पुणे : परवान्यासाठी यंदाही धावाधाव; रस्त्यांवर विनापरवाना स्टॉल उभारणाऱ्या २२६ जणांना नोटीस

गणेश मूर्ती विक्रेत्यांना स्टॉल परवाने देण्यासाठी पुणे महापालिका दरवर्षी जो घोळ घालते तोच घोळ यावर्षीही घातला जात आहे. नेहमीप्रमाणे याव र्षीही परवाना घेण्यासाठी धावा करण्याची वेळ आली आहे.

परवान्यासाठी यंदाही धावाधाव; रस्त्यांवर विनापरवाना स्टॉल उभारणाऱ्या २२६ जणांना नोटीस

गणेश मूर्ती विक्रेत्यांना पालिकेच्या एक खिडकी योजनेची माहिती मिळेना

गणेश मूर्ती विक्रेत्यांना स्टॉल परवाने देण्यासाठी पुणे महापालिका दरवर्षी जो घोळ घालते तोच घोळ यावर्षीही घातला जात आहे. नेहमीप्रमाणे याव र्षीही परवाना घेण्यासाठी धावा करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, पालिकेच्या ठरलेल्या जागेव्यतिरिक्त अन्यत्र स्टॉल उभारल्याबद्दल २२६ जणांना नोटीस दिली आहे.  (Ganesh festival 2024 Pune)

महापालिकेने या वर्षी शहरातील सर्व गणेश मंडळांची तसेच विविध संघटनांची ७ ऑगस्ट रोजी बैठक घेतली होती. बैठक संपताच मूर्ती विक्रेत्यांना परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना राबविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले होते. तसेच या परवानग्या ३१ ऑगस्टपर्यंत देण्यात येतील असेही सांगितले होते. मात्र, अनेक मूर्ती विक्रेत्यांना एक खिडकी योजनेची माहितीच मिळत नसल्याने परवाना घेण्यासाठी धावा करण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उत्सव सुरू झाल्यानंतरच परवाना मिळणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.  (Ganesh festival stall permits delay)

गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस राहिले आहेत. शहराच्या अनेक भागात कायदेशीर तसेच बेकायदेशीर गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. गणेश भक्तांनी मूर्तीदेखील बुकिंग करून ठेवल्या आहेत. असे असतानाच महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही स्टॉलधारकांना परवानगी देण्यावरून गोंधळ घातल्याची तक्रार स्टॉलधारकांनी ‘सीविक मिरर’ शी बोलताना केली.

ठरवून दिलेल्या जागेशिवाय इतर ठिकाणी गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारल्याप्रकरणी २२६ स्टॉलधारकांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. दुसरीकडे एक खिडकी योजना राबविण्यास उदासीनता दाखविली जात आहे. स्टॉलधारकाने एकदा अर्ज दाखल केली की त्याला इतर ठिकाणी परवानगी घेण्यासाठी फिरण्याची आवश्यकता नाही. स्टॉलधारकाने संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन ना हरकत प्रमाणपत्र आणावयाचे आहे. ते क्षेत्रीय कार्यालयात दिल्यानंतर पालिकेकडून परवानगी दिली जाते, अशी प्रक्रिया साधारणपणे आहे. अवघ्या दोन दिवसांवर उत्सव आला असून परवाने नाहीत. दुसरीकडे परवाना नसेल तर नोटीस मिळत आहे. त्यामुळे करायचे तरी काय या संकटात स्टॉलधारक सापडले आहेत. त्यामुळे पालिकेने यात लक्ष घालून स्टॉलधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.

शहरात दरवर्षी गणेशोत्सवामध्ये सहा लाखांपेक्षा अधिक गणेश मूर्तीची विक्री होते. यामध्ये घरात बसविण्यात येणार्‍या मूर्त्यांची संख्या अधिक असतात. त्यांची रस्त्यांच्या कडेला स्टॉल उभारून विक्री केली जाते. यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रशासनाने रस्त्याच्या कडेला गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यास परवानगी नाकारण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार शाळा, रहदारी कमी असलेली ठिकाणी किंवा मोकळ्या जागांवर २९ ठिकाणे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली आहेत. या ठिकाणी ५२६ गाळ्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, महापालिकेची परवानगी न घेता ठरलेली ठिकाणे सोडून इतरत्र मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारणार्‍या २२६ व्यावसायिकांना पालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावली आहे.

