पर्यटकांच्या उच्छादाला नियमांचे वेसण

इंडोनेशियामधील बाली हे आशियाई देशांमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मात्र, देवांचे बेट मानल्या गेलेल्या इंडोनेशियाच्या बाली बेटावर काही उपद्रवी पर्यटकांनी उच्छाद मांडला आहे. परदेशी पर्यटकांच्या कृतींना लगाम घालण्यासाठी बालीमधील यंत्रणेने नियमावली जाहीर करून सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे आणि कसे वागू नये, याच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 10 Jun 2023
  • 08:16 am
पर्यटकांच्या उच्छादाला नियमांचे वेसण

पर्यटकांच्या उच्छादाला नियमांचे वेसण

बाली येथे परदेशी पर्यटकांचा स्वैराचार रोखण्यासाठी इंडोनेशिया सरकारकडून कठोर नियमावली जाहीर; वास्तू, किल्ले, मंदिरांचे पावित्र्य रोखण्यासाठी भारतानेही व्हावे सक्रिय

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

इंडोनेशियामधील बाली हे आशियाई देशांमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मात्र, देवांचे बेट मानल्या गेलेल्या इंडोनेशियाच्या बाली बेटावर काही उपद्रवी पर्यटकांनी उच्छाद मांडला आहे. परदेशी पर्यटकांच्या कृतींना लगाम घालण्यासाठी बालीमधील यंत्रणेने नियमावली जाहीर करून सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे आणि कसे वागू नये, याच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. 

बालीचे राज्यपाल वयान कोस्टर यांनी ३१ मे रोजी एक परिपत्रक काढून १२ नियमांची माहिती दिली. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला (एससीएमपी) प्रतिक्रिया देत असताना कोस्टर म्हणाले की, 'बालीला भेट देणारे सर्व पर्यटक, प्रतिनिधी यांना मी विनंती करू इच्छितो की, त्यांनी या परिपत्रकाला समजून घ्यावे आणि त्याप्रमाणे सामाजिक वर्तणूक ठेवावी. काही परदेशी पर्यटक या बेटावर चुकीची वर्तणूक करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर ही नियमावली तयार करण्यात आली आहे.' 

'वास्तू, मंदिरांचे पावित्र्य जपावे'

परदेशी पर्यटकांनी बालीच्या धार्मिकतेचा, पवित्र वास्तू आणि मंदिरांचा आदर ठेवावा, अशी अपेक्षा या नियमावलीतून करण्यात आलेली आहे. ‘द बाली सन’ या माध्यम संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बालीची संस्कृती, चालीरीती, परंपरा आणि कलांचा तसेच स्थानिकांचा सन्मान राखावा, असा या नियमांचा अर्थ असल्याचे सांगितले जात आहे.

पवित्र ठिकाणी भेट देत असताना पर्यटकांनी कपड्यांचे भान राखावे. सभ्यतेला धरून असलेला पोशाख करणे अपेक्षित आहे. तसेच पवित्र ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणे, रस्ते आणि रेस्टॉरंट येथे वावरताना नम्रपणे वागावे. पर्यटकांनी पर्यटनस्थळावर केवळ परवानाधारक गाइड यांचीच मागणी करावी.

जर परदेशी पर्यटक बालीमध्ये फिरायला येत असतील तर त्यांनी इंडोनेशियाचे परिवहन नियम पाळले पाहिजेत. हेल्मेट वापरणे, आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय वाहनचालक परवाना बाळगणे अनिवार्य असणार आहे. विशेषतः चारचाकी वाहने वापरावीत, जी रस्त्यांसाठी योग्य आणि अधिकृतपणे नोंदणीकृत आहेत. भाड्याने मिळणारी दुचाकी वाहने अधिकृत व्यावसायिकांकडूनच घ्यावीत.

परदेशी चलन अधिकृत संस्थांकडूनच बदलून घ्यावे, अशीही सूचना नियमावलीत देण्यात आली आहे. परदेशी पर्यटकांनी पेमेंट करण्यासाठी इंडोनेशियाचा स्टॅण्डर्ड क्यूआर कोड (क्यूआरआयएस) पद्धत वापरावी किंवा इंडोनेशियन रुपया व्यवहारांसाठी वापरावा.

सर्व परवानग्या मिळालेल्या आणि नियमांचे पालन करणार्‍या ठिकाणीच पर्यटकांनी वास्तव्य करावे.

पर्यटकांनी पवित्र झाडांना स्पर्श करू नये, पवित्र किंवा धार्मिक स्थळे अपवित्र होतील, अशी कोणतीही कृत्ये करू नयेत. जसे की, पवित्र इमारतींवर चढणे किंवा त्या ठिकाणी अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

कोणतीही अनधिकृत कृती केल्यास कारवाई

पर्यटकांनी पवित्र प्रदेशात बेकायदेशीर प्रवेश करू नये. तसेच सरकार, स्थानिक यंत्रणा आणि इतर पर्यटकांबाबत आक्षेपार्ह भाषा किंवा आक्रमकता आणि अनादर दाखवू नये. ही कृती खपवून घेतली जाणार नाही, असाही नियम करण्यात आला आहे. परदेशी पर्यटकांनी अधिकृत कागदपत्रांशिवाय कोणताही व्यवसाय करू नये किंवा अनधिकृत कामांमध्ये सहभागी होऊ नये. जसे की, अनधिकृत वस्तूंची विक्री किंवा ड्रग्जचा व्यापार. तसेच तलाव, समुद्र आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करू नये. एकदाच वापरता येणारे प्लास्टिक जसे की, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक स्ट्रॉ या वस्तू वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन न्यूजने दिलेल्या बातमीनुसार चालू वर्षात गैरवर्तणूक आणि नियम तोडल्यामुळे इंडोनेशियाने १२० हून अधिक पर्यटकांना देशातून बाहेर काढले आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी नग्नतेचे प्रदर्शन, पोलिसांशी बाचाबाची अशा घटनांचा समावेश आहे. परदेशी पर्यटकांची बेशिस्त वागणूक बालीमधील यंत्रणांसाठी आता डोकेदुखी ठरू लागली आहे.

पर्यटकांचे अश्लाघ्य कृत्य

नुकतेच एका डॅनिश महिलांचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये मोटारसायकलवरून फिरत असताना तिने अश्लाघ्य कृत्य करीत अंगप्रदर्शन केले होते. या व्हायरल व्हीडीओनंतर सदर महिलेला अटक करून १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मागच्या आठवड्यात उबूड येथील एका मंदिरात एका जर्मन महिलेने नग्नावस्थेत नृत्य केले होते. स्थानिक प्रशासनाने या महिलेला ताब्यात घेऊन मानसिक उपचारासाठी पाठविले आहे.

एप्रिल महिन्यात, एका रशियन महिलेची रवानगी मॉस्को येथे करण्यात आली. ७०० वर्षे जुन्या एका पवित्र वडाच्या झाडासमोर नग्नावस्थेत फोटो काढल्यामुळे या महिलेचा स्थानिक हिंदू नागरिकांसोबत वाद झाला होता. त्यानंतर तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. आणखी एका रशियन पर्यटकाला त्याच्या देशात धाडण्यात आले आहे. युरी नावाच्या या पर्यटकाने बालीमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या अटॉप माउंट अगुंग येथे अर्धनग्नावस्थेत फोटो काढले होते. यानंतर स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या पर्यटकाने कपडे उतरवून पवित्र पर्वतावर जाण्याचा गुन्हा केला होताच. त्याशिवाय इतर सात जणांबरोबर मिळून नोंदणी न करताच पर्वताच्या टोकावर जाण्याचा प्रयत्न केला होता. या पर्वतावर नोंदणी केल्याशिवाय जाता येत नाही.

कॅनडाचा अभिनेता जेफ्री क्रेगनने केले होते नग्नकृत्य 

काही महिन्यांपूर्वी हेल्मेट न वापरण्यावरून एका परदेशी पर्यटकाची पोलिसांशी बाचाबाची झाली. या घटनेचाही व्हीडीओ व्हायरल झाला होता. आणखी एका ऑस्ट्रेलियन महिलेला हेल्मेट घातले नाही म्हणून वाहतूक पोलिसांनी बाजूला केले होते. त्यावरूनही या महिलेनेदेखील पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता.

