दिलजीत दोसांझच्या म्युझिक कॉन्सर्टला स्थानिकांचा विरोध, कोथरूडकर रस्त्यावर
सुप्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याच्या कार्यक्रमांस स्थनिक कोथरूडकरांनी विरोध केला आहे. या कार्यक्रमाच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी स्थानिकांनी 'वेळ आहे लढायची आपले कोथरूड वाचवायची' असे फलक लिहून सेव्ह कोथरूडच्या घोषणा दिल्या.
दिलजीत दोसांझ याची रविवारी (२४ नोव्हेंबर) पुण्यात म्युझिक कॉन्सर्ट होणार आहे. पुण्यात काकडे फार्म येथे दिलजीत दोसांझची म्युझिक कॉन्सर्ट होणार आहे. दोसांझ सध्या 'दिल लुमिनाटी' टूरवर आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी सायंकाळी त्याचा गाण्यांचा कार्यक्रम पुण्यात होणार आहे. या कार्यक्रमामुळे दोसांझ चर्चेत आला आहे. तरुणाई दोसांझच्या गाण्यांना पसंत करत आहे. मात्र पुणेकरांनी या कार्यक्रमाला विरोध केला आहे.
या कॉन्सर्टला कोथरूडचे नवनियुक्त आमदार तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोध दर्शवला आहे. फक्त दारू विक्रीसाठी विरोध नाही तर हा कार्यक्रम देखील रद्द करा अशा सुचना चंद्रकांत पाटील यांनी पुणे पोलीस आयुक्त, उत्पादन शुल्क विभाग, आणि जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत. या कार्यक्रमामुळे वाहतूक कोंडी आणि कर्कश आवाजामुळे स्थानिकांना होणारा त्रास यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. असे कार्यक्रम समाजाला लागलेली किड असून हा कार्यक्रमझाला तर त्या विरोधात मोर्चा काढला जाईल असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसेच स्थानिकांनी देखील या कार्यक्रमाला विरोध केला आहे. कार्यक्रमाच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पुण्यात कोथरूड मधील काकडे फार्म येथे होणाऱ्या दिलजीत दोसांझच्या म्युझिक कॉन्सर्टला माझा स्थानिक आमदार म्हणून तसेच पण एक नागरिक म्हणून विरोध आहे. फक्त दारू विक्रीसाठी विरोध नाही तर या कार्यक्रमामुळे होणाऱ्या ट्रॅफिक जाम आणि कर्कश आवाजाला सुद्धा माझा विरोध आहे. हा कार्यक्रम रद्द करा अशा सुचना मी पोलीस आयुक्त, उत्पादन शुल्क विभाग, आणि जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत. असे कार्यक्रम समाजाला लागलेली किड आहे. त्यामुळे कोथरूड मध्ये हा कार्यक्रम झाला तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येईल आणि या मोर्चाचे नेतृत्व मी स्वतः करेन.