पुणे: रामवाडीत महामेट्रोचे पार्किंग रस्त्यावर; कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या स्थानकामध्ये नाही पार्किंगची सुविधा

महामेट्रो प्रशासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या रामवाडी येथील महामेट्रो स्थानकास पार्किंगची सुविधा नसल्याने दुचाकीस्वारांना नाईलाजास्तव रस्त्यावर वाहने लावण्याची वेळ येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 30 Jun 2024
  • 04:00 pm
Pune Metro Parking

संग्रहित छायाचित्र

महामेट्रो प्रशासनाचे नगर महामार्गावर अपघातांना निमंत्रण

सोमनाथ साळुंके

महामेट्रो प्रशासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या रामवाडी येथील महामेट्रो स्थानकास पार्किंगची सुविधा नसल्याने दुचाकीस्वारांना नाईलाजास्तव रस्त्यावर वाहने लावण्याची वेळ येत आहे.

सध्या शहरात वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे शहरात विविध ठिकाणी जाणाऱ्या चाकरमान्यांना नेहमीच वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागते. नागरिकांसह कामगारवर्गाची मुख्य समस्या लक्षात घेऊन आणि त्यांची होणाऱ्या कोंडीतून सुटका व्हावी, या उद्देशाने महामेट्रो प्रशासनाच्या वतीने काही महिन्यापूर्वी रामवाडी ते वनाजपर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध करण्यात आली. यामुळे कामानिमित्त ये-जा करणाऱ्या अनेक प्रवाशांना हा मेट्रो प्रवास सोयीस्कर झाला. मेट्रो प्रकल्पाच्या वतीने पुणे-नगर महामार्गावरील रामवाडी येथे मुख्य मेट्रो स्टेशन तयार करण्यात आल्याने ग्रामीण व उपनगर भागातील अनेक कामगार हे येथील मेट्रो स्टेशनवर येत असतात. मात्र मेट्रो प्रशासनाच्या वतीने दुचाकीस्वारासाठी या भागात कुठल्याही प्रकारची पार्किंगची सुविधा करण्यात न आल्याने येणाऱ्या दुचाकीस्वारांना नाईलाजास्तव आपली वाहने फुटपाथवर  लावण्याची वेळ येत आहे. मात्र फुटपाथदेखील पार्किंगसाठी अपुरे पडू लागल्याने वाहनचालकांनी चक्क रस्त्याचाच बेकायदेशीररित्या ताबा घेऊन वाहने रस्त्यावरच पार्क करणे सुरू केले आहे. महामेट्रो प्रशासनाने पार्किंगचे योग्य नियोजन न केल्यामुळे नगर महामार्गावर अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

अगोदरच मेट्रो जिना हा फुटपाथवरच बनविल्याने या भागातील पादचारी नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावरून चालण्याची वेळ येत असताना त्यात अनधिकृत पार्किंगची भर पडली आहे. त्यामुळे याचा नाहक त्रास हा ज्येष्ठ नागरिकांसह परिसरातील नागरिकांना सहन करण्याची वेळ आली आहे. त्यातच हा नगरकडे जाणारा महामार्ग असल्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मात्र रस्त्यावर दुचाकी पार्क केल्या जात असल्याने रात्रीच्या सुमारास नेहमीच वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबवर रांगा लागल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा मार्ग सध्या वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकला आहे.

या भागातील वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेकदा रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे अनेकदा समोर उभ्या केलेल्या वाहनांचा अंदाज येत नसल्यामुळे मध्यंतरीच्या काळात धानोरीसह कल्याणीनगर या ठिकाणी झालेल्या महाभयंकर अपघाताची पुनरावृत्ती होण्याची भीती या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.  

रस्त्यावर लावलेल्या दुचाकी अपघाताचे निमंत्रण देत आहेत. अनेकदा छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडूनदेखील महामेट्रो प्रशासनाचे अजूनही डोळे उघडले नसून भविष्यात परिसरात एखादा गंभीर स्वरूपाचा अपघात झाल्यास त्याला महामेट्रो प्रशासन जबाबदार राहील, असे परिसरातील संतप्त नागरिकांनी सुनावले.

मेट्रो प्रकल्प सुरू करण्यापूर्वी परिसरात प्रवासी वाहनचालकांसाठी पार्किंगची सुविधा होणे गरजेचे होते. ते केले असते तर प्रवाशांना रस्त्यावर वाहने लावण्याची वेळ आली नसती. तसेच अपघातांची शक्यता निर्माण झाली नसती, असे या भागातील जाणकारांचे मत आहे. भविष्यात होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी लवकर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मेट्रोच्या उजिन्यामुळे परिसरातील फुटपाथ गायब झाले असताना त्यात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या दुचाकी पार्किंगची भर पडली आहे. परिसरात प्रवाशांच्या सोईसाठी आणि अपघात टाळण्यासाठी वाहनतळ उभारण्यात यावे.
- राहुल शिरसाट, युवा शहराध्यक्ष, काँग्रेस पक्ष

पुणे-नगर महामार्गालगत रामवाडी हा भाग आहे. या ठिकाणी मेट्रोस्थानक झाल्याचा परिसरातील आम्हा नागरिकांना आनंद आहे. मात्र महामेट्रोच्या नियोजनशून्य कारभारामुळे मुख्य रस्त्यावरच वाहने पार्क केली जातात. ही चिंतेची बाब असून यावर मेट्रो प्रशासनाने तातडीने उपाय करावा.
- प्रमोद देवकर, अध्यक्ष, तुकाईदेवी प्रतिष्ठान, रामवाडी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest