हाच खरा भारत: शिखांनी अन्न शिजवलं, मुस्लिमांनी पॅकिंग केलं तर हिंदूंनी गरजूंपर्यंत पोहोचवलं; पुण्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले सर्वधर्मीय

सध्याच्या धार्मिक तेढीच्या वातावरणात अद्याप मानवता हाच खरा धर्म असल्याचे पुणेकरांनी दाखवून दिले आहे. गेले दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे विशेषत: गुरुवारी (दि. २५) झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 27 Jul 2024
  • 10:42 am
Pune Flood, Vande Mataram Sanghtna

पुण्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले सर्वधर्मीय

नोझिया सय्यद

सध्याच्या धार्मिक तेढीच्या वातावरणात अद्याप मानवता हाच खरा धर्म असल्याचे पुणेकरांनी दाखवून दिले आहे. गेले दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे विशेषत: गुरुवारी (दि. २५) झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांत पाणी शिरले तर अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. अशा या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पुण्यातील सर्वधर्मीय एकजुटीने संकटाचा सामना करण्यासाठी पुढे सरसावले आणि त्यांनी पावसाचा फटका बसलेल्या पुणेकरांना यथाशक्ती मदत केली. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून त्यांनी समाजासमोर एक आदर्श पायंडाच घालून दिला आहे. सध्याच्या द्वेशपूर्ण वातावरणात हिंदू, मुस्लीम आणि शिख बांधवांनी एकत्र येत पावसात अडकलेल्यांचा जात-धर्म न बघता गरजूंची मदत करणारा हाच खरा भारत असल्याचे आपल्या कृतीद्वारे दाखवून दिले.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिख बांधवांनी अन्न शिजवले, मुस्लीम बांधवांनी त्याचे  पॅकिंग केले तर विविध भागातील गणेश मंडळांतील हिंदू धर्मीय कार्यकर्त्यांनी ते गरजू लोकांपर्यंत पोहोचवले. गेले तीन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने कहर केला. अनेकांना विस्थापित केले आणि मालमत्तेचे गंभीर नुकसान झाले. या आपत्तीवर मात करण्यासाठी विविध समुदायातील स्वयंसेवक बाधित झालेल्यांना अन्न आणि निवारा दोन्ही पुरवण्यासाठी पुढे आले. स्वयंसेवकांच्या नि:स्वार्थ प्रयत्नांमुळे पूरपरिस्थितीत आपली घरे आणि सामान गमवावे लागलेल्या दीड हजारापेक्षा अधिक व्यक्तींना आश्रय मिळाला.

वंदेमातरम संघटनेचे राज्य अध्यक्ष वैभव वाघ, राष्ट्रप्रथम ट्रस्ट, ज्यांनी पीडितांना मदत केली, त्यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले की, “आम्हाला गरजू लोकांकडून अनेक फोन आले. आमच्याकडे पुण्यातील सर्व गणेश मंडळांची यादी होती. त्यांच्यासोबतच आम्ही ताबडतोब पुणे महापालिकेशी संपर्क साधला आणि आम्ही मदतीसाठी तयार असल्याचे कळवले. महापालिकेने त्याची दखल घेत तब्बल १६ ठिकाणे पुरवली जिथे पूरग्रस्तांसाठी सुरक्षित निवारा मिळू शकला. पूरग्रस्तांना तिकडे हलवताना आणि वाहतुकीचे नियोजन करतानाचा मोठा प्रश्न आम्हाला भेडसावत होता, तो म्हणजे या सर्व पूरग्रस्तांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करणे. त्यासाठी आमच्या शिख बांधवांनी पुढाकार घेतला.’’

गुरुद्वारा गुरू नानक दरबार, ज्याला कॅम्प परिसरातील हॉलिवूड गुरुद्वारा म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी १५०० हून अधिक लोकांसाठी भोजन तयार करण्याची तयारी दाखवली. “आम्हाला वाघ यांच्याकडून मदतीची विनंती करणारा कॉल आला आणि आम्ही लगेच होकार दिला. आमचा समुदाय अनेक वर्षांपासून अन्नदान आणि 'लंगर' आयोजित करत आहे. आमच्यासाठी ही केवळ सेवा होती. आम्ही अन्न तयार केले, परंतु तातडीने पॅकिंग आणि वितरण कसे करायचे, याचे आव्हान उभे राहिले. तेव्हाच मुस्लीम समुदायातील आमचे भाऊ जावेद शेख यांच्याशी आम्ही संपर्क साधला. ते मदतीसाठी तत्परतेने पुढे आले, ” अशी माहिती हॉलिवूड गुरुद्वाराचे विश्वस्त चरणसिंग सहानी यांनी ‘सीविक मिरर’ला दिली.  

या भागात स्वयंसेवकांनी मदत केली
येरवडा, मंगळवार पेठ, वाकडेवाडी, संगमवाडी, नरवीर तानाजी वाडी, सिंहगड रस्ता, फुलेनगर इत्यादी

गरजूंची सेवा करू शकलो, याचे समाधान...
वंदेमातरम संघटनेचे राज्य अध्यक्ष वैभव वाघ म्हणाले, ‘‘कोविड महामारीच्या काळात परोपकारी कार्याचा आदर्श घालून दिलेले सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख यांनी आम्ही मदतीसाठी केलेल्या आवाहनाला त्वरित प्रतिसाद दिला आणि त्यांचे स्वयंसेवक आमच्या मदतीला आले. शीख समुदायाने गुरुद्वारामध्ये अन्न तयार केले, मुस्लीम समुदायाने पॅकिंगमध्ये मदत केली आणि मग आम्ही सर्व गटांनी एकत्र काम केले. सर्वजण एकत्र येण्याचे दृश्य अत्यंत भावुक होते. एकत्रितपणे, समन्वयित प्रयत्नांनी आम्ही सर्वधर्मीय गरजूंची सेवा करू शकलो, याचे आम्हा सर्वांना विशेष समाधान वाटते. ”  

जावेद शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले की, “संकटाच्या काळात एकता सर्वात महत्त्वाची असते. अशा कठीण क्षणी, वंश, धर्म आणि जात बाजूला ठेवून एकमेकांना माणूस म्हणून ओळखणे महत्त्वाचे आहे. कारण मानवता हाच एकमेव धर्म आहे जो खऱ्या अर्थाने महत्त्वाचा आहे. ही गोष्ट या घटनेतून दिसून आली.”

हॉलिवूड गुरुद्वाराचे विश्वस्त चरणसिंग सहानी यांनीही अशीच भावना व्यक्त करत, सर्वांनी एकत्रितपणे काम करत लोकांना मदत करण्याचा अनुभव विशेष असल्याचे सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest