पालखी सोहळा पुण्यनगरीत विसावला!

खांद्यावर भगवी पताका... डोक्यावर तुळस... गळ्यात तुळशीमाळ... टाळ-मृदंगाचा नाद आणि विठू नामाचा गजर अशा भक्तिरसात तल्लीन झालेले वारकरी... स्वागताला बरसणारा वरुणराजा... फुलांची उधळण करत... ज्ञानोबा माउली-तुकाराम जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यनगरीत रविवारी (दि. ३०) विसावला. यावेळी लाखो वारकरी पालख्यांसह पुण्यात दाखल झाले.

संग्रहित छायाचित्र

ज्ञानोबा माउली-तुकाराम जयघोषासह वारकरी वरुणराजा, भक्तिरसात चिंब

खांद्यावर भगवी पताका... डोक्यावर तुळस... गळ्यात तुळशीमाळ... टाळ-मृदंगाचा नाद आणि विठू नामाचा गजर अशा भक्तिरसात तल्लीन झालेले वारकरी... स्वागताला बरसणारा वरुणराजा... फुलांची उधळण करत... ज्ञानोबा माउली-तुकाराम जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यनगरीत रविवारी (दि. ३०) विसावला. यावेळी लाखो वारकरी पालख्यांसह पुण्यात दाखल झाले.

पालखी सोहळ्याचे स्वागत पुणे महापालिकेचे प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराजी बी पी,  उपायुक्त माधव जगताप, किशोरी शिंदे, गणेश सोनवणे, नगरसचिव योगिता भोसले आदींनी केले. तसेच दिंडीच्या मानकऱ्यांचा सत्कार केला. उद्योगनगरीतून पालखी सोहळा पुण्यनगरीत मुक्कामी येणार असल्याने सकाळपासूनच वारकरी दाखल होण्यास सुरुवात झाली. लाखो वैष्णवांच्या मेळाव्यात पालखी आषाढी वारीकडे निघाली आहे. पालखी सोहळ्याचे आगमन होणार असल्याने पुणेकरांनी स्वागताची जय्यत तयारी केली होती. पुण्यात सकाळपासूनच भक्तिमय वातावरण तयार झाले होते. यासोबतच सकाळी वरुणराजाने हजेरी लावल्याने वारकऱ्यांसह पुणेकरही सुखावले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्याच्या वेशीवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. रविवारी रात्री दोन्ही पालख्या पेठांमधील विठ्ठलाच्या मंदिरामध्ये मुक्कामाला थांबल्या. दुसर्‍या दिवशीही या पालख्या पुण्यात मुक्कामी असतील. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामी असणार आहे. आळंदी ते पुणे आणि पुणे ते सासवड हे वारीमार्गावरील सर्वाधिक वाटचालीचे टप्पे असल्याने पुण्यात दोन मुक्काम केले जातात.

रविवारी पालखी सोहळ्याचे आगमन पुण्यात होणार असल्याने पालखी मार्गावर पुणेकरांनी स्वागतासाठी गर्दी केली होती. वारकरी जसजसे पुण्यात दाखल होत होते, तसतशी पुणेकरांची आतुरता वाढत होती. मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिक पालखीच्या स्वागतासाठी जमले होते. वारकऱ्यांसोबत भाविक भक्तांनी टाळ मृदंगाच्या तालावर फेर धरला. महिला, पुरुषांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. सामाजिक संस्था, विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक संदेशही पालखी सोहळ्यात दिले जात असल्याचे दिसून आले. महिला आणि तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग वारीच्या सोहळ्यात दिसून आला. शहरात मध्यवर्ती भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच प्रशासनाकडून वारकऱ्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.

पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करण्यात येत होते. ठिकठिकाणी राजकीय नेत्यांचे स्वागत फलक झळकल्याचे दिसून आले. त्यानंतर पालखी दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सोहळ्याचा वेग कमी झाला. अनेक राजकीय  व सामाजिक संस्थेतर्फे चहा, नाष्टा, पाणी, फळांचे वाटप करून तसेच भोजनाची व्यवस्था करून वारकऱ्यांची सेवा केली जात होती. दुपारच्या विसाव्यानंतर पालखी खडकीमार्गे पुण्यात विसावली.

दोन्ही पालखी सोहळे वाकडेवाडी येथून एकामागून एक पुणे शहराच्या दिशेने मार्गस्थ झाले. शिवाजीनगरहून फर्ग्युसन रस्त्यावर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सायंकाळी उशिरा पोहोचली. या रस्त्यावरील पादुका मंदिरामध्ये आरती करण्यात आली. त्या वेळी मोठ्या संख्येने वारकरी आणि पुणेकर भाविक उपस्थित होते. संपूर्ण रस्ताच वारकर्‍यांच्या भक्तीने, गर्दीने फुलून गेला होता. रस्त्यावरील प्रचंड गर्दीतून रथ हळूहळू पुढे सरकत होते. ठिकठिकाणी दर्शनासाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. त्यानंतर फर्ग्युसन रस्त्याने खंडुजीबाबा चौकातून पालखी सोहळा लक्ष्मी रस्त्यावर पोहोचला. या वेळी पालखीसोबत आलेले वारकरी आपापल्या मुक्कामाच्या दिशेने जात होते.  दोन्ही पालख्या लक्ष्मी रस्त्याने सायंकाळी संथगतीने मुक्कामाच्या दिशेने निघाल्या. दोन्ही मंदिरे आकर्षक पध्दतीने सजवली आहेत. दोन्ही मंदिरांत दर्शनासाठी रात्री भाविक पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती.

विश्रांतवाडीत जोरदार स्वागत

सालाबादप्रमाणे विश्रांतवाडी परिसर पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पालखीचे श्री साईबाबा मंदिरसह भोसरी फाटा येथे आमदार महेश लांडगे यांच्याकडून स्वागत करण्यात आले. दिघी परिसरात लष्करातर्फे  वारीत येणाऱ्या नागरिकांना फराळ, चहाचे वाटप करण्यात आले. विश्रांतवाडी परिसरात चौकाचौकात अनेक संघटनांनी स्वागताचे फ्लेक्स लावण्यात आले होते. परिसरात विविध ठिकाणी मंडप उभारून येणाऱ्या वारकऱ्यांना फराळ, फळांचे वाटप करण्यात येत होते.

पालिका प्रशासनाची उत्तम तयारी

वारकऱ्यांना काही अडचण भासू नये यासाठी पालिकेने पिण्याच्या पाण्याचे टँकर जागोजागी उभे केले होते. वारकऱ्यांना औषधे उपचार मिळावे यासाठी रुग्ण वाहिकेसह डॉक्टर हजर होते. स्वच्छतागृहांची देखील परिसरात सुविधा पुरविण्यात आली. अग्निशामक दलही तैनात करण्यात आले होते.

राजकीय नेत्यांकडून स्वागत 

विश्रांतवाडी परिसरात दुपारी ३ वाजता श्रींच्या पालखीचे आगमन झाल्यावर वरुणराजानेही पालखी स्वागतासाठी हजेरी लावल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण  दिसून आले. यावेळी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक यांनी पालखीस पुष्पहार घालून स्वागत केले. सुरेंद्र पठारे यांनी भाविकांना फराळ वाटप केले. याबरोबरच लोकविकास प्रतिष्ठानचे छाया भैरवनाथ उकरडे, अभिजित उकरडे यांच्या वतीने पाणी व फळे वाटप करण्यात आली. शिवसेनेचे आनंद गोयल यांनीही पाणी, फळ वाटप केले.

दुपारी विसावा 

आदर्श इंदिरानगर येथील श्री क्षेत्र आदर्श पालखी विसावा दत्त मंदिर येथे पालखी विसाव्यासाठी दुपारी सव्वा वाजता थांबली. या वेळी भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अश्व, बैलांचीही विसाव्यासाठी व्यवस्था केली होती. विसाव्यानंतर पालखीने शिवाजीनगरच्या दिशेने प्रस्थान ठेवले.

दुपारी पावणेचार वाजता पालखी येरवडा परिसरातील स्व. बिंदुमाधव बाळासाहेब ठाकरे चौकात दाखल झाली. यावेळी परिसरातील नागरिकांची दर्शनासाठी झुंबड उडाली. पालखी संगमवाडी परिसरातील मंडपात दुपारी चारच्या सुमाराला विसाव्यासाठी थांबली. त्यानंतर सोहळा पाटील इस्टेटजवळील चौकात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पोहोचला. रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या पुणेकरांनी 'माउली माउली' चा जयघोष करीत मोठ्या जल्लोषात पुष्पवृष्टी करीत स्वागत केले.

शहरातील पेठा गजबजल्या

पुण्यनगरीत पालखी सोहळा मुक्कामी असल्याने गणेश मंडळांकडून तसेच नागरिकांकडून वारकऱ्यांची सेवा केली जात असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. आरोग्य तपासणीचे स्टॉल उभारण्यात आले होते. पेठांमध्ये ठिकठिकाणी टाळ-मृदंगाचा नाद आणि विठू नामाचा गजर सुरू होता. पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

पालखी सोहळ्याची माहिती ‘गुगल मॅप’ वर

जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन रविवारी शहरात झाले. पालखी आगमनामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. वाहनचालकांना पर्यायी रस्त्यांची माहिती मिळावी, यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतुकीस बंद असलेले, सुरू असलेल्या रस्त्यांची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध करून दिली आहे. पालखी आगमन आणि प्रस्थानाच्या दिवशी शहरातील वाहतूक बदल, तसेच बंद रस्ते, पर्यायी मार्गांची माहिती ‘गुगल मॅप’ वर मिळणार आहे.

वाहतुकीत बदल केल्यानंतर अनेक वेळा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. पालखी सोहळा असल्याने शहरातील अनेक भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जातात. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यांची माहिती मिळावी, यासाठी वाहतूक पोलिसांनी पालखी सोहळ्यादरम्यान गुगल मॅपवर  माहिती उपलब्ध करून दिली आहे. पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होतात. पालखीचा मार्ग, बंद केलेले रस्ते आणि वाहतूक बदलांबाबतची माहितीसाठी वाहनचालकांनी गुगल मॅपचा वापर करावा, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. यासाठी पोलिसांनी गुगलशी समन्वय साधला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली. पालख्यांचा मुक्काम नाना-भवानी पेठेत राहणार आहे. या भागातील वाहतूक बदलांविषयी माहिती गुगल मॅपवर मिळणार आहे. दोन्ही पालख्या मंगळवारी (२ जुलै) मार्गस्थ होणार आहेत. प्रस्थान सोहळ्याची माहितीही गुगल मॅपवर आहे.

शहरातील वाहतूक बदल, बंद रस्ते, पालखीचा मार्ग, विसावा, पालखी मुक्कामाची माहिती मिळवण्यासाठी गुगल लिंक https://www.google.com/maps/deditmid=1Nud/8Rsb6grJP82jhCKyn3uzeGFSJLI&usp=sharing चा वापर करावा.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest