माधुरी मिसाळांनी विजयासोबत रचला नवा विक्रम

भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा भाजपाचे कमळ फुलले आहे. पर्वतीच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार) उमेदवार अश्विनी कदम सलग दुसऱ्यांदा पराभव केला.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

माधुरी मिसाळांनी विजयासोबत रचला नवा विक्रम

पहिल्या फेरीपासूनच मताधिक्य, पुणे जिल्ह्यातील सलग चौथ्यांदा आमदार बनलेल्या एकमेव महिला

भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा भाजपाचे कमळ फुलले आहे. पर्वतीच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार) उमेदवार अश्विनी कदम सलग दुसऱ्यांदा पराभव केला. यंदाच्या विजयाने मिसाळ यांच्या नावावर एका नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून गेलेल्या माधुरी मिसाळ या पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार ठरल्या आहेत. मिसाळ यांनी कदम यांना पराभूत करताना २०१९ च्या तुलनेत अधिक मताधिक्य मिळवीत आपली मतदारसंघावरची पकड किती घट्ट आहे याची प्रचिती दिली.

भाजपाकडून मिसाळ यांना उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर पक्षांतर्गत नाराजी पाहायला मिळाली होती. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजांची समजूत काढत मिसाळ यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. पर्वती मतदारसंघात जसा भाजपाचा हक्काचा मतदार आहे, तसाच मिसाळांचा म्हणून स्वत:चादेखील मतदार वर्ग आहे. विशेषत: भाजपाचे सरचिटणीस दीपक मिसाळ यांचा तरुणांमध्ये असलेला दांडगा संपर्क आहे. पर्वतीमधील मतदारांपर्यंत पोहोचण्यात मिसाळ यशस्वी ठरल्या. बूथ आणि शक्ती केंद्रापर्यंत अत्यंत तगडी आणि प्रभावशाली यंत्रणा लावण्यात भाजपा यशस्वी झाली होती. विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रचना अत्यंत शांतपणे आपले काम करीत होती. त्याचाही परिणाम पाहायला मिळाला. पर्वती मतदारसंघात २३ नगरसेवक आहेत. यामधील १९ नगरसेवक एकट्या भाजपाचे आहेत. यासोबतच लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजनांचा देखील फायदा मिळाल्याचे दिसले.

अश्विनी कदम यांनी देखील प्रचाराची चोख रचला राबवली होती. मोठ्या प्रमाणावर पदयात्रा, रॅली, सभा आणि कोपरा सभांचे आयोजन केले होते. कदम यांनी वैयक्तिकरित्या लोकांशी संपर्क साधण्यावर आणि भेटण्यावर अधिक भर दिला होता. मिसाळ यांच्यासमोर लढण्याची ही त्यांची दुसरी वेळ होती. २०१९ साली देखील मिसाळ विरुद्ध कदम असा सामना झालेला होता. २०१४ च्या तुलनेत मिसाळांचे मताधिक्य कमी करण्यात कदम यांना यश आले होते. त्यावेळी कदम यांचा पराजय झाला होता. यंदा देखील कदम अधिक चांगली लढत देतील असा अंदाज होता. मिसाळ यांच्याबाबत मतदार आणि पदाधिकारी यांच्यात नाराजी असल्याची चर्चा होती. मात्र, मिसाळ यांनी या सर्व शक्यतांना फाटा देत विजय खेचून आणला. महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणावर समन्वयाचा अभाव दिसत होता. राष्ट्रवादी (शप) – शिवसेना (उबाठा)  – कॉंग्रेस या तीनही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये काही प्रमाणावर नाराजी शेवटीशेवटी पसरल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे, भाजपाने मात्र महायुतीमधील घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि नेत्यांशी उत्तम समन्वय ठेवला. त्याचाही सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला.

पर्वती मतदारसंघात कॉंग्रेसचे आबा बागूल यांनी बंडखोरी केली. त्यांनी महाविकास आघाडीकडे तिकीट मागितले होते. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. बागूल यांनी २०१९ साली देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. त्यावेळी पक्षश्रेष्ठींचा मान ठेवत त्यांनी माघार घेतली होती. मात्र, यंदा त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. त्यांच्यामुळे अश्विनी कदम यांच्यासमोर आव्हान उभे राहिले होते. बागूल यांच्या बंडखोरीचा फटका देखील त्यांना बसला.

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिसाळ यांना ९७ हजार १२ तर कदम यांना ६० हजार २४५ मते मिळाली होती. त्या वेळी पर्वतीत ४९.०५ टक्के मतदान झाले होते. यंदा ५५.२६ टक्के मतदान झाले. यंदा मतदानाचा टक्का सुमारे सहा टक्के वाढला. हा वाढलेला मतदानाचा टक्का भाजपाच्या पथ्यावर पडला.

पहिल्या फेरीपासूनच आघाडी
शनिवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच मिसाळ यांनी आघाडी घेतली होती. ही आघाडी शेटवटच्या फेरीपर्यंत कायम राखत २० व्या फेरीअखेर ५४ हजार ५१५ मतांनी मिसाळांनी विजय खेचून आणला. त्यांना १ लाख १८ हजार १९३ मते मिळाली, तर अश्विनी कदम यांना ६३ हजार ५३३ मते मिळाली. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आबा बागूल यांना १० हजार ४४६ मते मिळाली. नोटाला २४६१ मते मिळाली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest