पुणे: रामवाडीतील महानगरपालिकेची शाळा भरते सांडपाण्यात!

पुणे: पुणे-नगर रस्त्यावर नगररोड (वडगावशेरी) क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत स.नं.२९, रामवाडीमधील लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयात नेहमी सांडपाणी व पावसाचे पाणी साठत आहे. संपूर्ण शाळेला सांडपाण्याने वेढलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

Pune News, PMC News, Ramwadi, Lokmanya Tilak School

पुणे: रामवाडीतील महानगरपालिकेची शाळा भरते सांडपाण्यात!

पुणे: पुणे-नगर रस्त्यावर नगररोड (वडगावशेरी) क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत स.नं.२९, रामवाडीमधील लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयात नेहमी सांडपाणी व पावसाचे पाणी साठत आहे. संपूर्ण शाळेला सांडपाण्याने वेढलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळेतील शिक्षकांनी तसेच पालकांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही उपाययोजना होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

लोकमान्य टिळक शाळा ही पहिली ते सातवी पर्यंत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना सांडपाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तसेच साठलेल्या घाण पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डास वाढलेले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना या पाण्यातून जावे लागत आहे. असे काही पालकांनी सीविक मिररला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. पुणे शहरात झिका विषाणू, कोरोना विषाणू, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आदी रोगांचा वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेता या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका पोहचू शकतो. तसेच सांडपाण्यात लहान मुले खेळले तर त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती आहे, त्यामुळे शाळा प्रशासनाने तसेच महापालिकेने वेळीच उपाय योजना कराव्यात, असे पालकांचे म्हणणे आहे. 

या समस्येबाबत वेळोवेळी नगररोड (वडगावशेरी) क्षेत्रिय कार्यालयाकडे तक्रार केली असता, आजतागायत कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही केली नाही. तसेच शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात साचणाऱ्या पाण्याकडे स्थानिक प्रशासन जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत आहे. रामवाडी मधील नागरिकांच्या मनामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिकेची शाळा आता कायमस्वरुपी सांडपाण्यातच भरणार का असा संतापजनक प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. तसेच मुलांच्या आरोग्य धोक्यात येईल अशी भिती पालकांच्या मनात निर्माण झाली आहे. या बाबत महापालिकेचे अधिकारी आणि शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.   

रामवाडी मधील लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयात साठलेल्या सांडपाणीचा  व पावसाच्या पाण्याचा तातडीने निचरा करावा. पुन्हा पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. अशी मागणी नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे केली आहे. कार्यवाही का केली जात नाही, असा प्रश्न पडला आहे.
-  प्रमोद मोहन देवकर-पाटील, सामाजिक कार्यकर्ते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest