संग्रहित छायाचित्र
पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधूमाळीत प्राप्तीकर विभाग सक्रिय झाला आहे. महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या पुण्यातील घरावर प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांनी या कारवाईदरम्यान महत्वाची कागदपत्रे आणि फाईल्स ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून याला राजकीय किनार असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कटके हे भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे मेहुणे आहेत.
अभिजीत कटके यांचे वडील चंद्रकांत कटके हे वाघोली येथे राहण्यास आहेत. मंगळवारी सकाळी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी व कर्मचारी वेगवेगळ्या वाहनांमधून या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी छापा टाकत सर्व सदस्यांना बाहेर जाण्यास मनाई केली. तसेच, सर्वांचे फोन काढून घेतले. दरम्यान, घरामध्ये झाडाझडती घेत कटके यांच्याकडे विचारपूस केली. तसेच, घरामधून काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. चंद्रकांत कटके हे भाजपाचे माजी नगरसेवक आणि कोथरूड विधानसभेसाठी इच्छुक असलेले अमोल बालवडकर यांचे सासरे आहेत. कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून बालवडकर हे नाराज असून ते बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. यापुर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यातच ही कारवाई झाल्याने त्याला राजकीय किनार आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांनी एकदा महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला. तर दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी ठरले आहे. कटके पुण्यातील शिवरामदादा तालमीचा पहिलवान असून २०१५ मध्ये युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता. त्यांनी २०१६ मध्ये ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.