणे नव्याने उगाळून काढली जातात. त्यामुळे बऱ्याच गावातील हा सण कोर्ट-कचऱ्यांपर्यंत जाऊन बंद झाला आहे.