पुणे शहरावर कमळाचे वर्चस्व; आठपैकी सहा जागांवर दणदणीत विजय

पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभांवर भाजपाने विजय मिळवला. एका ठिकाणी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा एक उमेदवार निवडून आला.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

पुणे शहरावर कमळाचे वर्चस्व

दोन्ही राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा; महाविकास आघाडीचा ‘लाडक्या बहिणीं’नी उडवला धुव्वा

महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचा एकमेकांसोबत असलेला समन्वय-सुसंवाद, निवडणुकीची यशस्वी ठरलेली रणनीती, नियोजनबद्ध प्रचार, विकासाचे मुद्दे पोहोचवण्यात आलेले यश आणि लाडकी बहीण योजनेचा परिणाम तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रचनात्मक पद्धतीने केलेले काम यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यामुळेच पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा विधानसभांवर भाजपाने विजय मिळवला. एका ठिकाणी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा एक उमेदवार निवडून आला. पुण्यातील आठपैकी सात जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यात महायुतीला यश आले. पुण्यामध्ये महाविकास आघाडीचा अक्षरश: धुव्वा उडाला. त्यांना केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले.

पुण्याच्या कोथरूड मतदारसंघामधून भाजपाचे चंद्रकांत पाटील सलग दुसऱ्यांदा, पर्वतीमधून माधुरी मिसाळ चौथ्यांदा, खडकवासल्यामधून भीमराव तापकीर चौथ्यांदा, कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे दुसऱ्यांदा, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे दुसऱ्यांदा, कसबा पेठेमधून हेमंत रासने पहिल्यांदा निवडून आले. राष्ट्रवादीचे चेतन तुपे हे दुसऱ्यांदा आमदार बनले आहेत, तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे बापूसाहेब पठारे हे १० वर्षांनंतर पुन्हा आमदार बनले आहेत.

एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यावर मागील १५ वर्षांत भाजपने आपला जम बसवत हळूहळू सत्ता काबीज करण्यास सुरुवात केली. लोकसभा आणि विधानसभेवर मागील दहा वर्षात भाजपाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना डोकेच वर काढू दिले नाही. लोकसभेला १ लाख २३ हजारांचे मताधिक्य देऊन पुणेकरांनी भाजपाचा खासदार निवडून दिला होता. पुणेकरांनी विधानसभेलादेखील भाजपला साथ दिल्याचे दिसून आले.

निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागू केली होती. साधारण महिनाभराच्या प्रचारानंतर २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रत्यक्ष पार पडले. पुण्यात साधारण साडेआठ हजार केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. शनिवारी (दि. २३) प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया पार पडली. पुण्यात सरासरी ६१ टक्के मतदान झाले. मतदानाची ही टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. वाढलेला हा टक्का भाजपा-महायुतीच्या फायद्याचा ठरला. विशेष म्हणजे महायुतीमधील घटक पक्षांचा समन्वय आणि संवाद उत्तम पद्धतीने ठेवला गेल्याने अधिकाधिक उमेदवार निवडून आणणे अधिक सोईचे झाले. याच वेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये मात्र फारसा उत्साह दिसला नाही. तसेच, काही ठिकाणी बंडखोरांनी आणि नाराजांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढवली.

पर्वती मतदारसंघात कॉंग्रेसचे आबा बागूल यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीच्या (शप) अश्विनी कदम यांची डोकेदुखी वाढली होती. बागूल यांनी १० हजार १०५ मते घेतली. तर, वडगाव शेरी मतदारसंघात आरपीआयचे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार न करण्याची भूमिका घेत पक्ष सोडला. त्याचा फटका राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील टिंगरे यांना बसला. यासोबतच मनसेनेदेखील शहरात उमेदवार दिले होते. खडकवासला, कोथरूड, कसबा, हडपसरमध्ये मनसेचे उमेदवार होते. यातील खडकवासला आणि हडपसरमध्ये मतांचे लक्षणीय विभाजन पाहायला मिळाले.

कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव करीत १ लाख १२ हजारांचे मताधिक्य घेत जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्याची नोंद केली. कसबा पेठ मतदारसंघात भाजपच्या हेमंत रासने यांनी २०१९ मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढत १९ हजार ४२३ मतांचे मताधिक्य घेऊन विजयाची नोंद केली. शिवाजीनगरमध्ये दत्ता बहिरट यांना आजारपणामुळे मर्यादा आल्या. शिवाजीनगरमध्ये कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार मनीष आनंद यांनीदेखील आपला प्रभाव काही प्रमाणात दाखवला, तर कॅन्टोन्मेंट मतदारसंघात कॉंग्रेसच्या रमेश बागवे यांनी कडवी झुंज दिली. पर्वतीमध्ये महिला विरुद्ध महिला अशी जिल्ह्यातील एकमेव लढत भाजपाच्या माधुरी मिसाळ यांनी जिंकली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, नितीन गडकरी, सुप्रिया सुळे, अजित पवार, योगी आदित्यनाथ, पवनकल्याण, विनोद तावडे आदी नेत्यांच्या झालेल्या सभा आणि प्रचार यामुळे निवडणुकीत रंगत आली होती. आरोप-प्रत्यारोप, पक्ष फुटीचे मुद्दे या निवडणुकीत तापलेले होते. मात्र, लाडकी बहीण योजनेमुळे पुण्यात मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली. महिलांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत मतदान केले. यासोबतच, ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा ‘कॅम्पेन’चा प्रभाव देखील पाहायला मिळाला.

मनसेने केले मतविभाजन
हडपसरमध्ये मनसेच्या साईनाथ बाबर यांनी ३२ हजार ८२१ मते घेतली. राष्ट्रवादीच्या चेतन तुपे यांचा विजय बाबर यांच्यामुळे अधिक सोईस्कर झाला. बाबर नसते तर कदाचित्र चित्र वेगळे दिसले असते. यासोबतच, खडकवासला मतदारसंघात माजी दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांनी मनसेकडून निवडणूक लढविली. त्यांनी ४२ हजार ८९७ मते घेतली. वांजळे यांची उमेदवारीदेखील मतांचे विभाजन करण्यात भाजपाच्या फायद्याची ठरली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest