खेड शिवापूरला पकडली पाच कोटींची रोकड
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू करण्यात आलेली असून जागोजाग वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. पुणे-सातारा महामार्गावर असलेल्या खेड-शिवापूर (Khed-Shivapur) टोल नाक्यावर सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास तब्बल पाच कोटी रुपयांची रोकड (Five Crore Cash) जप्त करण्यात आली. एका खासगी वाहनामधून ही रक्कम घेऊन जात असताना पोलिसांनी प्राप्तीकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या संयुक्त पथकाने पकडली. या रकमेची मोजदाद करण्यात आली. त्यानंतर, ही रक्कम कोणाची आहे आणि कोठे चालली होती याबाबत तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, ही रक्कम रस्ते बांधकाम व्यावसायिकाची असल्याचे समोर आले असून तसा जबाब संबंधितांनी दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
सुरुवातीला ही रक्कम पकडण्यात आल्यानंतर पोलीस दूरक्षेत्रामध्ये नेण्यात आली. तेथे या रकमेची मोजणी करण्यात आली. त्यानंतर रीतसर पंचनामा करून ही रक्कम ट्रेझरीमध्ये पहाटे जमा करण्यात आली आहे. या खासगी वाहनासोबत चार जण होते. त्यांची देखील चौकशी करण्यात आली. दरम्यान, या विषयी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली. देशमुख म्हणाले, की प्राप्तीकर विभाग आणि निवडणूक आयोग यांच्यासोबत मिळून पोलिसांनी ही कारवाई केली. नाकाबंदीमध्ये पकडण्यात आलेल्या गाडीमध्ये ५ कोटी रुपये होते. त्यामध्ये ५०० रुपयांच्या सर्व नोटा होत्या. त्यानंतर ऑन कॅमेरा या रकमेचा पंचानामा करण्यात आला. ही रक्कम प्राप्तीकर विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.
वाहनासोबत असलेल्या व्यक्तींनी ही रक्कम त्यांचीच असून ते सर्वजण व्यावसायिक असल्याचे सांगितले आहे. हे सर्व रस्ते बांधकाम व्यावसायिक असल्याचे सांगत आहेत. हे पैसे कुठूनं आले आणि कुठे चालले होते याबाबत तपास सुरु आहे. दरम्यान, त्यांनी ही रक्कम असलेली गाडी मुंबईवरून कोल्हापूरच्या दिशेने जात होती असे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, व्यावसायिकाने ही रक्कम आपलीच असल्याचा जबाब प्राप्तीकर विभागाला दिला आहे. या रकमेच्या वाहतुकीत राजकीय संबंध आहेत का याचा तपास केला जात असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान पकडलेल्या गाडीचा क्रमांक एमएच ४५, एएस २५२६ असा आहे. ही गाडी अमोल नलावडे यांच्या मालकीची आहे. मात्र, त्यांनी ही गाडी बाळासाहेब आसबे यांना विकल्याचा दावा केला आहे. नलावडे हे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. ही रक्कम पडकण्यात आल्यानंतर शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी ट्विट करीत आमदार शहाजी पाटील यांना डिवचले होते. यामध्ये त्यांनी १५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता असे नमूद करीत पैसे वाटपाचा आरोप केला होता.