Water supply
पुणे शहराचा पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. एल निनोचा मान्सूनवरील संभाव्य परिणाम लक्षात घेता पाऊस लांबण्याची किंवा कमी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये कपात करण्यात येणार आहे. येत्या १८ मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
जूनमधील पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आज घडीला ९.७० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. शेती तसेच उद्योगांना देखील धरणातून पाणीपुरवठा होत असतो.
पुणे शहराचा पाणी वापर महिन्याला १.५ टीएमसी इतका आहे. आठवड्यातील एक दिवस याप्रमाणे महिनाभर पाणी कपात केल्यास ०.२५ टीएमसी पाणी वाचणार आहे. म्हणजेच पुण्याला किमान पाच ते सहा दिवस पुरेल इतके पाणी वाचवण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.