संग्रहित छायाचित्र
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेला मुहूर्त सापडलेला नव्हता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील विविध विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. पुणे विद्यापीठाकडे १११ पदांसाठी सहा हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले. त्या अर्जांची छाननी सुरू असतानाच पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत विद्यापीठाने प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवू नये, असे पत्र राज्यपाल कार्यालयाकडून विद्यापीठाला पाठवण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील विविध विद्यापीठांमधील विभागामधील तसेच संलग्न महाविद्यालयांमधील रिक्त असलेल्या प्राध्यापकपदाची भरती प्रक्रिया सुरू आहे. हजारो उमेदवार विद्यापीठाकडून मुलाखतीसाठी केव्हा बोलावले जाते, याच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना राज्यपाल कार्यालयातून पाठवण्यात आलेल्या या या पत्रामुळे विद्यापीठातील पदांच्या भरतीला ब्रेक लागला आहे.
विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी विद्यापीठाला या संदर्भातील पत्र मिळाले असल्याबाबत दुजोरा दिला आहे.
महाविद्यांलयांसोबतच विद्यापीठामध्येसुद्धा पूर्ण वेळ प्राध्यापक नसल्याने कंत्राटी तत्त्वावर प्राध्यापकांची भरती करावी लागली आहे. परंतु पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत विद्यापीठाने प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवू नये, असे पत्र राज्यपाल कार्यालयाकडून विद्यापीठाला पाठविण्यात आले आहे.
विद्यापीठातील अनेक विभाग तसेच संलग्न महाविद्यालयांना प्राध्यापक नसल्याने अडचणी येत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नॅक मूल्यांकन येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. विद्यापीठाकडे उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळाला नॅक मूल्यांकनात गुण दिले जातात. राज्यपाल कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रामुळे विद्यापीठाला भरती प्रक्रिया थांबवावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.
भरती प्रक्रियेत नाही पारदर्शकता
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाप्रमाणे प्राध्यापक भरती प्रक्रियेत पारदर्शकता यावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली. परंतु, त्या दृष्टीने उपाययोजना झाल्या नाहीत. प्राध्यापक भरती करण्यासाठी विद्यापीठ कायद्यामध्ये विशिष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. भरती प्रक्रियेमध्ये बदल करण्यापूर्वी विद्यापीठ कायद्यात बदल करावा लागेल. त्यामुळे राज्यपाल कार्यालयाकडून प्राध्यापक भरतीबाबत कोणता निर्णय घेतला जाणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे
प्राध्यापक भरतीसंदर्भात पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत विद्यापीठाने प्राध्यापक भरती करू नये, अशा आशयाचे पत्र राज्यपाल कार्यालयाकडून विद्यापीठाला प्राप्त झाले आहे.
- डॉ. ज्योती भाकरे, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.