पुण्यात रेल्वे उडवून देण्याचा प्रयत्न; रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ
पुणे : पुण्यामध्ये शेकडो प्रवासी घेऊन जात असलेली रेल्वे उडवून घातपात घडविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रेल्वेच्या चालकाच्या प्रसंगावधानामुळे हा अनर्थ टळला. गाडी नंबर १२०२६ या सिकंदराबाद - पुणे शताब्दी रेल्वे गाडी समोर उरळी रेल्वे स्टेशन ते लोणी रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅकवर घरगुती वापराचा गॅस सिलेंडर ठेवण्यात आलेला होता. रेल्वे चालकाने लांबूनच हा सिलेंडर ओळखला आणि ही गाडी तात्काळ थांबवली. तसेच, सिलेंडर बाजूला केला. याविषयी स्टेशन मास्तर यांना माहिती दिल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी ऊरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५, ३२७, रेल्वे अधिनियम कायदा कलम १९८९ चे चे कलम १५० (१), (ए), १५२, १५३ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी शरद शहाजी वाळके (वय ३८, रा. सार्थक रेसिडेन्सी, केसनंद रोड, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २९ डिसेंबर रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास उरूळी कांचन गावचे हद्दीत रेल्वे विद्युत पोल किलोमीटर नंबर २१९/७-५ पुणे बाजूकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाळके हे रेल्वे सुरक्षा बलमध्ये लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात सहा महिन्यांपासून सहायक फौजदार म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी ड्युटीवर असताना त्यांना मंडळ सुरक्षा नियंत्रण कक्षाकडून घटनेची माहिती कळवण्यात आली.
२९ डिसेंबर रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्सप्रेस ही पुण्याकडे येत होती. या गाडीवर लोकोपायलट म्हणून आर . टी. वाणी हे काम करीत होते. ही गाडी उरूळीकांचन रेल्वे स्टेशन समोरील पुण्याकडे जाणाऱ्या मुख्य रेल्वे ट्रॅकवर मालगाडी उभी असल्याने बाजुच्या ट्रॅकने घेण्यात आली होती. त्यानंतर, ही गाडी पुन्हा मुख्य रेल्वे ट्रॅकवर घेण्यात आली. उरूळी कांचन गावच्या हद्दीत असलेल्या एका रेल्वे विद्युत पोल जवळ रेल्वे ट्रॅकवर प्रिया गोल्ड कंपनीचा लहान आकाराचा गॅस सिलेंडर ठेवलेला होता. साधारणपणे चार किलो वजनाचा हा गॅस सिलेंडर भरलेला होता. लोको पायलट वाणी यांना रेल्वे ट्रॅकवर लांबूनच लाल रंगाची मोठी वस्तू असल्याचे दिसले. त्यांनी गाडीचा वेग कमी केला.
परंतु, रेल्वेचा वेग अधिक असल्याने गाडी नियंत्रणात येण्यास वेळ लागला. त्यावेळी गाडीची या सिलेंडरला हलकी धडक बसली. त्यानंतर लोको पायलट वाणी व ट्रेन मॅनेजर केतन रत्नानी यांनी खाली उतरून ट्रॅकवर असलेला या सिलेंडरचे निरीक्षण केले. लोको पालयट वाणी यांनी उरुळीकांचन रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर यांना याबाबतची माहिती कळवली. हा गॅस सिलेंडर ताब्यात घेण्यात आला. पुणे रेल्वे स्टेशन येथे सिलेंडर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या ताब्यात देण्यात आला. गॅस सिलेंडर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने रेल्वे गाडीचे, रेल्वे ट्रॅकचे तसेच रेल्वेमधील प्रवाशांच्या जीवितास हानी पोचविण्याच्या उद्देशाने व धोका निर्माण करण्याचे हेतूने ठेवल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाजगीरे करीत आहेत.