परदेशी शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांची यादी कधी?

सारथी संस्थेतर्फे मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

नावे निश्चित करण्यास विलंब झाल्याने फटका, 'सारथी'कडून शिष्यवृत्ती मिळण्याच्या आशेवर असलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर

सारथी संस्थेतर्फे मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना  दिल्या जाणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. परदेशातील विद्यापीठ आणि महाविद्यालये सुरू झाली असून, 'सारथी'कडून शिष्यवृत्ती मिळण्याच्या आशेवर असलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे 'सारथी'कडून यादी कधी जाहीर केली जाणार, असा प्रश्न संतप्त विद्यार्थी विचारत आहेत.

'सारथी', 'बार्टी', 'टीआरटीआय' आणि 'महाज्योती' आदी विविध संस्थांकडून अनुक्रमे मराठा, एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परदेशातील नामांकित टॉप २०० शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळते. यामध्ये सारथी संस्थेकडून दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. यंदा मराठा आणि कुणबी समाजातील १४२ विद्यार्थ्यांनी 'सारथी'कडे या शिष्यवृत्तीसाठी अर्ज आले आहे.

यातील ७५ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची निवड 'सारथी'कडून केली जाणार आहे. मात्र, 'सारथी'कडून विद्यार्थ्यांची यादी अंतिम करून राज्य सरकारकडे मंजुरीला पाठविण्यास विलंब झाला आहे. ही यादी सरकारकडे पाठवून जवळपास १० दिवस उलटल्यावरही ती अंतिम केलेली नाही.

युरोपातील बहुतांश सर्वच अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू झाली आहेत. आता शिष्यवृत्ती मिळण्याच्या आशेवर इकडे प्रवेश घेतला आहे. मात्र 'सारथी'कडून विलंब होत असल्याने या वर्षीच्या प्रवेशावर अद्यापही टांगती तलवार आहे, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘सीविक मिरर’ला दिली.

यादी आचारसंहितेच्या कचाट्यात?

मराठा विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाऊ नये, अशी सरकारची इच्छा दिसत आहे. अर्ज प्रक्रिया तीन महिन्यांपूर्वीच पार पडली असताना अंतिम यादी जाहीर करण्यासाठी आचारसंहिता लागण्याची सरकार का वाट पाहात होते हा प्रश्न आहे. एकीकडे अन्य सर्व घटकांतील विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात पोहोचले आहेत. आता ही यादी आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे. निष्क्रीय अधिकाऱ्यांमुळे मराठा विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, अशी टीका स्टुडंट हेल्पिंग हँड्स संस्थेचे अध्यक्ष अॅड. कुलदीप आंबेकर यांनी केली आहे

 

राज्य सरकारकडे विद्यार्थ्यांची यादी पाठविली आहे. त्याला मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही दिवसात अंतिम यादी जाहीर होईल.
- अशोक काकडे, व्यवस्थापकीय संचालक, सारथी 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest