वडगाव शेरीतील अटीतटीच्या लढाईत पठारेंनी मारली बाजी
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना अटीतटीच्या लढाईत ४ हजार ७१० मतांनी पराभूत करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी बाजी मारली.
पुणे शहरात महायुतीचे उमेदवार विजयी होत असताना वडगाव शेरी मतदारसंघात घमासान सुरू होते. पहिल्या फेरीपासून राहिलेली पिछाडी २० व्या फेरीनंतर मोडून काढत ४ हजार २०० मतांची आघाडी घेत विजय निश्चित केला. शेवटच्या टप्प्यात बापूसाहेब पठारे बाजीगर ठरले. २००९ नंतर २०२४ च्या अटीतटीच्या लढतीत दुसऱ्यांदा आमदार पदावर विराजमान होत आपणच वडगाव शेरीचे किंग असल्याचे पठारे यांनी सिद्ध केले. पठारे यांना १ लाख ३३ हजार ६८९ (४७.०७ टक्के) तर टिंगरे यांना १ लाख २८ हजार ९७९ (४५.४१ टक्के) मते मिळाली.
राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ चर्चेत होता. महायुतीकडून ही जागा भाजपच्या जगदीश मुळीक यांना जाणार की विद्यमान आमदार सुनील टिंगरे हेच वडगाव शेरीचे आगामी उमेदवार असणार, यावरून जोरदार चर्चा रंगली होती. अखेरीस टिंगरे यांनी पुन्हा उमेदवारी मिळवली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अनुभवी उमेदवार असलेल्या बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी दिली. तेव्हापासून वडगाव शेरीचा सामना अटीतटीचा होईल, अशी शक्यता वर्तवली गेली. आणि प्रत्यक्षात झालेही तसेच. मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर सुनील टिंगरे यांनी आघाडी घेतली होती. टिंगरे यांचा भाग सोडताच येरवड्यापासून खाली वडगाव शेरी, खराडी भागातील मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर टिंगरे यांनी घेतलेले लीड तोडण्यास पठारे यांनी सुरुवात केली होती. २० व्या फेरीपर्यंत दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण दिसून आले. वडगाव शेरी गावातील मतपेट्या उघडल्या त्यावेळी कार्यकर्त्यांनी श्वास रोखून धरला होता. मात्र दोघांना जवळपास ५० टक्के समान मते मिळाली. त्यानंतर पठारे यांनी ४ हजार २०० मतांची आघाडी घेत २१ व्या फेरीनंतर विजय निश्चित केला. कार्यकर्त्यांनी पठारे यांनी आघाडी घेताच जल्लोष करण्यास सुरुवात केली.
सरपंच ते आमदार असा बापूसाहेब पठारे यांचा प्रवास आहे. मागील काही वर्षे ते काही कारणास्तव राजकारणापासून लांब राहिले. यामुळे २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे जगदीश मुळीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनी विजय मिळवला होता. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी विधानसभेचे तिकीट मिळवलं आणि त्यात ते विजयी झाले. पठारे यांना निवडून आणण्यासाठी येरवडा हा गेम चेंजर ठरला.
वडगाव शेरीने धाकधूक वाढवली
राज्यभरासह पुणे अन् पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि भाजपचा झंझावात असताना वडगाव शेरीत मात्र घमासान सुरू होते. मतमोजणी केंद्रात दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते तणावात होते. शांतता पसरली होती. पठारे आणि टिंगरे यांच्यात चुरस सुरू होती. वडगाव शेरीतील मतपेट्या बाहेर येत होत्या तशी धाकधूक वाढत होती. माजी आमदार मुळीक आणि भाजपच्या माजी नगरसेवकांनी गाव पिंजून काढले होते. गावात पठारे यांच्यावर नाराजी होती. त्यामुळे पठारे यांना मिळणाऱ्या मतांमध्ये फरक पडेल, अशी चर्चा रंगली होती. परंतु दोघांना ५०-५० टक्के मते मिळाली. शेवटी पठारेच आघाडीवर राहिल्याने पठारे यांच्या गोटाची काळजी मिटली.
गेल्या काही वर्षांपासून सुरेंद्र पठारे यांनी मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवत कामाला सुरुवात केली. प्रत्येक गोष्टीत सहभागी होत त्यांनी मतदारसंघातल्या अडचणी जाणून घेतल्या व सोबतच पर्यायाने त्या सोडविण्यासाठी लढा उभारला आणि आंदोलने केली. पुण्यातील सीईओपी महाविद्यालयातील गोल्ड मेडलिस्ट असलेल्या सुरेंद्र पठारे यांनी मागील काही वर्षात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. दीड महिन्यापासून ते पायाला भिंगरी लागल्यासारखी फिरत होते. आणि त्याचा परिणाम विजयात झाला. वडील बापूसाहेब पठारे यांच्या गळ्यात त्यांनी विजयाची माळ घातली.
येरवडा ठरले किंगमेकर
वडगाव शेरीचा आमदार कोण, हे येरवड्यातील जनता ठरवत आल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे सुरेंद्र पठारे यांनी येरवडा भागात सूक्ष्म नियोजन केले होते. या भागात सातत्याने कार्यक्रमांचे आयोजन करून पठारे यांच्या बाजूने जनमत फिरवण्यात यश आले. तसेच बापूसाहेब पठारे यांचे जुने कार्यकर्ते या भागात मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्या सुखदु:खात पठारे जातात, ही जमेची बाजू होती. पठारे हे सर्वसामान्यांच्या घरात जाऊन बसतात. त्यांची समस्या समजून घेतात आणि सोडवतात देखील. याचा अनुभव येथील मतदारांना होता, त्यामुळेच येरवड्यात सुमारे १२ हजारहून अधिक मतदान त्यांना मिळाले. त्यामुळे पठारे यांचा विजय निश्चित झाला, असे मतदारांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले.
शरद पवारांच्या सभेने वातावरण फिरले
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पठारे प्रवेश केल्यानंतर काही दिवसातच पक्षाचे नेते शरद पवार यांची सभा वडगाव शेरीत मतदारसंघातील पठारे यांच्या गावात झाली होती. पवारांनी टिंगरे यांचा चांगलाच समाचार घेतला होता. पठारे हेच शरद पवार गटाचे उमेदवार असतील त्यावेळी स्पष्ट झाले होते. निवडणुकीच्या पूर्वीच पवारांनी वडगाव शेरीतील वातावरण फिरवले होते. तसेच जनमानसात पठारे हेच आमदार व्हावे, अशी भावना निर्माण झाली होती ती टिकवण्यात पठारे यांना यश आले.
बापाचे स्वप्न मुलाने केले पूर्ण...
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. पठारे यांचा झालेला पराभव जिव्हारी लागला होता. त्यानंतर २०१९ ला राष्ट्रवादीने तिकीट नाकारत पठारे यांनी टिंगरे यांच्या प्रचारात सहभागी होण्याचे आदेश दिले होते. पक्षादेश मानून पठारे यांनी प्रचार प्रामाणिकपणे केला. परंतु राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रचारादरम्यान पठारे यांच्याशी बोलणे टाळले होते. त्यामुळे पठारे यांनी नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पठारे यांच्याकडे तब्बल दहा वर्षे कोणतेही पद नव्हते. तरीसुद्धा त्यांनी जनतेशी जोडलेली नाळ कधी तुटू दिली नाही. जनतेची कामे करण्यास तत्पर राहिले. त्यांना जनमानसात राहणे ही त्यांची शक्ती होती. ही नस ओळखून बापाचे गेलेले साम्राज्य पुन्हा एकदा मिळवून देण्यासाठी पठारे यांचा मुलगा सुरेंद्र हे जिद्दीने पेटून उटले होते. चार वर्षांपासून आखलेले सूक्ष्म नियोजन, तरुणांची बांधलेली मोट, प्रत्येकावर ठेवलेला विश्वास, डिजिटल माध्यमातून केलेला प्रचार, आधुनिक सोयींनी युक्त असलेले वॉर रूम आणि गावकी-भावकी एकत्र आल्याने तसेच बापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेली जिद्द यामुळेच पठारे यांना विजश्री खेचून आणण्यात यश आले, असे मतदार सांगत असून बापाचे स्वप्न मुलाने पूर्ण केले असे बोलून सुरेंद्र यांचे कौतुक केले जात आहे.
हा विजय संपूर्ण वडगाव शेरी मतदारसंघातील जनतेचा आहे. मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी सर्वतोपरी कार्यशील राहणार आहे. इथल्या एकूण एक समस्यांवर ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवून त्या मार्गी लावणार. या लढाईत सोबत असलेल्या महाविकास आघाडीच्या प्रत्येकाचे मी आभार मानतो.
- बापूसाहेब पठारे
नागरिकांनी पुन्हा एकदा बापूसाहेब पठारे यांना विक्रमी मतांनी निवडून देत मतदारसंघाच्या विकासाचा शुभारंभ केला आहे. बापूसाहेब यांच्याकडे असलेला प्रदीर्घ अनुभव, विकासाची दूरदृष्टी आणि प्रत्येक घटकाविषयी असलेला आपलेपणा ही जमेची बाजू ठरली. येणाऱ्या काळात मतदारसंघाचा कायापालट होणार आहे. विविध प्रश्नांनी त्रासलेल्या आमच्या या मतदारसंघातील नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठीचाच हा विजय आहे. या विजयात जनतेचा मोठा वाटा आहे.
- सुरेंद्र पठारे, अध्यक्ष, सुरेंद्र पठारे फाऊंडेशन
वडगाव शेरीतील मतदारांनी दिलेला पाठिंबा आणि कार्यकर्त्यांनी मनापासून केले काम यामुळे विजय साध्य करता आला. बापूसाहेब पठारे यांनी जनतेसाठी केलेली कामे हा महत्त्वाचा मुद्दा होता. मतदारसंघात अनेक समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी दिलेले आश्वासन यामुळे मतदारांनी विश्वास टाकला. वडगाव शेरीत पठारे यांना मिळालेला हा विजय म्हणून सर्वांचे सामूहिक यश आहे.
- संतोष भरणे, सामाजिक कार्यकर्ते
बापूसाहेब पठारे यांना मिळालेली मते
एकूण : १,३३,६८९, मतांची आघाडी : ४७१०, टक्के मते मिळाली : ४७.०७
सुनील टिंगरे यांना मिळालेली मते
एकूण : १,२८,९७९, टक्के मते मिळाली ४५.४१