Pune Ganeshotsav 2024: परदेशी तरुणांना गणेशोत्सवाची भुरळ; पहिल्या ‘ग्लोबल गणेश फेस्टिवल’चे उद्घाटन

पुणे-मुंबईसह राज्यात मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजर्या होणार्या गणेशोत्सवाची भुरळ पुण्यात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनाही पडली आहे. गणेशभक्तीने भारावलेल्या या विदेशी तरुणांनी पहिल्या ‘ग्लोबल गणेश फेस्टिवल’चे आयोजन पुण्यात करण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 7 Sep 2024
  • 07:30 pm

संग्रहित छायाचित्र

जर्मन तरुणीकडून राज्यातील परंपरागत मर्दानी खेळाचे सादरीकरण

पुणे-मुंबईसह राज्यात मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजर्या होणार्या गणेशोत्सवाची भुरळ पुण्यात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनाही पडली आहे. गणेशभक्तीने भारावलेल्या या विदेशी तरुणांनी पहिल्या ‘ग्लोबल गणेश फेस्टिवल’चे (Global Ganesh Festival) आयोजन पुण्यात करण्यात आले.

पहिल्यांदाच झालेल्या 'ग्लोबल गणेश फेस्टिवल'चे उद्घाटन परदेशी तरुणांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यातील गणेशोत्सव आयोजनात अग्रस्थानी असलेल्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून यावर्षीपासून आयोजित 'ग्लोबल गणेश फेस्टिवल'च्या निमित्ताने ग्लोबल गणेश समिटही यावेळी झाली.

लोकसहभाग, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर, गणेशोत्सवादरम्यान परदेशी लोकांना आवश्यक सुविधा, मार्गदर्शन, जागतिक स्तरावर आयोजित होणाऱ्या गणेशोत्सवाला जोडून घेत उत्सवाचे आदानप्रदान झाले, ऐतिहासिक परंपरा असलेला गणेशोत्सव जागतिक लोकोत्सव होईल, अशा भावना गणेशोत्सवातील सक्रिय कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.  Pune Ganeshotsav 2024

शिवाजीनगर येथील हॉटेल प्राईड येथे आयोजित कार्यक्रमावेळी आफ्रिकन विद्यार्थी त्रिश आणि त्रोबा, जर्मन विद्यार्थिनी लोताया, डॉ. रघुनाथ कुचिक, डॉ. सतीश देसाई, रामनाथ सोनवणे, संयोजक वैभव वाघ, महेश सूर्यवंशी, शिरीष मोहिते, उदय जगताप, ॲड. अनीश पाडेकर, विनीत परदेशी, पियुष शहा, नितीन पंडित, धनश्री वाघ-पाटील, अनिरुद्ध येवले, योगेश आलेकरी आदी उपस्थित होते. यावेळी जर्मन विद्यार्थिनी लोताया हिने महाराष्ट्रातील परंपरागत मर्दानी खेळाचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

या समिटमध्ये ग्लोबल गणेशोत्सवाने कशाप्रकारे पुण्याचे अर्थकारण व धार्मिक पर्यटन बदलेल, सोलो ट्रॅव्हलचा गणेशोत्सवाला होणारा फायदा, ग्लोबल गणेश पर्यटन, मोरया हेल्पलाईन, रोटरी क्लबचा ग्लोबल गणेश फेस्टिवलला होणारा फायदा, गणेशोत्सव जागतिक होण्यासाठी शिक्षणसंस्थांची भूमिका काय असेल, भारतीय आयोजकांनी काय करावे, शासनाची धोरणे व उपक्रम काय असावेत, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

डॉ. सतीश देसाई म्हणाले की, ‘‘गणेशोत्सव जगाच्या नकाशावर जाण्यासाठी स्थानिक व परदेशी आयोजकांनी एकमेकांशी समन्वय साधायला हवा.’’ महेश सूर्यवंशी यांनी धार्मिक पर्यटन विकसित करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्याची गरज असल्याचे सांगितले. गणेशोत्सव ग्लोबल आहेच, त्याची ओळख आणखी व्यापक करायला हवी, असे त्यांनी नमूद केले. योगेश आलेकरी म्हणाले, ‘‘जगभर फिरत असताना मला अनेक सण साजरे करता आले. भारतातही परदेशी पर्यटक येतात; त्यांच्यासाठी पूरक गोष्टींची उपलब्धता करून द्यायला हवी.’’

जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय"
संयोजक वैभव वाघ म्हणाले, ‘‘जगातील अनेक महोत्सवांपेक्षा गणेशोत्सव हा अधिक व्यापक व भव्यदिव्य स्वरूपाचा आहे. परंतु, या उत्सवाला म्हणावी तशी जागतिक स्तरावर ओळख मिळाली नाही. या उत्सवाचा पर्यटन केंद्र म्हणूनही मोठा विकास होऊ शकतो. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, त्यातून रोजगारनिर्मिती उभारण्यासाठी आणि आपला पारंपरिक व ऐतिहासिक गणेशोत्सव जगभर जाण्यासाठी 'ग्लोबल गणेश फेस्टिवल' आयोजित करण्यात येत आहे. या वर्षीपासून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोहचणे हेच मुख्य ध्येय आहे. जागतिक गणेश मंडळे व पुण्यातील गणेश मंडळांचा सामंजस्य करार घडवून आणण्यावर भर दिला जाणार आहे. यानिमित्ताने जागतिक स्तरावर विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest