डेंगी, चिकुनगुन्याचा पुणे शहरात कहर

पुणे: शहरात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंगी आणि चिकुनगुन्याचा उद्रेक झाला आहे. शहरात महिनाभरात डेंगीचे ४९२ संशयित रुग्ण तर चिकुनगुन्याचे २६१ रुग्ण आढळले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 22 Oct 2024
  • 01:11 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

संसर्ग वाढत असल्याने आरोग्यतज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा

पुणे: शहरात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला असून, डेंगी आणि चिकुनगुन्याचा उद्रेक झाला आहे. शहरात महिनाभरात डेंगीचे ४९२ संशयित रुग्ण तर चिकुनगुन्याचे २६१ रुग्ण आढळले आहेत. चिकुनगुन्याच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच रुग्णांमध्ये वेगळी आणि तीव्र लक्षणे दिसून येत आहेत. यामुळे आरोग्यतज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात ६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर कालावधीत डेंगीचे ४९२ संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील ३० निदान झालेले आहेत. या वर्षभरात डेंगीचे एकूण ४ हजार ५६ संशयित रुग्ण सापडले आहेत आणि त्यातील ३२४ निदान झालेले आहेत. चिकुनगुन्याचे महिनाभरात २६१ रुग्ण आढळले आहेत. चिकुनगुन्याची एकूण रुग्णसंख्या ३४७ वर पोहोचली आहे. डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. शहरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी सातत्याने सुरू आहे. हवामानात सातत्याने बदल होत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे हिवताप, डेंगी, चिकुनगुन्याच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. विशेषत: चिकुनगुन्याच्या रुग्णांमधील वाढ चिंताजनक आहे. कारण या रुग्णांमध्ये वेगळी आणि तीव्र लक्षणे दिसून येत आहेत. आधी या रुग्णांमध्ये ताप आणि सांधेदुखी ही लक्षणे दिसून येत होती. आता हृदयाच्या आवरणावर सूज आणि मेंदूज्वर यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. आतापर्यंत अशी लक्षणे चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये दिसून येत नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.

चिकुनगुन्याची सामान्य लक्षणे

- ताप, सांधेदुखी

- चिकुनगुन्याची नवीन लक्षणे

- हृदयाच्या आवरणाला सूज, मेंदूज्वर

आजारापासून संरक्षणासाठी काय करावे

- आपली भोवतालचा परिसर स्वच्छ, कोरडा ठेवा.

- घरात मच्छरदाणी, डास प्रतिबंधात्मक औषधांचा वापर करा.

- नेहमी उकळून थंड केलेले पाणी प्या.

- खाण्याआधी भाज्या, फळे स्वच्छ धुवून खा.

- रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे शक्यतो टाळा.

६ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर रुग्णसंख्या

- डेंग्यूचे संशयित रुग्ण – ४९२

- डेंग्यूचे निदान झालेले रुग्ण – ३०

- चिकुनगुन्याचे रुग्ण – २६१

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest