संग्रहित छायाचित्र
पुणे: कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार महेश उर्फ दाद्या बबन गजेसिंह, (वय-२९ वर्षे, रा. शिवदत्त कॉलनी,घोरपडी गाव, कवडे रोड मुंढवा व टिळेकरनगर गल्ली नं.३, कोंढवा-बुद्रुक पुणे) याच्यावर पोलीस आयुक्त रितेश कुमार (Ritesh Kumar) यांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी गजेसिंह यास नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे एक वर्षाकरिता स्थानबध्द करण्याचे आदेश दिले आहे. (Pune Crime News)
गजेसिंह हा सराईत गुन्हेगार असून त्याने साथीदारांसह मुंढवा, हडपसर, वानवडी व कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत माजवली होती. कोयता, तलवार, लाकडी दांडके यांसारख्या जीवघेण्या हत्यारांसह त्याने खून, मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्न, जबरी चोरी किंवा दरोडा, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घराविषयी आगळीक, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर सहा गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.
त्याच्या अशा कृत्यांमुळे त्याची दहशत निर्माण झाली होती.तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्याच्या दहशतीमुळे कुणीही नागरिक त्याच्याविरोधात उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हता. त्यामुळे प्राप्त प्रस्ताव आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करून पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गजेसिंह याच्यावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करून त्यास नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षाकरिता स्थानबध्द करण्याचे आदेश दिले आहे.
महेश उर्फ दाद्या बबन गजेसिंह यास स्थानबध्द करण्याची कारवाई कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पी.सी.बी.गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्या अधिपत्याखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.
दहशत निर्माण करणाऱ्या सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये आतापर्यंत एकूण ९४ कारवाया केल्या आहेत.