चंद्रकांत पाटलांची मतांची त्सुनामी; कोथरूडमधून १ लाख १२ हजार ४१ च्या मताधिक्यांनी दणदणीत विजय

कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक १ लाख १२ हजार ४१ मतांचे मताधिक्य मिळवत विजयश्री खेचून आणली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

चंद्रकांत पाटलांची मतांची त्सुनामी

कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक १ लाख १२ हजार ४१ मतांचे मताधिक्य मिळवत विजयश्री खेचून आणली. ‘बाहेरचा उमेदवार’ असे म्हणणाऱ्या विरोधकांना मताधिक्याने पाटील यांनी उत्तर दिले आहे. पाच वर्षात केलेली विकास कामे आणि राखलेला तगडा जनसंपर्क याच्या जोरावर पाटील यांनी कोथरूडचा गड राखला. कोथरूडमध्ये यंदा वाढलेला मतदानाचा टक्का देखील भाजपाच्या पथ्यावर पडला.

कोथरूड मतदारसंघ भाजपचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. मूळचे कोल्हापूरकर असलेले चंद्रकांत पाटील २०१९ साली या मतदारसंघामधून निवडून आले होते. त्यावेळी त्यांना अवघ्या २५ हजारांचे मताधिक्य मिळालेले होते. यंदा मात्र हे मताधिक्य वाढविण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी आदींनी घेतली होती. यंदा एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. मात्र, प्रामुख्याने तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली. शिवसेनेचे (उबाठा) चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे अशी लढत या ठिकाणी झाली. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी या दोन्ही उमेदवारांना धोबीपछाड देत मोठा विजय नोंदवला.

कोथरूडमध्ये अमोल बालवडकर यांची संभाव्य बंडखोरी रोखण्यात भाजपा यशस्वी ठरली. पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर केलेल्या पदयात्रा, बाईक रॅली, लोकसंवाद, सभा आणि थेट जनसंपर्क यामुळे मतांचा टक्का वाढण्यात मदत झाली. शनिवारी कोथरूडसाठी मतमोजणीच्या एकूण २१ फेऱ्या झाल्या. पाटील यांना ६८.४ टक्के झाले. त्यांना १ लाख ५८ हजार ७५७ हजार मते मिळाली. तर, दुसऱ्या क्रमांकाची मते शिवसेनेचे (उबाठा) चंद्रकांत मोकाटे यांना मिळाली. मतदारांनी त्यांच्या पदरात २०.२७ टक्के मतदान टाकले. त्यांना ४७ हजार १९३ मते पडली. तिसऱ्या क्रमांकाची १८ हजार ६७ हजार मते मनसेच्या अॅड. किशोर शिंदे यांना मिळाली. त्याची टक्केवारी ७.७८ टक्के एवढी आहे.

कोथरूड गावठाण, गुजरात कॉलनी, भेलकेनगरमधून चंद्रकांत पाटलांना चांगले मतदान झाले. या भागातील प्रचारादरम्यान भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, कर्नाटकमधील मेंगलोर विधानसभा मतदारसंघातील आमदार हरिश पुंजा, भाजप कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला या संघटनात्मक पातळीवरील नेते सहभागी झाले होते. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेनेही चंद्रकांत पाटील यांना आपला जाहीर पाठिंबा दिला.

२०१९ पेक्षा वाढले मताधिक्य
२०१४  च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करायचा झाल्यास भाजपच्या मेधा कुलकर्णी यांना १,००,९४१ इतकी मते पडली होती. तर विरोधी उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांना ३६, २७९ मते पडली होती. यात, मेधा कुलकर्णी जवळपास ६४ हजार ६६२ मतांचा लीड घेऊन विजयी झाल्या होत्या. तर २०१९ साली चंद्रकांत पाटील यांनी जवळपास १,०५,२४६ टक्के मत घेतली होती. त्यांनी मनसेच्या किशोर शिंदे यांचा २५, ४९५ मतांनी पराभव केला होता.

सपत्नीक प्रचाराचा फायदा
चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी अंजली पाटील यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. घरोघरी संपर्काद्वारे मतदारांना आवाहन केले होते. यासोबतच राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित सुनिती जोशी, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर आणि अपर्णा अभ्यंकर, भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे डॉ. वासंती पटवर्धन आणि भूपाल पटवर्धन, प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ माया तुळपुळे, दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे आणि मधुमिता बर्वे यांच्या भेटी घेऊन मतदानासाठी आवाहन केले. यावेळी माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मंजूश्री खर्डेकर, ॲड. मिताली सावळेकर, उद्योजिका स्मिता पाटील यांनी प्रचारात पुढाकार घेतला होता.

कोथरूडमधील मायबाप जनतेने १ लाख १२ हजार ४१ अशा विक्रमी मताधिक्याने आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप आभार! माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवणाऱ्या कोथरूडकरांचा मी आजन्म ऋणी आहे. सर्वांनी दिलेलं प्रेम, विश्वास यामुळे मला आणखी बळ मिळाले आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमातून या जन्मात तरी मी उतराई होऊ शकणार नाही. माझे आणि कोथरूडकरांचे जन्मो-जन्मीचे नाते आहे, हेच आजच्या यशातून अधोरेखित होते. मला मिळालेले कोथरूडकरांचे प्रेम ही माझी पुण्याई आणि हीच माझी खरी श्रीमंतीही आहे. मी महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांचे आभार मानतो.
-चंद्रकांत पाटील, भाजपचे कोथरूडचे उमेदवार

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest