सिंहगडलगत बिबट्याकडून दोन कुत्र्यांचा फडशा !
पुणे : सिंहगडावर पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना किल्ल्याच्या परिसरात बिबट्यांची पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी गडाच्या घाटरस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर गडाच्या पायथ्याच्या मणेरवाडी, थोपटेवाडी येथील खासगी फार्म हाऊसमध्ये बिबट्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडल्याने वन विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
खानापूर, खामगाव मावळ, घेरा सिंहगड परिसरात सध्या पिकांच्या कापणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी सायंकाळी उशिरापर्यंत शेतात काम करत आहेत. पर्यटक तसेच स्थानिक शेतकर्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने जंगल परिसरात रात्रीची गस्त सुरू केली आहे.
सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी समाधान पाटील म्हणाले की, फार्म हाऊसमध्ये दोन कुत्र्यांचा बिबट्या सदृश हिंस्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
मात्र, या परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले नाहीत. गवत झुडपे असल्याने ठसे दिसत नाहीत. असे असले तरी सिंहगड परिसरात मादीसह चार ते पाच बिबट्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे खबरदारीसाठी जनजागृती केली जात आहे. शेतकर्यांनी सायंकाळनंतर दूर अंतरावरील शेतात जाऊ नये. तसेच सायंकाळनंतर गडावर व परिसरातील वनक्षेत्रात पर्यटकांनी थांबू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे. सिंहगड घाटरस्ता व परिसरात वन विभागाने खबरदारीचे फलकही लावले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.