स्टेंटचा बाजार: स्टेंट बसवून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाला बळजबरी, मणिपाल रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

पंचतारांकित रुग्णालयांमध्ये स्टेंटचा अक्षरश: बाजार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाणेर येथील मणिपाल रुग्णालयात एका ७४ वर्षीय कॅन्सर रुग्ण असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला दोन स्टेंट बसवून घेण्यासाठी एका डॉक्टरकडून अक्षरश: बळजबरी करण्यात आली.

ज्येष्ठ नागरिक पुष्कराज सबनानी आणि त्यांच्या पत्नी

सेकंड ओपिनियनमध्ये गरज नसल्याचे झाले स्पष्ट

नोझिया सय्यद

पंचतारांकित रुग्णालयांमध्ये स्टेंटचा अक्षरश: बाजार सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाणेर येथील मणिपाल रुग्णालयात (Manipal Hospital) एका ७४ वर्षीय कॅन्सर रुग्ण असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला दोन स्टेंट बसवून घेण्यासाठी एका डॉक्टरकडून अक्षरश: बळजबरी करण्यात आली. त्यांना उपाशीपोटी बसवून ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, या रुग्णाने सेकंड ओपिनियन घेतल्यावर स्टेंटची गरजच नसल्याचे स्पष्ट झाले.

माजी शास्त्रज्ञ असलेल्या पुष्कराज सबनानी यांनी ‘सीविक मिरर’सोबत बोलताना हा धक्कादायक अनुभव सांगितला.  कॅन्सर, मधुमेह आणि  उच्च रक्तदाब  या व्याधींनी ग्रस्त असलेले सबनानी उपचारासाठी मणिपाल रुग्णालयात गेले होते. त्यांना अस्वस्थ वाटणे आणि छातीत दुखण्याची तक्रार  होती. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून अँजिओग्राफी करावी लागेल, असे सांगितले.

‘‘काही व्याधी आढळल्यास औषधोपचार करता येईल, असा विचार करून मी अँजिओग्राफीला परवानगी दिली. त्यासाठी मला भूल देण्यात आली. मात्र, ते भुलीच्या अमलाखाली असतानाच हृदयरोगतज्ज्ञ  डॉ. अभिजित जोशी तेथे आले. त्यांनी सांगितले रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक असल्याने दोन स्टेंट टाकावे लागतील. यामुळे मला धक्काच बसला. मी किरकोळ उपचारासाठी आलो होतो, असे सांगून स्टेंट बसविण्यासाठी नकार दिला. मात्र, डॉक्टर ऐकतच नव्हते. सुरुवातीला आस्थेने बोलत असलेले डॉ. जोशी माझ्या नकारानंतर अधिकच आक्रमक झाले. फक्त चार लाख रुपयांचा प्रश्न आहे, असे म्हणू लागले. माझ्या हाताला एक उपकरण अगोदरच लावले होते. मला कॅथ लॅबमध्ये नेण्याच प्रयत्न करू लागले,’’ असा अंगावर शहारे आणणारा अनुभव सबनानी यांनी सांगितला.

‘‘मी नकारावर ठाम आहे दिसल्यावर डॉक्टरांनी आपला मोर्चा माझ्या पत्नीकडे  वळविला. ते पत्नीला समजावण्याचा प्रयत्न करू लागले. पत्नीसोबत खर्चाच्या वाटघाटी सुरू केल्या. मी निवृत्त असल्याने मला एवढा खर्च परवडणार नाही, असे सांगितल्यावर चार लाखाचे ३.८५ लाख रुपयांत दोन स्टेंट टाकण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. ते मला रुग्णालयातून बाहेरही पडू देत नव्हते. मणिपाल रुग्णालयाने अनैतिक पद्धतीने वागून माझा अपमान केला आहे. स्टेंट टाकायला नकार दिल्यानंतर मला अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली,’’असा आरोप सबनानी यांनी ‘सीविक मिरर’सोबत बोलताना केला.

एवढे सगळे झाल्यावर सबनानी यांनी दुसऱ्या ज्येष्ठ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे ठरविले. त्यांनी  डॉ. ए. बी. चांदोरकर यांना आपले रिपोर्ट  दाखविले. आश्चर्य म्हणजे डाॅ. चांदोरकर यांनी स्टेंट टाकण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला. केवळ औषधोपचार घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला.
सबनानी म्हणाले, ‘‘मणिपाल रुग्णालयातील डॉक्टरांची वागणूक अत्यंत गैर आहे. याबाबत मी केवळ मणिपाल रुग्णालयाकडेच नाही तर इंडियन मेडिकल  असोसिएशनकडेही दाद मागण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे तक्रारही केली आहे. ’’

या संदर्भात संपर्क साधला असता ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ए. बी. चांदोरकर म्हणाले, ‘‘मणिपाल हॉस्पिटलने सुचविल्याप्रमाणे रुग्णाला  स्टेंट उपचारांची आवश्यकता नव्हती. मुख्य धमनीमध्ये ७० टक्क्यांहून अधिक ब्लॉकेज असल्यास किंवा हृदयविकाराच्या झटक्यासारखी परिस्थिती उद्भवण्याची भीती असतानाच स्टेंटचा पर्याय सुचविला जातो. ब्लाॅक असल्यास इतर उपचारही आहेत. त्यासाठी प्रत्येकच वेळी अँजिओप्लास्टी करण्याची गरज नसते.’’

इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष  डॉ. राजन संचेती यांनीही सबनानी यांनी तक्रार आल्याचे मान्य केले. ते म्हणाले, ‘‘आम्ही नुकतीच  ६०० हून अधिक रुग्णालयांची एक बैठक घेतली होती. रुग्णांवर सहानुभूतीपूर्वक उपचार करा आणि जास्त शुल्क न आकारण्याचा सल्ला दिला आहे. अनेक रुग्णालयांकडून रुग्णांकडून जास्त शुल्क आकारले जात असल्याच्या  तक्रारी आमच्याकडे येत आहेत. एक स्टेंट टाकण्याची किंमत ८० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावी.  तथापि, रुग्णांना काही लाख रुपये खर्च सांगितला जातो.’’

मणिपाल रुग्णालयाने आरोप फेटाळले
सबनानी यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात ‘सीविक मिरर’ने डॉ. अभिजित जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, ‘‘सबनानी यांची प्रकृती खरोखरच गंभीर होती. त्यामुळे त्यांना स्टेंट टाकण्याची गरज होती. त्यांनी आर्थिक अडचण सांगितल्यावर मानवतावादी भूमिकेने आम्ही किंमत चार लाखांहून साडेतीन लाखांपर्यंत खाली आणली. तरीही, त्यांनी नकार दिला. आम्ही वैद्यकीय व्यावसायिक म्हणून  कोणावरही जबरदस्ती करत नाही.  त्यांच्या संमतीशिवाय पुढची प्रक्रिया करत नाही. खरे तर सबनानी हे आमच्या एका सहकाऱ्याच्या ओळखीने रुग्णालयात आले होते. त्यामुळे आम्ही त्यांना सवलत देण्याबाबत बोलत होतो.’’

मणिपाल रुग्णालयानेही सबनानी यांनी केलेले आरोप नाकारले. ‘‘आम्ही रुग्णांची काळजी घेण्यासाठी वचनबद्ध आहोत. सबनानी यांच्या आरोपांसंदर्भात आम्ही चौकशी केली आहे. रुग्णांचे आरोग्य हे आमचे प्राधान्य आहे,’’ असे मणिपाल रुग्णालयाने नमूद केले.

आजकाल गरज नसताना  हृदय शस्त्रक्रिया,  गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया केली जाते. वास्तविक डॉक्टरांनी रुग्णांवर सर्वांगीण उपचार करायला हवेत. स्टेंटची गरज नसतानाही सुचविणारे अनेक डॉक्टर आहेत.
- डॉ. ए. बी. चांदोरकर, ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest