संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. अशातच महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या काही घटना घडत असतात. माणुसकीला काळिमा फासणारी अशीच एक घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे. पत्नीला तिसरी मुलगीच झाली म्हणून पतीला राग आला. संतापाच्या भरात त्याने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
मैना काळे असं या महिलेचं नाव असून या घटनेत तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी परभणी पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जातो आहे. महिलेची मुलगी भाग्यश्री हिने आरोपी वडिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तिसरी मुलगी झाली म्हणून वडील आईला मारहाण आणि शिवीगाळ करत होते, असं तिने तक्रारीत म्हटलं आहे. तसेच वडिलांनी आईला पेट्रोल टाकून पेटवलं, असेही तीने तक्रारीत नमूद केलं आहे.
आरोपी कुंडलिक उत्तम काळे (वय ३२) याने आपली पत्नी मैना हिला तिसरी मुलगी झाली म्हणून अंगावर पेट्रोल टाकून पेटवले. गुरुवारी (२६ डिसेंबर) ही घटना घडली. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नाका परीसरात हा सगळा प्रकार घडला. मैना यांच्या बहिणीने सांगितले की, मैना हिला तिसरी मुलगी झाल्याने आरोपी कुंडलिक काळे याने तिला अनेकदा शिवीगाळ तसेच मारहाण केली. तसेच दोन्ही मोठ्या मुलींना देखील त्याने मारहाण केली होती.
गुरुवारी मैना आपल्या नातेवाईकांना भेटायला रुग्णालयात गेली होती. आरोपीने तिला फोन करून घरी बोलावून घेतले. तिला मारहाण केली. तिच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि काडीपेटीने आग लावली. पेटलेल्या अवस्थेत तिने घराबाहेर धाव घेतली. लोकांनी आग विझवली. मात्र ती ९९ टक्के भाजली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखळ होत महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
काळजाचा थरकाप उडवणारा हा सगळा प्रकार शेजारच्या दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.