संग्रहित छायाचित्र
पुणे: अमली पदार्थांची तस्करी करणारा ललित पाटील २ ऑक्टोबर २०२३ रोजी ससून रुग्णालयातून पसार झाला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेने दोन हजार सहाशे पानांचे पुरवणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. सचिन वाघच्या मदतीने ललित पाटील ससूनमधून पसार झाला होता असे आरोपपत्रात म्हटले आहे. सोबत ४५ साक्षीदारांची यादीही जोडण्यात आली आहे. हे आरोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील (३४), साथीदार अभिषेक बलकवडे (३१), मैत्रिणी अर्चना किरण निकम (३३) आणि ॲड.प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा रोहित माहिरे (३९) (सर्व रा. - नाशिक) तसेच रोझरी एज्युकेशन ग्रुपचा भागीदार विनय अरहाना (वय ५०, रा. लष्कर), त्याचा मोटारचालक दत्तात्रेय डोके (वय ४० रा. हडपसर) यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत चार हजार आठशे पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या मध्ये कोठडीतून पसार होणे, कायदेशीर अटक होण्यास विरोध करणे, गुन्हेगारी कट रचणे, पुरावा नष्ट करणे अशा कलमांखाली आरोप लावण्यात आले आहे.
मेफेड्रोन नावाचे ड्रग्स बाळगल्याप्रकरणी ललित पाटीलला चाकणमध्ये ऑक्टोबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. मूत्राशयाशी संबंधित आजार झाल्याचे सांगून तो ससून रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र त्याने ससून रुग्णालयातूनच मेफेड्रोनची विक्री करण्यास सुरुवात केली. गुन्हे शाखेने याविरोधात सापळा रचला आणि ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर २ कोटी रकमेचे मेफेड्रोन जप्त केले होते. त्यानंतर झालेल्या तपासात हे स्पष्ट झाले की या अमली पदार्थ विक्रीचा सूत्रधार ललित पाटील हाच आहे. दरम्यान २ ऑक्टोबर २०२३ रोजी सचिन वाघच्या मदतीने ललित ससून रुग्णालयातून पसार झाला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ललितला १७ ऑक्टोबर २०२३ ला अटक केली. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पोलिसांनी सचिन वाघलाही अटक केली होती.
पोलीस आयुक्त रितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करून ललित आणि त्याच्या साथीदारांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.