चेतन तुपेंनी राखले हडपसर
पुणे जिल्ह्यातील हडपसर मतदारसंघात प्रत्येक वेळी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची परंपरा हपसर मतदारसंघातील मतदारांनी यंदा मोडीत काढली. राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार)चे चेतन तुपे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे उमेदवार प्रशांत जगताप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साईनाथ बाबर अशी तिरंगी लढत रंगली. या लढतीत चेतन तुपे यांनी सुरुवातीच्या काही फेऱ्यात २५ हजाराहून अधिक मतांचे लिड घेतले होते. त्यानंतर १८व्या फेरी अखेर तुपे यांचे मताधिक्य केवळ ३१०० राहिले. त्यानंतर ७,१२२ मताधिक्यांनी जगताप यांना पराभवाची धुळ चारली. हडपसरमध्ये नवीन उमेदवाराला निवडूण दिले जाते हा अंधविश्वास मतदारांनी दूर केला असा दावा करत जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे निवडूण आल्याचे तुपे यांनी सांगितले.
हडपसर मतदारसंघात तिरंगी लढत झाली असली तरी ही मुख्य लढत ही राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी अशीच झाली. राष्ट्रवाद पक्ष फुटीनंतर तुपे यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर जगताप यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबत जात या मतदारसंघातून आमदारकीसाठी जोरदार तयारी केली होती. दुसरीकडे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महादेव बाबर यांना उमेदवारी हवी होती. परंतु तुपे यांना तिकीट मिळाल्याने नाराजी होती. त्यामुळे तुपे यांना ही निवडणुक सोपी नसल्याचे बोलले जात होते. असे असतानाचा प्रशांत जगताप यांना हडपसर विकास आघाडी स्थापन करुन विरोध करण्यात आला होता. बाहेरचा उमेवदार असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्यानंतर नाराजी दूर करण्यात जगताप यांना यश आले. पण मतदारांवर अपेक्षित प्रभाव पाडण्यात अपयश आल्याने तुपे यांनी इतिहास घडवत पुन्हा आमदारकीवर विराजमान झाले. अजित पवारांचा शिलेदार म्हणून चेतन तुपे यांना ओळखले जाते. दरम्यान, मतमोजनीच्या पहिल्याच फेरीपासून चेतन तुपे हे आघाडीवर होते. शेवटच्या काही फेर्यांमध्ये प्रशांत जगताप यांनी मुसंडी मारत तुपे यांची आघाडी कमी केली होती. मात्र, जगताप यांना शेवटपर्यंत आघाडी घेता आली नाही.
मनसेकडून साईनाथ बाबर रिंगणात होते. तर अपक्ष गंगाधर बधे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. विधानसभेच्या जागावाटपावेळी महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही हडपसर विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच पाहायला मिळाली होती. तुपे यांनी विजय मिळवत विजयी पताका फडकावली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील माझ्या माय बाप जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी आज माझे शब्द अपुरे आहेत. हडपसरचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला हडपसर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी पुनश्च एकदा उपलब्ध करून दिली यासाठी सर्वप्रथम जनतेचे मनापासून आभार मानतो. माझे सहकारी आमदार योगेश अण्णा टिळेकर, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचे, महायुतीचे सर्व घटक पक्ष, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनापासून आभार मानतो. या सर्वांनी दिलेली साथ आणि विश्वास माझ्यासाठी मोलाचा आहे. अशी फेसबुकवर पोस्ट लिहित चेतन तुपे यांनी जनतेचे, पदाधिकारी, मित्र पक्षाचे आभार मानले आहेत.
मतदान सर्वात झाले होते कमी
हडपसर मतदारसंघात इतर विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत सर्वात कमी मतदान झाले होते. त्यामुळे कमी मतदान झाल्याचा धोका कोणाला यावरून चर्चा रंगली होती. शेवची कमी मतदानाची टक्केवारी तुपे यांच्या पथ्यावर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. हडपसर मतदार संघात एकून १९ उमेदवारांनी निवडणूक लढवली. हडपसर मतदार संघात ६ लाख २५ हजार ९२८ मतदार आहेत. हडपसरमध्ये यंदा ३ लाख १४ हजार ५३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
चेतन तुपे एकूण मिळालेली मते - एकूण- १ लाख ३४ हजार ८१० मते. ४२.४६ टक्के,
प्रशांत जगताप यांना मिळालेली मते - एकूण १ लाख २७ हजार ६८८, ४०.२२ टक्के.
मनसेचे साईनाथ बाबर यांना मिळालेली मते - एकूण ३२ हजार ८२१, १०.३४ टक्के.
एकदा निवडून दिलेला आमदार पुन्हा निवडून येत नाही. असा अंधविश्वास हडपसर मतदारसंघात होता. मात्र हा अंधविश्वास आता मतदारांनी पुसून टाकला आहे. विकास कामे करतो, त्या उमेदवाराला जनता निवडून देत असते, हे माझ्या विजयाने सिध्द झाले आहे. जनता सोबत आहे, आता यापुढे विकास कामे करण्यालाच प्राधान्य दिले जाईल. हडपसरमधील एकी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट यामुळे निवडणुकीत विजय मिळाला.
- चेतन तुपे, आमदार, हडपसर मतदारसंघ.