संग्रहित छायाचित्र
महापालिकेच्या आरोग्य विभागातील एकाच खात्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या साहाय्यक अधिकाऱ्यांना नुकताच पालिका आयुक्तांनी दणका दिला. त्यानंतर आता मिळकत विभागात तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेल्या विभागीय निरीक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. यापूर्वी या विभागात काम न केलेल्या निरीक्षकांची तेथे नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती आहे.
महापालिकेत विविध विभागातील मलईदार खात्यात कार्यरत अधिकारी तेथून हलण्याचे नाव घेत नाही. त्यांचे हितसंबंध जमल्यामुळे तेथून हलण्याची त्यांची तयारी नसते. त्यामुळे कामात सुसूत्रता आणण्यासाठी तसेच सुरू असलेले गोंधळ बंद करण्यासाठी बदल्या केल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून मिळकत कर विभागातील निरीक्षकांच्या ‘क्रिम’ वॉर्डमध्ये बदल्या होण्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याची जोरदार चर्चा महापालिकेत रंगली आहेत. याची कुणकुण वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागली. त्यामुळेच त्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
महापालिकेच्या नियमानुसार एकाच विभागात तीन वर्षे काम केलेल्या अधिकारी आणि कर्मचार्यांच्या इतर विभागात बदल्या होतात. प्रामुख्याने संबंधित अधिकारी व कर्मचार्यांनी पूर्वी ज्या विभागात काम केले नाही, त्या विभागात समकक्ष पदांवर त्यांची बदली करण्यात येते. महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मिळकत कर विभागानेही तीन वर्षे काम केलेले कर निरीक्षक आणि विभागीय निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. परंतु, बदली झालेल्या सुमारे चाळीसहून अधिक निरीक्षकांना अद्याप बदलीच्या ठिकाणी सोडलेले नाही. तसेच ज्या निरीक्षकांना सोडले आहे, त्यांच्या जागेवर पूर्वी मिळकत कर विभागातच काम केलेल्यांना संधी देण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
ही बाब लक्षात आल्याने महापालिकेच्या अन्य विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी शंका उपस्थित केली आहे. इतर विभागातील अधिकार्यांना, कर्मचार्यांना एक न्याय आणि मिळकत कर विभागातील निरीक्षकांना एक न्याय ही भूमिका अन्यायकारक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. या नियुक्त्यांसाठी व क्रीम वॉर्डमधील पोस्टिंगसाठी आर्थिक व्यवहार झाल्याच्याही जोरदार चर्चा महापालिका सुरू आहेत. ही चर्चा अगदी वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकार्यांनी सावध भूमिका घेत एकाच विभागात तीन वर्षे काम केलेल्या कर्मचार्यांची नियमानुसार अन्य विभागात बदली करण्याची भूमिका घेतली आहे. तसेच विभागीय निरीक्षकांच्याही नुकत्याच केलेल्या आलेल्या अन्य वॉर्डमधील बदल्या रद्द करण्याच्या निर्णयाप्रत हे अधिकारी आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली.