शपथविधीआधीच कंत्राटी भरती सुरू; बहुमताचे सरकार तरी कायमस्वरूपी भरती करणार का, विद्यार्थ्यांनी उपस्थित केला प्रश्न

कंत्राटी भरती हे आमचे पाप नाही, हे पाप कॉंग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे सेनेचे असा आरोप करत शिंदे सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मोठे आंदोलन उभारून तसेच वारंवार कंत्राटी भरती रद्द करण्याची विनंती राज्य सरकारला केली होती.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सरकारच्या दुटप्पी भूमिकेबाबत नाराजी

कंत्राटी भरती हे आमचे पाप नाही, हे पाप कॉंग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे सेनेचे असा आरोप करत शिंदे सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मोठे आंदोलन उभारून तसेच वारंवार कंत्राटी भरती रद्द करण्याची विनंती राज्य सरकारला केली होती. त्यानंतर कंत्राटी भरती रद्द केल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र मागच्या दाराने कंत्राटी भरती सुरूच होती. निवडणूक पार पडताच तसेच नवीन सरकारचा शपथविधी होण्यापूर्वी विविध विभागाच्या रिक्त पदांसाठी नोकरभरती सुरू करण्यात आली आहे.

 राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी सरकारच्या या दुटप्पी भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयातील ४४ रिक्त पदांसाठी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागात २०८ पदांसाठी कंत्राटी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, तर इतर मागास बहुजन कल्याण विभागाची आस्थापना, क्षेत्रीय कार्यालये, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) आणि इतर मागासवर्गीयांच्या वसतिगृहांसाठी कंत्राटी भरती केली जाणार आहे. त्यासाठी सेवापुरवठादार कंपनीची निवड करण्यात आली आहे.

 या माध्यमातून ओबीसी विभागात ८७० कंत्राटी पदांची भरती होणार आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाने कंत्राटी भरती करणार नाही, असे जाहीर केले असतानाही विविध विभागात सेवापुरवठादार कंपनीमार्फत कंत्राटी भरती सुरूच असल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने दिलेला शब्द फिरवल्याने राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

कोणत्या सरकारवर विश्वास ठेवावा, हेच समजत नाही...
राज्यात कोणतेही सरकार आले तरी खासगी कंपन्यांच्याच हिताचे निर्णय घेत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे कितीही गाजावाजा केला तरी कंत्राटी भरती रद्द झालेली नाही. खासगी कंपनीच्या माध्यमातून नोकर भरती राबवून भ्रष्टाचाराला बळकटी राजकारणी देत असून त्यातून मिळणारा आर्थिक मोबदल्याचा मलिदा वाटून खाल्ला जात आहे. त्यामुळे आता कोणत्या सरकारवर विश्वास ठेवावा, हे समजत नसल्याची भावना विद्यार्थ्यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना व्यक्त केली.

राज्य सरकारकडून कायमस्वरूपी नोकरभरती करणे अपेक्षित आहे. राज्यातील अनेक गरीब कुटुंबातील तरुण गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. त्यांच्या तोंडाला पुसण्याचे काम शासनाने करू नये. अन्यथा विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल.
-  महेश घरबुडे. अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन

राज्यात महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले आहे. गेल्या पाच वर्षांत पक्ष फोडणे, तसेच नवीन सरकार स्थापण्यात राजकारण्यांचा वेळ गेला. आता स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर लाडकी नोकरीभरती योजना सुरू करून राज्यातील लाखो तरुणांना न्याय द्यावा. कंत्राटी नोकरभरती करून त्यात भ्रष्टाचाराची खाण खोदून मलिदा लाटण्यापेक्षा गोरगरिबांच्या मुलांसाठी कायमस्वरूपी नोकरी द्यावी. अन्यथा तरुण पिढी या राजकारण्यांना माफ करणार नाही.
-  वैभव पाटील, विद्यार्थी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest