संग्रहित छायाचित्र
नुकताच पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील एल थ्री नावाच्या हॉटेलमध्ये काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे शहराचे वातावरण तापले. या याधीही पुणे पोलिसांनी काही हजार कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केल्याची घटना घडली होती. 'उडता पंजाब' सारखं पुणे शहर 'उडतं पुणे' बनत चाललंय अशी टिका होत आहे. दुसरीकडे तरुणाईमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाची क्रेझ दिसून येते. दारु, सिगारेट, गांजा किंवा अन्य अमली पदार्थांचे सेवन करणे तरुणाईला 'कूल' वाटते. परंतु असल्या पदार्थांच्या सेवनामुळे जीवघेणे आजार होवून आरोग्यास हानी पोहचते. किशोरवयीन मुलांमध्ये देखील अमली पदार्थांचे व्यसन वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण ‘जागतिक अमली पदार्थ विरोधी दिना’बद्दल जाणून घेणार आहोत.
दरवर्षी २६ जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन (International Day against Drug Abuse and Illicit Trafficking ) म्हणून साजरा केला जातो. १९८८ पासून हा दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. अमली पदार्थांच्या सेवनाच्या संदर्भात एक अहवाल ७ सप्टेंबर १९८७ रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेने सादर केला होता. या अहवालात समाजाला अमली पदार्थमुक्त करण्यासंदर्भात शिफारशी होत्या. हा अहवाल जवळपास सर्व देशांकडून स्वीकारला गेला. त्यानंतर २६ जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले.
धकाधकीच्या जीवनात लोक दारू, सिगरेट , गांजा, इतर अमली पदार्थांचं सेवन करतात. या पदार्थांच्या सेवनाने त्यांना आनंद मिळतो. मात्र त्यामुळेच या पदार्थांचे सेवन वाढते. तरुण,तसेच किशोरवयीन मुले-मुलीही अशा प्रकारच्या अमली पदार्थांचं सेवन करतात. याचा त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. तसेच या पदार्थांची तस्करीही होत असते. त्यामुळे जनजागृती करण्यासाठी २६ जून हा दिवस जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम
- अमली पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगाचा धोका असतो
- रक्तदाब, हृदयविकाराचे आजार यांचा धोका अमली पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो.
- हिंसक वृत्ती वाढते
- व्यक्ती शारीरिक आणि मानसिकरित्या कमकुवत बनते.
- मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका अमली पदार्थांच्या सेवनामुळे वाढतो.