शहरामध्ये गणेशोत्सवाच्या तयारी जोरात सुरू असून मंडळांचे मंडप उभारण्याचे काम पूर्ण होत आले आहे. महापालिका शनिवारवाडा, कुंभारवाडा, तसेच मोकळ्या जागांवर विक्री स्टॉलला परवानगी देते. यंदा पदपथावरही स्टॉल उभारल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

गेल्या वर्षी प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे गणेश उत्सव सुरू झाल्यानंतर मूर्ती विक्रेत्यांना परवानगी दिली गेली. याबाबत विक्रेत्या संघाने बैठकीत तक्रारही केली होती. तसेच यंदा ज्या प्रमाणे लवकर बैठक घेतली त्याप्रमाणे लवकर परवानगी देण्याची मागणी केली होती. त्याची तत्काळ दखल घेत आयुक्तांनी आदेश देऊन एक खिडकी योजना राबवून परवानग्या द्या, असे जाहीर केले होते. मात्र, अद्याप अनेकांना परवानग्या मिळालेल्या नाहीत.

‘मूर्ती आमची, किंमत तुमची’ 

पालिका शाडूच्या मूर्तींची करणार विक्री

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे महापालिकेने आवाहन केले आहे. त्यापुढे आणखी एक पाऊल महापालिकेने पुढे टाकत ‘मूर्ती आमची …किंमत तुमची’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पीओपीची मूर्ती न वापरता नागरिकांनी शाडू मातीची मूर्ती खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे या उद्देशाने पर्यावरण विभाग व लिबर्टी अर्थवेअर आर्टच्या मदतीने फक्त शाडू मातीची मूर्ती “ मूर्ती आमची , किंमत तुमची” हा उपक्रम हाती घेतला आहे.

आपल्या घरी गणपती बसविताना नैसर्गिक साहित्य, जैवविघटनशील व पर्यावरणास अनुकूल साहित्य वापरून मूर्तीची सजावट करावी, असे महापालिकेने आवाहन केले आहे. वरील उपक्रम  घोले रोड, आर्ट गॅलरी, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे येथे दि. ५ ते ७ सप्टेंबर २०२४ दरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत सुरू राहणार आहे. येथे नागरिकांसाठी पर्यावरणपूरक मूर्ती उपलब्ध असून त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालिकेच्या पर्यावरण विभागाने केले आहे.

शाडूचा वापर करून भक्ती संगम प्रकारच्या मातीच्या मूर्ती उपलब्ध केल्या आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही अवघ्या दोन तासात पाण्यात विरघळते. विसर्जन केल्यानंतर ते पाणी घरगुती कुंडीमध्ये वापरता येते. सुमारे १ फूट आकाराच्या या मूर्ती आहेत. नागरिकांंमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. याशिवाय पालिका यंदाही मूर्ती संकलनही करणार असून त्याच्या मातीचा पुनर्वापर करणार आहे. तसेच मूर्तीदान करणाऱ्या नागरिकांना महापालिका या वर्षी प्रत्येकी ३ किलो कंपोस्ट खत मोफत देणार आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून प्रत्येक पोलीस ठाण्यात साहाय्यक अतिक्रमण निरीक्षक देण्यात आला आहे. स्टॉलधारकांना पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले की तत्काळ पालिकेचा परवाना दिला जातो. एक खिडकी योजना सुरूच आहे.  कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. आतापर्यंत शहरात १९० स्टॉलधारकांना परवाना दिले आहे. बेकायदा स्टॉल धारकांना नोटिसा देण्यात आल्या असून त्यांना स्टॉल काढून घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यांनतर मात्र, कारवाई केली जाईल.  

 - सोमनाथ बनकर, अतिक्रमण विभाग प्रमुख, पुणे महापालिका.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest