येरवडा मनोरुग्णालय वसाहत समस्याग्रस्त; कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर
सोमनाथ साळुंके -
आशिया खंडात नावाजलेल्या येरवडा मनोरुग्णालय वसाहत परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विविध नागरी समस्यांनी घेरले आहे. परिसरातील अस्वच्छ परिस्थितीमुळे येथील कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. समस्यांच्या सोडवणुकीसाठी केलेल्या अर्जांना पालिकेच्या अधिकाऱ्याकडून केराची टोपली दाखवली जाते. वैतागलेले रहिवासी मागील अनेक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
देशातीलच आशिया खंडात नावाजलेले मनोरुग्णालय म्हणून येरवडा येथील मनोरुग्णालयाकडे पाहिले जाते. येथील रुग्णांची सेवा करण्यासाठी कार्यरत असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालया बाहेर वसाहत उभारण्यात आली होती. आज येथील परिस्थिती अतिशय बिकट आहे. राज्य शासन व बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनेक क्वाॅर्टर्सची पडझड झाली आहे. घरांचे भिंतीचे व छप्परांचे फक्त सांगाडे उरले आहेत. कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीमुळे इतरत्र भाड्याने रूम घेऊन राहण्याची वेळ येते.
परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आली आहेत. परंतु स्वच्छतागृहामध्ये विद्युत दिव्यांची सुविधा नाही. स्वच्छतागृह साफ करण्यासाठी कोणताच पालिकेचा कर्मचारी परिसरात फिरकत नाही. अनेक स्वच्छतागृहांत परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रचंड घाणीमुळे नागरिकांना रोज दुर्गंधीस सामोरे जावे लागते. त्यामुळे रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक दारुडे या मोकळ्या घरांचा वापर दारू पिण्यासाठी करतात. त्यामुळे ही वसाहत तळीरामांचा अड्डाच झाली आहे. या दारुड्यांमुळे महिलांना रात्रीचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वच्छतागृह बरोबरच बांधण्यात आलेल्या बाथरूमचीदेखील बिकट अवस्था होऊन अनेक ठिकाणी अशा बाथरूमला झाडाझुडपांचा वेढा आहे.
या वसाहतीमध्ये पालिकेचे कोणतेही कचरावाहन अथवा सफाई कर्मचारी स्वच्छतेसाठी परिसरात फिरकत नाही त्यामुळे कचरा रस्त्यावर टाकण्याची वेळ येते. सांडपाण्याच्या वाहिन्यादेखील साफ केल्या जात नसल्याने त्यातील सांडपाणी रस्त्यावर वाहात असते. अनेक रस्त्यांना गटारीचे स्वरूप येऊन परिसरात मोकाट डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. विशेषतः मनोरुग्णालय वसाहतीचा बहुतांश कारभार पालिकेसह बांधकाम विभागाकडे येतो. रहिवाशांनी वारंवार समस्यांचा पाढा संबंधित अधिकाऱ्याकडे वाचूनदेखील यावर दोन्ही प्रशासन उपाययोजना करत नाही.
सद्य परिस्थितीवरून कर्मचारी कसे या भागात वास्तव्य करत असतील हे त्यांच्या कुटुंबांना व त्यांनाच माहिती आहे. यामुळे या ठिकाणी सुविधा करणे काळाची गरज आहे.
- अन्वर पठाण, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप अल्पसंख्याक मोर्चा
प्रशासनाच्या गैरकारभाराचा फटका येथील वसाहतीमध्ये राहात असलेल्या कर्मचाऱ्यांना सहन करण्याची वेळ येत असेल तर प्रशासन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळत असून समस्येला केराची टोपली दाखवली जात आहे.
- काजोल सोनवणे, महिला येरवडा प्रभाग अध्यक्षा, भाजप
परिसरात अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या भागात घाणीचे साम्राज्य वाढून येथील पसरणाऱ्या दुर्गंधीस नागरिकांना सामोरे जाण्याची वेळ येत असेल तर यासारखी शोकांतिका दुसरी असू शकत नाही.
- इलियास शेख, सामाजिक कार्यकर्ते, येरवडा
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.