कॅनडाचा अभिनेता जेफ्री क्रेगनने मागच्या वर्षी बालीच्या माऊंट बटुर येथे नग्नावस्थेत नृत्य केल्याचा व्हीडीओ समोर आला होता. त्यानंतर जेफ्री यांना इंडोनेशियाने कॅनडात परत पाठवले होते. त्याच वर्षी रशियाने योगा इन्लुएन्सर अलिना फजलिव्हा आणि तिच्या नवऱ्याने ७०० वर्षे जुन्या वडाच्या झाडासमोर नग्नावस्थेत योगा केल्यामुळे दोघांनाही इंडोनेशियातून परत धाडण्यात आले होते.

गड-किल्ल्यांवर मद्यपान करणे पडणार महागात 

गड किल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गडकिल्ल्यांवर मद्यपान करणे आता पर्यटकांना चांगलेच महागात पडणार आहे. किल्ल्यावर मद्यपान करताना कोणी आढळल्यास त्याला आता थेट तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा केली जाणार असून, राज्य सरकारदेखील किमान १० हजार रुपयांचा दंड आकारणार आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली असून, या कारवाईसाठी 'हेरिटेज मार्शल' नेमले जाणार आहेत.  मुनगंटीवार म्हणाले, 'राज्यात ३८७ संरक्षित स्मारके आहेत. मागील सरकारच्या काळात या स्मारकांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले होते. निधीदेखील पुरेसा दिला जात नसल्याने या किल्ल्यांचे पावित्र्य धोक्यात आले होते. आता मात्र जिल्हा नियोजनपैकी सुमारे ५१३ कोटींचा निधी या किल्ल्यांसाठी दिला जाणार असून, ७५ स्मारकांच्या ठिकाणी जनसुविधा निर्माण करण्याचे कार्यही हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी ६५ कोटींचा निधी देण्यात येणार आहे.  शौचालये बांधण्यासाठी सुलभ इंटरनॅशनलला तीस वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे. सर्व ३८७ स्मारकांवर त्यांची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जर कुणी या पुढे किल्ल्यावर मद्यपान करताना आढळल्यास त्याला ३ महिने कारावास आणि १० हजार रुपये दंड भरावा लागेल.'

ऐतिहासिक अवशेषांची दुरवस्था

गडांवर काही ऐतिहासिक अवशेष शिल्लक आहेत. मात्र, फारसे ऐतिहासिक वैभव येथे नाही. काही गडांवरील पाण्याच्या टाक्यांची अवस्था भीषण आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या, कचरा, कागद आढळतो. काही ठिकाणी सिगारेटचे थोटूक, गुटख्याच्या पुड्याही दिसतात. माहितीचा फलकही फार ठिकाणी दिसत नाही. पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता झाल्यास, ते पाणी पिण्यासाठी वापरता येईल. गड चढून आलेल्या पर्यटकांना त्याचा वापर करता येऊ शकेल. गडांवर काही मूर्ती, शिल्पे आढळतात. मात्र, त्यांच्यावर शेवाळे साठलेले दिसते. त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष नाही.

दुर्लक्ष करणे अयोग्य

गडाचे जतन आणि संवर्धन होण्याची गरज आहे. किल्ले इतिहासाचे साक्षीदार आहेत. अशा प्रकारच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संवर्धन आणि संरक्षण होण्याची खूप गरज आहे. त्यामुळे नव्या पिढीला इतिहास कळण्यात मदत होते. ऐतिहासिक गड, कोट, किल्ले, वास्तू, गढी, वाडे मंदिरांचा अभ्यास केल्याने त्या काळातील नानाविध गोष्टी आणि ऐतिहासिक नमुने बघायला मिळतात. त्याचा वापर आजच्या स्थापत्यकलेतही करता येऊ शकतो. या वास्तूंची देखभाल नीट ठेवली, तर ते पाहण्यासाठी पर्यटक परदेशातूनही येतात. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळते. स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होतो. अर्थकारणाला चालना मिळते. अभ्यास आणि संशोधन करता येतं आणि यातूनच परकीय गुंतवणूकदेखील होऊ शकते. याही पलीकडे जाऊन आपल्या देशाची आणि येथील मातीची संस्कृती म्हणून कृतज्ञ भावनेतून ऐतिहासिक वास्तूंचे जतन-संवर्धन होणे आवश्यक आहे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story