बदलापूर घटनेनंतर सर्व शाळांच्या कामगारांची चारित्र्य पडताळणी; शालेय शिक्षण विभागाचे आदेश, कंत्राटी कामगारांची धावपळ

बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचार घटनेनंतर विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागांसह पोलिसांनीदेखील आता शाळेतील कंत्राटी कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या चारित्र्य पडताळणी तत्काळ करण्याबाबतच्या सूचना शाळांना दिल्या आहेत.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचार घटनेनंतर विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागांसह पोलिसांनीदेखील आता शाळेतील कंत्राटी कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या चारित्र्य पडताळणी तत्काळ करण्याबाबतच्या सूचना शाळांना दिल्या आहेत.

कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कामगार आणि कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी शाळांची धावपळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील विशेषतः कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह शाळांचे व्हॅनचालक, रिक्षावाले काका, मदतनीस, स्वच्छता कामगारांची पडताळणी करून घेण्यासाठी शाळा सध्या प्रयत्नशील आहेत.

दरम्यान, मागील आठवड्यात पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शाळा, संस्थाचालक, मुख्याध्यापकांची बैठक घेतली. या बैठकीत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच कंत्राटी पद्धतीने नियुक्त होणारे सुरक्षारक्षक, सफाई कामगार, मदतनीस, स्कूल बसचालक अशा संबंधित व्यक्तींची चारित्र्य पडताळणी करण्याबाबत सूचना शाळांना दिल्या आहेत. त्यामुळे, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तत्काळ शाळेत जमा करावे, असे मुख्याध्यापकांनी आणि व्यवस्थापकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यामुळे त्या-त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक पोलीस यंत्रणेकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांची, कामगारांची चारित्र्य पडताळणी करून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

शिक्षण विभागांसह शहर पोलीस आयुक्तांनीदेखील शाळेतील कंत्राटी कामगार आणि कर्मचा  ऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्यात यावी, अशी सूचना केली. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते शाळा व्यवस्थापनाकडे जतन करू ठेवण्यात येईल. परंतु, एकदा हे प्रमाणपत्र काढल्यानंतर ते कधीपर्यंत ग्राह्य धरले जाईल? काही ठराविक वर्षांनंतर परत नव्याने चारित्र्य पडताळणी करून घ्यायची की नाही, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.
- सुजित जगताप, अध्यक्ष, पुणे शहर मुख्याध्यापक संघ

शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार शाळेतील विशेषतः कंत्राटी कामगार आणि कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. त्या-त्या ठिकाणच्या पोलिसांकडून संबंधित कर्मचाऱ्यांची पडताळणी केली जात आहे. परंतु, केवळ चारित्र्य पडताळणी करून प्रश्न सुटणार आहे का?, अनेक घटनांमध्ये संबंधित आरोपी पुराव्याअभावी आणि दबावामुळे सुटतात. त्यामुळे शासन आणि पोलीस यंत्रणेने त्याबाबत सक्षम पावले उचलायला हवी.
- नंदकुमार सागर, अध्यक्ष, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest