हेमंत रासने १९,४१३ मतांनी विजयी
पुण्यातील चुरशी लढतींपैकी एक असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने यांनी बाजी मारली आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा १९,४२३ मतांनी पराभव केला. रासने यांचा विजय निश्चित होताच मतदारसंघामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.
राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले असून त्यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी लढत म्हणून कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे लक्ष लागून राहिले होते. राज्यात चर्चेत असणाऱ्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे हेमंत रासने विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव करत पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला. रासने यांना ९०,०४६ मते मिळाली. ७०,६२३ मते घेणारे धंगेकर दुसऱ्या स्थानी राहिले.
अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर, २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर शनिवारी (दि. २३) निकाल जाहीर झाले. सर्व राज्याचे कसबा विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष लागून होते. गेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला होता. आता हेमंत रासने यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आपल्या पराभवाचा वचपा काढला आहे.
मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा कधी रासने तर कधी धंगेकर आघाडीवर असे चित्र होते. तिसऱ्या फेरीपासून त्यांनी घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखली. तिसऱ्या फेरीत ते ५,४४३ मतांची आघाडीवर होते. पाचव्या फेरीअखेर रासने आणि धंगेकर यांच्यातीरल फरक ६,९१९ मतांवर गेला. रासने सातव्या फेरीअखेर १२,७४० मतांनी तर १३व्या फेरीअंती १८,७४९ मतांनी आघाडीवर होते. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच हेमंत रासने यांनी मोठी आघाडी घेतली होती. फेरी दरफेरीत त्यांनी आपले मताधिक्य वाढवत ठेवले. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी झुंज दिली, मात्र अखेर रासने यांनी विजय मिळवला.
पुण्यातील कसबा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे पहिल्शा फेरीअखेर आघाडीवर होते. त्यांनी ५५० मतांची आघाडी घेतली होती. नंतर मात्र ते मागे पडत गेले. यामुळे पोटनिवडणुकीतील विजयाच्या पुनरावृत्तीचा काँग्रेसचा प्रयत्न फोल ठरला. भाजपने पुन्हा एकदा कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात आपला ठसा उमटवला.
भाजपसाठी प्रतिष्ठेचा विजय
कसबा पेठ मतदारसंघ हा भाजपचा परंपरागत बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने येथे विजय मिळवत भाजपला धक्का दिला होता. त्यापूर्वी येथे भाजपच्या मुक्ता टिळक आमदार होत्या. त्यांच्या निधनाने येथील जागा रिक्त झाली होती. त्या पोटनिवडणुकीतील पराभवाचे निवारण करत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
हा विजय कसबावासियांचा आहे. कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेत लोकसभेच्या निकालानंतर खासदार मुरलीधर मोहोळ यांचा ‘यापुढे कसब्यात भगवाच फडकणार,’ हा शब्द खरा ठरवला.
- हेमंत रासने