Pune Ganeshotsav 2024: बाप्पांच्या शांततापूर्ण उत्सवासाठी सात हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

शहराचे भूषण असलेला गणेशोत्सवाचा देदीप्यमान सोहळा शनिवारपासून (दि. ७) सुरू होत आहे. या सोहळ्यासाठी शहर पोलीस दल सज्ज झाले असून उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तब्बल सात हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 7 Sep 2024
  • 05:53 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

बाप्पांच्या शांततापूर्ण उत्सवासाठी सात हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

शहरात सर्वत्र असणार मोठा फौजफाटा, गणेशोत्सवात मद्य दुकाने बंद ठेवण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश

पुणे: शहराचे भूषण असलेला गणेशोत्सवाचा देदीप्यमान सोहळा शनिवारपासून (दि. ७) सुरू होत आहे. या सोहळ्यासाठी शहर पोलीस दल सज्ज झाले असून उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तब्बल सात हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Pune Ganeshotsav 2024)

कोणताही अनुचित प्रकार न घडता वेळेत विसर्जन मिरवणुका समाप्त करण्यासाठीदेखील नियोजन करण्यात आलेले आहे. पोलिसांनी (Pune Police) गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून जवळपास १७४२ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाढती गुन्हेगारी आणि उत्सवादरम्यान होणारी गैरकृत्य रोखण्यासाठी फरासखाना-विश्रामबाग आणि खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मद्य दुकाने दहा दिवस आणि अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मद्य दुकाने शेवटचे दोन दिवस बंद ठेवण्यासाठीचा प्रस्ताव पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाठवला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. गणेशोत्सव निर्विघ्न पार पडेल, असा विश्वास पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला.

विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांनी सविस्तर माहितीदिली. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, अरविंद चावरिया, परिमंडळ एकचे उपायुक्त संदीपसिंह गिल उपस्थित होते.

आयुक्त म्हणाले, ‘‘शहरात ३ हजार ७९८ सार्वजनिक मंडळांमध्ये तर, ६ लाख ६४ हजार २५७ घरगुती गणपतींची प्रतिस्थापना केली जाणार आहे. संपूर्ण गणेशोत्सवकाळात गणेश मंडळे, ढोलताशा पथके यांच्यासह शासकीय यंत्रणांशी वारंवार बैठका घेऊन समन्वय साधण्यात येणार आहे. बॉम्बशोधक आणि नाशक पथक, आरसीपी, क्यूआरटी आणि राज्य राखीव पोलीस दलाची पथके नेमण्यात आलेली आहेत. यंदाच्या गणेशोत्सवासाठी पोलीस आयुक्त, उपायुक्त आणि पोलीस ठाणेस्तरावर २०२ बैठका घेण्यात आल्या आहेत. उत्सवादरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे. गुन्हे शाखेची विशेष पथके नेमण्यात आली आहेत.

वाहतूक मार्गदर्शनासाठी वाहतूक शाखेकडूनदेखील वेळोवेळी माहिती जाहीर केली जाणार आहे. वाहतूक बदलासाठी ठिकठिकाणी  फलक लावण्यात आले आहेत. सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, पाकीटमारी, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. आणीबाणीच्या स्थितीत रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्गांचे नियोजन करण्यात आल्याचे आयुक्त म्हणाले. सर्वत्र वॉच टॉवर, गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. मंडळांचे पदाधिकारी, शांतता कमिटी, पोलीस मित्र समिती यांनाही नियोजनात सहभागी करून घेण्यात आले आहे.

असा आहे पोलीस बंदोबस्त

अतिरिक्त पोलीस आयुक्त : ४

पोलीस उपायुक्त : १०

साहाय्यक आयुक्त : २३

पोलीस निरीक्षक : १२८

साहाय्यक निरीक्षक-उपनिरीक्षक : ५६८

अंमलदार : ४,६०४

होमगार्ड : ११००

राज्य राखीव पोलीस : एक तुकडी

शीघ्र कृती दल (क्यूआरटी) : १० पथके

महत्त्वाच्या सूचना

१२ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या सहा दिवसांसाठी स्पीकर रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी.

मंडळांनी मंडपाजवळ किंवा मिरवणुकीत ज्वालाग्राही पदार्थ वापरू नयेत.

सीस्टिम लावताना आवाजाच्या डेसीबलसंदर्भात असलेल्या नियमांचे पालन करावे.

ठिकाणी, रस्ते, रुग्णालय परिसरात फटाके वाजवण्यास बंदी

सुरक्षेसाठी आणि पोलीस बंदोबस्त याकरिता ‘माय सेफ पुणे’ अॅपचा प्रभावी वापर

१८ सप्टेंबर रोजीही मद्याची दुकाने बंद
गणेशोत्सव काळात होणारे गैरप्रकार रोखण्याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील फरासखाना, विश्रामबाग आणि खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मद्य विक्रीची दुकाने, बार, देशी दारू दुकाने ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबरदरम्यान दहा दिवस बंद ठेवली जाणार आहेत. तसेच, विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणारी भांडणे, हल्ले, महिला छेडछाड आदी रोखण्यासाठी १७ आणि १८ सप्टेंबर रोजी शहरातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मद्याची दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. तसा प्रस्ताव पुणे पोलिसांनी जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठवण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest