पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेत तल्लीन!

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखीचे रविवारी पुण्यनगरीत आगमन झाले. मोठ्या उत्साहाने पुणेकरांनी पालखीचे स्वागत केले. रविवारी, सोमवारी पालखी सोहळा मुक्कामी असल्याने पुणेकरांनी पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

Pune News, Wari 2024, Wari, Palkhi Sohla, Sant Dnyaneshwar, Sant Tukaram

छायाचित्रे - ओश्विन कढव

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखीचे रविवारी पुण्यनगरीत आगमन झाले. मोठ्या उत्साहाने पुणेकरांनी पालखीचे स्वागत केले. रविवारी, सोमवारी पालखी सोहळा मुक्कामी असल्याने पुणेकरांनी पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तसेच ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. शहराच्या मुख्य भागात पुणेकरांकडून वारकऱ्यांची सेवा करण्यात येत होती.

संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी सोमवारी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. लाखो पुणेकरांनी दिवसभर कुटुंबासह दर्शनासाठी प्राधान्य दिले.  शहरातील प्रत्येक मंदिर, परिसरात वारकऱ्यांची सेवा केली जात होती. नाश्ता, जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिरात भजन, कीर्तनात वारकरी तल्लीन झाले आहेत. एकूणच संपूर्ण शहराचे वातावरण भक्तिमय झाले आहे. टाळ मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांसह पुणेकर दंग झाले आहेत. पुणेकर वेगवेगळ्या प्रकारे वारकऱ्यांची सेवा करताना दिसतात. 

काही संस्थांनी वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. शहरातील विविध गणेश मंडळांनी वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. चौकाचौकात, पदपथावर वारकऱ्यांकडून भजन, हरिनामाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर पालखीसह आलेल्या लाखो वैष्णवांच्या सेवेत पुणेकर तल्लीन झाले आहेत. महापालिका, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था विविध प्रकारे वारकऱ्यांची सेवा करत आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी नाना पेठ परिसरामध्ये दरवर्षी जत्रा भरते. जत्रेत लहान मुलांनी खेळणी खरेदी करण्याचा आनंद लुटला, तर महिला, तरुणींनीही जत्रेतील विविध प्रकारची खरेदी केली. ज्येष्ठ नागरिकांनीही जत्रेचा आनंद लुटला.

आज सकाळी पालखीचे प्रस्थान

दोन दिवसांच्या मुक्कामानंतर आज (मंगळवारी) सकाळी पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने रवाना होईल. मंगळवारी सकाळी दोन्ही पालख्या हडपसरपर्यंत एकत्र येतील. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटातून सासवडमध्ये मुक्कामी जाईल. संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रोडवरून लोणी काळभोर येथे मुक्कामासाठी दाखल होईल.

पुणेकरांची अशीही सेवा

 साधू-संत येती घरा । तोचि दिवाळी दसरा, या उक्तीप्रमाणे शहराला सणाचे, उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.  प्रत्येक वारकऱ्यांची पुणेकरांकडून सेवा केली जात आहे. भोजनासह वारकऱ्यांना चप्पल, कपडे, पिशव्या शिवून देणे, केस कापणे, पायांना मसाज करण्यापासून त्यांना वारीसाठी फराळाचे पदार्थ, बिस्किटे दिली गेली.



(सर्व छायाचित्रे - ओश्विन कढव)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest