संग्रहित छायाचित्र
देशातील उच्च शिक्षण संस्था आता पदवीपूर्व विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी कमी-जास्त करण्याचा पर्याय देणार आहेत. त्यासाठी जलद पदवी कार्यक्रम (एडीपी)आणि विस्तारित पदवी कार्यक्रम (ईडीपी) राबवण्याची परवानगी या आठवड्यात झालेल्या बैठकीत उच्च शिक्षण संस्थांना देण्यात आल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी दिली.
प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक, कौशल्य क्षमतेनुसार अभ्यासक्रम निवडता येणार आहे. विद्यार्थी त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेच्या आधारावर आपल्या अभ्यासक्रमाचा कालावधी कमी किंवा जास्त करण्याचा पर्याय निवडू शकतात. विद्यार्थ्याने एडीपी आणि ईडीपी यापैकी कोणत्या स्वरूपाचे शिक्षण घेतले त्याचा उल्लेख पदवी प्रमाणपत्रावर करण्यात येणार आहे. यासोबतच ही पदवी पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मानक कालावधीच्या पदवीच्या बरोबरीने ग्राह्य धरली जाणार असल्याचे एम. जगदेश कुमार यांनी स्पष्ट केले.
या संदर्भातील मसुदा भागधारकांच्या अभिप्रायासाठी लवकरच सार्वजनिक करण्यात येणार आहे. विद्यार्थी त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेच्या आधारावर आपल्या अभ्यासक्रमाचा कालावधी कमी किंवा जास्त करण्याचा पर्याय निवडू शकतात.
यासंदर्भात एका नामांकित विद्यापीठातील प्राध्यापक संजय पाटील म्हणाले, ‘‘यूजीसीच्या सेमिस्टर कमी जास्त करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. वैयक्तिक, कौटुंबिक आणि प्रशासकीय कारणास्तव लाखो विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले होते, त्यांना दिलासा मिळेल. महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये लाखो विद्यार्थ्यांचे गुणपत्रिका, ट्रान्सफर सर्टिफिकेट आणि डिग्री सर्टिफिकेट अडकून पडले आहेत. परंतु अर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे."
अर्धवट शिक्षण राहिलेली विद्यार्थिनी प्रिया सोनवणे म्हणाली, ‘‘यूजीसीच्या निर्णयाचे स्वागत करते. लग्नामुळे माझे शिक्षण अर्धवट राहिले होते. परंतु आता पुन्हा पदवी शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. लाखो विद्यार्थ्यांना लग्न, नोकरी आणि वैयक्तिक कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडावे लागले, त्यांना पुन्हा नवी संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.’’
अशी आहे योजना
एडीपी अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रात (सेमिस्टर) अतिरिक्त क्रेडिट्स मिळवून तीन किंवा चार वर्षांच्या कमी कालावधीत पदवी पूर्ण करण्याची परवानगी मिळणार आहे. याशिवाय ईडीपी अंतर्गत प्रत्येक सत्रात कमी क्रेडिट घेऊन अभ्यासक्रमाचा कालावधी वाढवण्याचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आला आहे. एडीपी व ईडीपी यापैकी कोणत्याही स्वरूपाचे शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांना मानक कालावधीच्या कार्यक्रमाप्रमाणेच एकूण क्रेडिट्स मिळणार आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.