संग्रहित छायाचित्र
उत्तर भारताकडून ताशी १५ ते २० किलोमीटर वाऱ्यांचा वेग कायम असल्याने पुण्यासह महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका कायम आहे. दिवसभर गार वारे वाहत असल्याने पुणेकरांना सुमारे आठवड्यापासून हुडहुडी भरली आहे.
राज्यात नाशिक जिल्ह्यातील जेऊर येथे नीचांकी तापमान ६ अंश तर अहिल्यानगर येथे ८.५ अंश नोंद करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामातील निचांकी तापमान मागील दोन दिवसापासून नोंदवले जात आहे. त्याचप्रमाणे शनिवारी थंडाच्या लाटेची शक्यता देखील हवामान विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी संशोधन केंद्रानेदेखील वर्तवली आहे. संशोधन केंद्राने नाशिकला यलो अलर्ट दिला आहे.
उत्तर महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यातील काही भागातदेखील थंडीची लाट असल्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हिंगोली जिल्ह्यातदेखील थंडीची लाट पसरली असून तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. याचा सर्वाधिक फटका शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसात तापमान सरासरीपेक्षा खाली येताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणी कडाक्याची थंडी जाणवत आहे.
आणखी तीन-चार दिवस थंडीची लाट
उत्तर महाराष्ट्रात पुढील २४ तासासाठी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवस वातावरणातील गारठा कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र थंडी वाढत असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आणखी तीन ते चार दिवस राज्यात थंडीची लाट मोठ्या प्रमाणात दिसून येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.