संग्रहित छायाचित्र
पुणे : टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने खडकी येथील एका तरुणाची आठ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सुनील कुमार रमेशचंद्र (वय ३५, रा. खडकी, पुणे) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात विविध टेलिग्राम आयडी आणि लिंक वापरकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ३ डिसेंबर ते ५ डिसेंबर या काळात फिर्यादी यांना राहत्या घरी संपर्क साधला. फिर्यादी यांना हॉटेल रेटिंगचे रिव्हीव्ह ट्रेडिंग व प्रिपेड टास्क अशा वेगवेगळ्या नावाने टास्क पूर्ण करण्यास सांगून जास्त कमिशन मिळण्याचे खोटे आमिष दाखवले. तसेच फिर्यादी यांना पैसे जमा करण्यास सांगितले. सुरुवातीला किरकोळ रक्कम देवून अधिकचे पैसे मिळत असल्याचे भासवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यांना अधिक रक्कम देण्यास भरीस पाडले. फिर्यादी यांची ८ लाख १ हजार २५० रुपयांची फसवणूक करण्यात आली. पोलीस निरीक्षक चोरमले पुढील तपास करत आहेत.