संग्रहित छायाचित्र
अवघे पुणे उत्साहाने ज्या उत्सवाची वाट पाहात होते, तो गणेशोत्सव (Ganesh Festival 2024) शनिवारपासून (दि. ७) थाटामाटात सुरू होत आहे. या काळात शहरातील गणेशोत्सवातील देखावे, रोषणाई पाहण्यासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना सुविधाजनक आणि त्रासमुक्त प्रवास सेवा देण्यासाठी पुणे मेट्रोही सज्ज झाली आहे. १७ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला 'पुणे मेट्रो' (Pune Metro) भाविकांसाठी २४ तास सेवा पुरवणार आहे.
या उत्सवकाळामध्ये 'पुणे मेट्रो' आपल्या सेवेचा कालावधी वाढवणार आहे. तसेच 'मेट्रो' फेऱ्यांची संख्याही वाढवणार आहे. ७ ते ९ सप्टेंबरपर्यंत मेट्रो सेवा सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत चालणार आहे. उत्सवाच्या पहिल्या टप्प्यातील हा सेवेतील विस्तार प्रवासीसंख्येतील संभाव्य वाढ लक्षात घेऊन करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी मेट्रो सेवेचा लाभ घेऊ शकतील तसेच १० ते १६ सप्टेंबर दरम्यान मेट्रो सेवेची वेळ आणखी वाढवली जाईल. या काळात मेट्रो सकाळी सहा ते मध्यरात्री १२ पर्यंत सेवा पुरवणार आहे. त्यामुळे प्रवाशांची आणखी सोय होण्यास मदत होईल.
पुणे मेट्रोच्या विस्तारित सेवेंतर्गत गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे १७ सप्टेंबर रोजी मेट्रो सकाळी ६ ते १८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ पर्यंत अखंड धावेल. गणेश विसर्जनाच्या दिवशी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहराच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने असतात. उत्सव या काळात शिगेला पोहोचलेला असतो. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या संख्येने सामावून घेऊन त्यांना सोयीस्कर प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा या २४ तासांच्या सेवेमागील उद्देश आहे.
या विस्तारित सेवेदरम्यान वाढलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना डिजिटल तिकीट नोंदणीचा पर्याय पुणे मेट्रोने उपलब्ध करून दिला आहे. प्रवाशांनी तिकीट खरेदीसाठी 'पुणे मेट्रो मोबाईल ॲप' आणि 'व्हॉट्स ॲप तिकीट सेवा' वापरण्याचे आवाहन 'पुणे मेट्रो'ने केले आहे. तिकिटांसाठी प्रवाशांची लांबलचक रांग आणि तिकीट काउंटरवरील गर्दी टाळण्यासाठी ही डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. जेणेकरून प्रवाशांना विनाअडथळा तिकीट मिळवून प्रवासाला सुरुवात करता येईल.
“पुणेकर नागरिकांना आणि बाहेरगावाहून येणाऱ्या गणेशभक्तांना गणेशोत्सवाचा आनंद लुटता यावा, या कटिबद्धतेतून आम्ही सेवा विस्ताराचे नियोजन केले आहे. आम्ही सर्व प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे वेळेपूर्वी नियोजन करण्याचे आवाहन करतो. प्रत्येकाला या विशेष प्रसंगाचा आनंद लुटण्यासाठी सुविधाजनक आणि कमी वेळेत प्रवास करण्यास मदत करणे हे आमचे ध्येय आहे,” असे 'पुणे मेट्रो'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एक 'मेट्रो' प्रवासी साक्षी घुले म्हणाल्या, “सणाचा आनंद लुटताना सार्वजनिक वाहतूक सुविधांचा कालावधी वाढायला हवा. कारण या काळात प्रवाशांची गर्दी वाढलेली असते. पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. तसेच पुण्यातील काही प्रमुख रस्ते या काळात बंद असतात आणि वाहतूक वळवलेली असते. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढलेले असते. या कोंडीवर मात करण्यासाठी मेट्रो हा प्रवास करण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. उत्सवकाळात मेट्रो फेऱ्यांचे प्रमाण वाढवल्याने आणि या सेवेचे तासही वाढवल्यामुळे प्रवाशांना त्याचा नक्कीच फायदा होईल.”