कंबरेखालचा भाग निकामी होऊनही १३ वर्षीय मुलगी पुन्हा उभी राहिली; गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमुळे दुर्मीळ आजारापासून दिलासा

एका १३ वर्षीय मुलीला दुर्मीळ आणि गंभीर असलेला मणक्याचा क्षयरोग झाला. तिच्यावर उपचार सुरू करून क्षयप्रतिबंधक औषधे देण्यात आली. मात्र, तिचा आजार आणखी बळावत जाऊन तिला ‘पॅराप्लेजिया’म्हणजेच कंबरेपासून खालचा भाग अर्धांगवायूने निकामी झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 22 Oct 2024
  • 01:29 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

एका १३ वर्षीय मुलीला दुर्मीळ आणि गंभीर असलेला मणक्याचा क्षयरोग झाला. तिच्यावर उपचार सुरू करून क्षयप्रतिबंधक औषधे देण्यात आली. मात्र, तिचा आजार आणखी बळावत जाऊन तिला ‘पॅराप्लेजिया’म्हणजेच कंबरेपासून खालचा भाग अर्धांगवायूने निकामी झाला. डॉक्टरांनी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे या मुलीवर उपचार केले. यानंतर १५ दिवसांत तिच्या शरीराच्या कंबरेपासून खालच्या भागाची हालचाल पूर्ववत झाली आहे.

या मुलीला सुरुवातीला दोन महिने पाठीच्या वरच्या भागात तीव्र वेदना होत होत्या. पुण्यातील सरकारी रुग्णालयात तिने सुरुवातीला उपचार घेतले. तिथे तपासणीत मणक्याच्या क्षयरोगाचे निदान झाले. तिला क्षय प्रतिबंधात्मक औषधे सुरू करून विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर तिची प्रकृती खालावली. पुढील दोन महिन्यांत तिच्या पाठदुखीची तीव्रता आणखी वाढली आणि अखेरीस तिला ‘पॅराप्लेजिया’ झाला. त्यानंतर तिला डेक्कन जिमखाना येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सह्याद्री हॉस्पिटलमधील डॉ. राजेश पारसनीस आणि त्यांच्या पथकाने तिच्या तपासण्या केल्या. डॉ. पारसनीस यांनी ताबडतोब ‘डी१ – डी६ डोर्सल डीकम्प्रेशन’ आणि ‘पेडिकल स्क्रू फिक्सेशन’ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. याद्वारे नसांवरील दबाव दूर करून आणि मणक्याला स्क्रूने आधार देऊन जंतुसंसर्ग झालेली जागा निर्जंतुक करण्यात आली. अचूक स्क्रू बसवण्याकरिता ‘ओ-आर्म नेव्हिगेशन’ आणि ‘इंट्रा-ऑपरेटिव्ह न्यूरो-मॉनिटरिंग’ अशा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानामध्ये पाठीच्या कण्याच्या कार्याचे मूल्यांकन अचूक वेळेत केले जाते. यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान अचूकता व सुरक्षिततेची खात्री राहते. त्वरित निदान आणि अचूक शस्त्रक्रियेमुळे या मुलीच्या प्रकृतीत केवळ तीन दिवसांत सुधारणा झाली. शस्त्रक्रियेनंतरच्या पंधराव्या दिवशी ती कोणत्याही आधाराशिवाय स्वतंत्रपणे चालू लागली. मणक्याचा क्षय हा फुफ्फुसाच्या क्षयरोगाच्या तुलनेने कमी प्रमाणात आढळणारा एक प्रकार आहे. फुफ्फुसाचा क्षयरोग झाल्यानंतर दुय्यम संसर्ग म्हणून काही व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. शहरी भागात मणक्याच्या क्षयाचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. शहरात १ लाख लोकसंख्येमध्ये १.४३ प्रकरणे इतके प्रमाण आहे, तर ग्रामीण भागात १ लाख लोकसंख्येमध्ये ०.७६ प्रकरणे इतके प्रमाण आहे. त्वरित उपचार न केल्यास या आजाराचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest