कात्रज तलावात पहिल्यांदाच ड्रोनच्या सहाय्याने डास नियंत्रण फवारणी !
पुणे शहरातील डासांचे प्रमाण नियंत्रणात राहावे यासाठी वेळोवेळी शहरांमध्ये औषध फवारणी करण्यात येते. पण यावेळी पुणे महापालिकेकडून पहिल्यांदाच कात्रज तलावाजवळ ड्रोनच्या सहाय्याने डास नियंत्रण औषध फवारणी करण्यात आली.
कात्रज तलावातील जलप्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच तलावात प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या व पूजेचे निर्माल्य मोठ्या प्रमाणात साचले आहे. यामुळे परिसरात डासांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या डासांपासून संसर्गजन्य रोगांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, या भागातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने चित्र आहे.
अशातच पुणे महापालिकेडून या परिसरातील डासांची संख्या नियंत्रित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ड्रोन फवारणी करण्यात आली. ही फवारणी कात्रज तलावातील पाण्यावर करण्यात आली आहे. या ड्रोनमध्ये डास नियंत्रण असलेल्या औषधांचा वापर करण्यात आला होता. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही फवारणी करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना डासांपासून काही प्रमाणात सुटका मिळण्याची शक्यता आहे.