पुणे: दोन वारकऱ्यांना जीवदान; नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांनी वाचवले प्राण

हिंगोलीच्या मंदा मगर (वय ४५) आणि धाराशिव (उस्मानाबाद) चे ज्ञानदेव मारुती लोंढे (वय ८३) हे दोन वारकरी पालखी सोहळ्यात पायी निघाले होते. त्यावेळी त्यांचा रक्तदाब वाढल्याने ते चालताना अचानक कोसळले. त्यांना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांची जीव वाचला.

Pune News, Wari, Wari 2024, Warkari, Pimpri Chinchwad, Palkhi Sohla

संग्रहित छायाचित्र

रक्तदाब वाढल्यावर वेळीच उपचार मिळाल्याने अनर्थ टळला

खांद्यावर भगवी पताका...डोक्यावर तुळस... गळ्यात तुळशीमाळ... टाळ-मृदुंगाचा नाद आणि विठू नामाचा गजर अशा भक्तिरसात तल्लीन झालेले वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. रविवारी (३० जून) उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडहून पुण्यनगरीकडे पालखी सोहळा निघाला होता, या सोहळ्यात सहभागी झालेल्या दोन वारकऱ्यांचा रक्तदाब वाढल्याने ते चालताना अचानक कोसळले. हे पाहताच नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांनी त्यांच्याकडे धाव घेत त्यांची परिस्थिती पाहून वेळेच वैद्यकीय उपचार मिळवून दिल्याने त्या दोघांचा जीव वाचला.

हिंगोलीच्या मंदा मगर (वय ४५) आणि धाराशिव (उस्मानाबाद) चे ज्ञानदेव मारुती लोंढे (वय ८३) हे दोन वारकरी पालखी सोहळ्यात पायी निघाले होते. त्यावेळी त्यांचा रक्तदाब वाढल्याने ते चालताना अचानक कोसळले. त्यांना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांची जीव वाचला. नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक अर्जुन कुऱ्हाडे,  विभागीय क्षेत्ररक्षक जॉर्ज स्वामी, अर्चना वाघमारे, ऑल्विन डेव्हिड, विशाल गायकवाड यांनी प्रसंगावधान राखल्याने वारकऱ्यांना जीवदान मिळाले. स्वयंसेवकांनी केलेल्या सेवेमुळे त्यांचे पुणेकरांकडून कौतुक केले जात आहे.

नागरी संरक्षण दल आणि संपूर्ण सुरक्षा केंद्र (राज्य शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने पालखी मार्गावरील येरवडा साप्रस येथे आरोग्य तपासणी केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्रात वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. तसेच उपचार दिले जात होते. यावेळी नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक सेवा देत होते. पालखी सोहळा पुण्याकडे जात होता, तसा वारकऱ्यांचा उत्साह वाढत होता. मंदा मगर आणि ज्ञानदेव लोंढे हे चालत असताना अचानक त्यांचा रक्तदाब वाढला. याचा त्यांना त्रास होऊ लागला.

यासंदर्भात ‘सीविक मिरर’ला माहिती देताना जॉर्ज स्वामी म्हणाले, ‘‘नागरी संरक्षण दलाकडून दरवर्षी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आरोग्य सेवा दिली जाते. स्वयंसेवकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले असते. त्यामुळे अशा वेळी काय करावे, याची माहिती त्यांना असते. गर्दीतून चालताना अनेक वेळा वारकरी पडतात. त्यांना उचलून एका बाजूला घेऊन जाण्याचे काम स्वयंसेवकांकडून केले जाते. असे ते दोन वारकरी पडले असावे, असे प्रथमदर्शनी वाटले. पहिल्यांदा एक ज्येष्ठ नागरिक (लोंढे) पडल्याचे दिसले. त्यांच्याकडे तत्काळ धाव घेतली. त्यांचा रक्तदाब वाढल्याचे लक्षात आले. त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आले. लोंढे यांना होणारा त्रास प्राथमिक उपचारातून बरा होणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगताच त्यांना पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात घेऊन जावे लागणार होते. त्यामुळे रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. याबाबत उपनियंत्रक कुऱ्हाडे यांना देताच ते रुग्णावाहिका घेऊन आले. मंदा मगर यादेखील कोसळल्याचे दिसले, त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्या दोघांना घेऊन पहिल्यांदा सैन्य दलाच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले.’’ दोन्ही वारकऱ्यांना बरे वाटू लागल्यानंतर डॉक्टरांची भेट घेतली. त्यावेळी या दोन्ही रुग्णांना अगदी वेळेत रुग्णालयात दाखल केले. अन्यथा त्यांच्या जिवाचे बरे वाईट झाले असते, असे डॉक्टरांनी सांगितल्याची माहितीही स्वामी यांनी दिली.

नागरी संरक्षण दलाने दिलेल्या प्रशिक्षणाचा खूप फायदा झाला आहे. गर्दीचे व्यवस्थापन करताना कोणत्याही व्यक्तीला त्रास झाला तर त्याला उपचार कसे द्यावे, याची माहिती स्वयंसेवकांना असल्याने त्याचा रुग्णाला फायदा होतो. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची सेवा करताना नेहमीच आनंद होतो. मात्र यावेळी दोन वारकऱ्यांचा जीव वाचवता आला, ही आमच्याकडून घडलेली मोठी सेवा समजतो.
- जॉर्ज स्वामी, विभागीय क्षेत्ररक्षक

नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने आणि तेवढ्याच तत्परतेने सेवा करतात. रविवारी पालखी सोहळ्यात दोन वारकरी कोसळल्याची माहिती मिळताच त्यांना वैद्यकीय उपचार मिळवून देण्याचे कर्तव्य बजावले. त्यांचा जीव वाचविण्याचे उत्तम काम स्वयंसेवकांनी केले आहे.
- अर्जुन कुऱ्हाडे, उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल, पुणे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest