कॅन्टोन्मेंट अन् कांबळे समीकरण पुन्हा हिट!

पुणे शहरात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा कॅन्टोन्मेंट अन् कांबळे हे समीकरण हिट ठरले आहे. भाजपचे सुनील कांबळे यांनी काँग्रेसचे रमेश बागवे यांना १०,२२६ मतांनी पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आमदार ठरण्याचा मान मिळवला.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुनील कांबळे सलग दुसऱ्यांदा विजयी

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुनील कांबळे सलग दुसऱ्यांदा विजयी

पुणे शहरात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा कॅन्टोन्मेंट अन् कांबळे हे समीकरण हिट ठरले आहे.  भाजपचे सुनील कांबळे यांनी काँग्रेसचे रमेश बागवे यांना १०,२२६ मतांनी पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आमदार ठरण्याचा मान मिळवला.

 या निवडणुकीत कांबळे यांना ७५,७२६ तर बागवे यांना ६५,४७० मते मिळाली. लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला तब्बल १६ हजारांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हा मतदारसंघ आपल्याकडे राखेल असं सर्वच राजकीय विश्लेषक आणि निवडणूक तज्ज्ञ सांगत होते. मात्र लोकसभेनंतर भाजपने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षांसोबत संघटनात्मक मोर्चे बांधणी आणि नियोजनबद्ध निवडणूक प्रचार करून हा मतदारसंघ अक्षरशः काँग्रेस कडून खेचून आणला.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये यंदादेखील जुनाच सामना पाहायला मिळाला. २०१९ मध्येदेखील कॅन्टोन्मेंटमध्ये महाविकास आघाडीकडून रमेश बागवे तर महायुतीकडून सुनील कांबळे मैदानात होते. त्यावेळीही बागवे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.

२०१९ मध्ये सुनील कांबळे यांनी रमेश बागवे यांचा अवघ्या पाच हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीमध्ये रमेश बागवे यांनी ही मतांची आघाडी मोडून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार केल्याचं पाहायला मिळालं. या मतदारसंघांमध्ये मुस्लीम मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. हा समाज सातत्याने काँग्रेसच्या पाठीशी राहिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे याच मुस्लीम मतदारांना केंद्रभागी ठेवून रमेश बागवे यांनी प्रचाराची रणनीती आखल्याचे पाहायला मिळालं होतं. या मतदारसंघामध्ये २ लाख ९५ हजार ३५८ मतदारांपैकी ५८ हजार मुस्लीम मतदार आहेत. या मुस्लीम मतदारांचे मत निर्णायक ठरण्याची शक्यता होती. मात्र तसे घडले नाही.  

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघात भाजप पिछाडीवर होता. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवला असला तरी कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून ते १६ हजार मतांनी माघारले होते. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात उमेदवार बदलावा, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात होती. त्यामुळे भाजपने विविध पर्यायांवरदेखील विचार केला. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा सुनील कांबळे यांनाच मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला.

या विधानसभा मतदारसंघामध्ये सुनील कांबळे आणि रमेश बागवे यांच्याखेरीज तब्बल २० उमेदवार रिंगणात होते. वंचित बहुजन आघाडीनेदेखील नीलेश आल्हाट यांना पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिल्याने बहुजन मतांमध्ये काही प्रमाणात विभाजन झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी ८,८०० मतं घेतली. शेवटच्या टप्प्यामध्ये या विधानसभा मतदारसंघात भाजपने मोठ्या प्रमाणात जोर लावल्याचे पाहायला मिळालं तर दुसरीकडे रमेश बागवे हे आपली पारंपरिक निवडणूक रणनीतीवर काम करत राहिले.

कांबळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली विकासकामे आणि योजना आधारावर प्रचार करत होते, तर बागवे दहा वर्षांपूर्वी आमदार आणि मंत्री म्हणून आणि त्यापूर्वी पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून केलेली कामे मतदारांना सांगण्याचा प्रयत्न करताना पहायला मिळाले.  

कॅन्टोन्मेंट मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, २०१४ पासून येथे भाजपचे कमळ फुलले आहे. रमेश बागवे हे काँग्रेसचे अनुभवी नेते होते. त्यांनीही या मतदारसंघाचे अनेकदा प्रतिनिधित्व केले आहे, तर भाजपचे सुनील कांबळे हे येथील विद्यमान आमदार असून दोघांमध्येच कडवी झुंज झाली.

पहिल्या फेरीपासूनच या मतदारसंघात जोरदार टक्कर झाली. मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर सुनील कांबळे ४२९ मतांनी आघाडीवर होते.  सातव्या फेरीअखेर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपच्या सुनील कांबळे यांना २४ हजार ४४८ मते तर काँग्रेसच्या रमेश बागवे यांना २२ हजार ४९२ मते कांबळे १,१५६ मतांनी आघाडीवर होते. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सुनील कांबळे बाराव्या फेरीअखेर ५,५०० मतांनी पुढे होते. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सुनील कांबळे  १७ व्या फेरीत ७,५०० पुढे होते. १९ वी फेरी अखेर सुनील कांबळे ७३,०४८ तर  रमेश बागवे यांना ६३,१२३ मते होती. कांबळे ९,९२२ मतांनी आघाडीवर होते. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सुनील कांबळे २० फेरीनंतर १३,२५६ मतांनी विजयी झाले.  

कन्टोन्मेंट मतदारसंघातील सर्वधर्मीय मतदारांनी माझ्यावर आणि पर्यायाने भाजपवर कायम ठेवलेल्या विश्वासाचे प्रतीक म्हणजे हा विजय आहे. कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतल्यामुळे हा विजय शक्य झाला.
- सुनील कांबळे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest