संग्रहित छायाचित्र
पुणे : दक्षिणेत झालेल्या परतीच्या पावसाचा तडाखा पुण्यातील भाजीपाल्याला बसू लागला आहे. दक्षिणेतील शेवगा लागवडीला या पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यात शेवग्याची आवक घटली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात शेवग्याचा भाव प्रचंड वधारला आहे. एक किलो शेवग्याला प्रतवारीनुसार ५०० ते ६०० रुपये किलोचा दर मोजावा लागत आहे.
राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये ही दरवाढ पहायला मिळते आहे. मागील अनेक वर्षात पहिल्यांदाच शेवग्याच्या दराची ही उच्चांक वाढ नोंदविण्यात आली आहे. बाजारपेठेतील तज्ञ व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवग्याची सर्वाधिक लागवड तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये होते. एरवी शेवग्याचा प्रतिकिलो दर हा १०० ते १२० रुपयांच्या आसपास असतो. मात्र, यंदा शेवग्याला दक्षिणेकडील परतीच्या पावसाचा फटका बसला.
शेवगा उष्ण असल्याने थंडीत या भाजीची मागणी वाढते. किरकोळ बाजारात पावशेर शेवग्याचा दर १२० ते १५० रुपये असल्याने ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे मागणीही घटल्याचे काही व्यापारी सांगत आहेत.बाजारात १० किलोचा दर साधारण साडेतीन हजार ते चार हजार रुपयांपर्यंत पोचला आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही शेवग्याची आवक घटल्याचे पहायला मिळाले. डिसेंबरअखेरीस आवक वाढल्यानंतर दरात घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.