संग्रहित छायाचित्र
पुणे : आपण रेल्वेत तिकीट तपासणीस असल्याचे सांगून कुटुंबातील दोघांना रेल्वेत नोकरीस लावून देण्याच्या आमिषाने निवृत्त लष्करी जवानाची १७ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी एका निवृत्त जवानाने फिर्याद दाखल केली असून त्यानुसार संजीवनी पाटणे (वय २७, रा. केदारी पेट्रोल पंपाजवळ, वानवडी), शुभम मोड (रा. येवलेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला संजीवनी पाटणे हिने आपण रेल्वेत तिकीट तपासणीस असल्याचे फिर्यादींना सांगितले होते. तसेच फिर्यादी यांची पुतणी आणि भाची यांना रेल्वेत नोकरीस लावून देते असे सांगितले आणि त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून पैसे घेतले.
आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या भाचीचे रेल्वेतील नियुक्तीचे बनावट पत्र पाठवले. तसेच पुतणीला नोकरीस लावल्याबाबत पैसे बँकेत भरल्याची कागदपत्रे देखील मोबाइलवर पाठवली. तसेच आरोपी महिलेने आपला पती आजारी असून त्यांना औषधोपचाराची गरज असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. त्यासाठी वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे घेतले. फिर्यादी यांनी आरोपी महिलेला १७ लाख २७ हजार रुपये घेतले. बरेच महिने नोकरी न मिळाल्याने फिर्यादी यांनी महिलेला पैसे परत मागितले. मात्र, तिने पैसे देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहे.