संग्रहित छायाचित्र
पुणे : झिका रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. राज्यात आजमितीस झिका रुग्णांची संख्या १४० वर पोहोचली असून यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात आढळून आली आहे. पुण्यामध्ये झिकाचे १०९ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे १४० रुग्णांपैकी सुमारे ४० टक्के रुग्णसंख्या गर्भवती महिलांची आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली असून तापाच्या रुग्णांच्या सर्वेक्षणाला सुरुवातदेखील केली आहे.
राज्यातील झिकाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आला होता. त्यानंतर राज्यातील २ हजार ६८ संशयित झिका रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान प्रयोगशाळेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले होते. चालू वर्षात २८ नोव्हेंबरपर्यंत त्यातील १४० जणांचे झिकाचे निदान झाले. यामध्ये ६३ गर्भवती महिला आहेत.
याविषयी ‘सीविक मिरर’सोबत बोलताना आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर म्हणाल्या, ‘‘झिकाची लागण झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल व्हावे लागत नाही. या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही नगण्य आहे.’’ नागरिकांना ताप आल्यास घाबरून न जाता डॉक्टरांना दाखवून वेळीच उपचार घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
झिकाचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरात ३ ते ५ किलोमीटर परिसरात तापरुग्णांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून सुरू आहे. याचबरोबर झिकाचा प्रसार एडिस इजिप्ती डासांमुळे होत असल्याने कीटकनाशक फवारणीसह इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
‘मेडिकल हिस्ट्री’ असलेल्या झिकाच्या पाच रुग्णांचा शहरात आतापर्यंत बळी
पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये झिकाचे १०९ रुग्ण आढळून आल्याचे सांगण्यात आले. त्या खालोखाल अहिल्यानगर (संगमनेर) ११ रुग्ण, पुणे ग्रामीण १० रुग्ण, पिंपरी-चिंचवड महापालिका ६ रुग्ण आणि सांगली, मिरज, कोल्हापूर, सोलापूर, दादर (उत्तर) मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. दरम्यान, पुण्यात आतापर्यंत झिकाच्या पाच रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. हे सर्व ज्येष्ठ नागरिक होते. प्रत्येकाला आधीचे काही ना काही आजारपण होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या मृत्यू परीक्षण समितीने दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना
-झिकाचा रुग्ण आढळून आल्यास परिसरात तापरुग्णांचे सर्वेक्षण
-गर्भवती महिलांची प्राधान्याने तपासणी
-सर्व तापरुग्णांवर लक्षणाच्या आधारे उपचार
-गर्भवती महिलांना झिकाच्या धोक्याबाबत मार्गदर्शन
-डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर
-संशयित रुग्णांची माहिती कळविण्याची खासगी डॉक्टरांना सूचना
-एडिस इजिप्ती डासांमुळे आजार होत असल्याने कीटकनाशक फवारणी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.