संलग्नतेअभावी बीबीए, बीसीए, बीबीएम, बीसीएम कॉलेज बंद

संगणक आणि व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रम बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए), बॅचलर ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट (बीबीएम), बॅचलर ऑफ कम्प्युटर मॅनेजमेंट (बीसीएम) कोर्स राबविणाऱ्या महाविद्यालयांना

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेशी (एआयसीटीई) संलग्न असणे बंधनकारक, वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन नाही

संगणक आणि व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रम बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए), बॅचलर ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट (बीबीएम), बॅचलर ऑफ कम्प्युटर मॅनेजमेंट (बीसीएम) कोर्स राबविणाऱ्या महाविद्यालयांना या शैक्षणिक वर्षापासून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेशी (एआयसीटीई) (All India Technical Education Council) संलग्न असणे बंधनकारक करण्यात आले आहे. वारंवार सूचना देऊनदेखील राज्यातील काही महाविद्यालयांनी संलग्नता न केल्याने शहरी आणि बहुतांश ग्रामीण भागातील महाविद्यालयांमधील हे चार कोर्सेस बंद झाले आहेत.

परिणामी हजारो विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी मोठी अडचण झाली आहे. बीबीए, बीसीए, बीबीएम,  बीएमएस  हे कोर्सेस यापूर्वी संबंधित महाविद्यालयांकडून चालविले जात होते. यासाठी महाविद्यालयाकडून प्रत्येक विद्यार्थ्याकडून १० ते १२ हजार शैक्षणिक शुल्क आकारले जात होते. या वर्षापासून ‘एआयसीटीई’ने हे चार कोर्सेस आपल्या अखत्यारित घेतले आहेत. त्यासाठी महाविद्यालयांना संलग्नता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु राज्यातील काही महाविद्यालयांनी संलग्नता घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली तर सातारा येथील महाविद्यालयांनी ‘एआयसीटीई’ संलग्नता आणि राज्य सरकारची मान्यता घेणे गरजेचे होते. परंतु संलग्नतेची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. दरम्यान बीबीए, बीसीए, बीबीएम, बीसीएम प्रवेशासाठी दोन वेळा ‘सीईटी’ घेण्यात आली. काही खासगी महाविद्यालयांनी संलग्नता केल्याने त्यांच्याकडील सर्व जागा भरल्या आहेत. दुसरीकडे राज्यभरातील ज्या महाविद्यालयांनी संलग्नता घेतली नाही, अशा महाविद्यालयांतील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

विद्यार्थी प्रतिनिधी प्रफुल्ल सोनवणे म्हणाले, ‘‘राज्यभरात हजारो विद्यार्थ्यांनी सीईटी दिल्यानंतर विविध कोर्सेससाठी प्रवेश निश्चित केले. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिली नाही. त्यांचे प्रवेश संलग्नता प्रक्रिया न झालेल्या महाविद्यालयांमध्ये झाले. आता दोन महिन्यांनंतर हे कोर्स शिकविणाऱ्या शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांची मान्यता रद्द झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात गेले आहे. ज्यांनी फी भरली त्यांना फी परत दिली जावी. तसेच त्यांचे प्रवेश लगतच्या महाविद्यालयात केले जावे, अशी आमची मागणी आहे.’’

बहुतांश महाविद्यालये ग्रामीण भागातील
नाव न छापण्याच्या अटीवर उच्च तंत्रशिक्षण संचालनालयातील उच्च पदस्थ अधिकारी ‘सीविक मिरर’ला माहिती देताना म्हणाले, ‘‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला (एआयसीटीई) संलग्न करण्याचे आदेश शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला संबंधित विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांना देण्यात आले होते. ज्यांनी ही प्रक्रिया केली त्यांची अडचण नाही. परंतु बहुतांश महाविद्यालये ही ग्रामीण भागातील आहेत. त्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात सर्व महाविद्यालयांनी विद्यापीठांशी संपर्क साधावा. त्यानंतर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) स्तरावर योग्य तो निर्णय घेतला जाईल.’’

ग्रामीण भागातील विद्यार्थांसाठी बीबीए (BBA), बीसीए (BCA) अभ्यासक्रम उपयुक्त आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार, व्यवसायाच्या संधी निर्माण होतात. असे असताना ग्रामीण भागातील महाविद्यालयांमधील हे अभ्यासक्रम बंद होत असतील तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय घातक आहे.

- प्रा. डॉ. प्रवीण जाधव, सचिव, शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट टीचर्स असोसिएशन (सुम्टा)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest